राजौरीत सहकाऱ्यांवर गोळीबार, मेजरची लष्करी कोर्टाकडून होणार चौकशी

राजौरीजवळील थानामंडी लष्करी तळावर एका मेजरने सहकाऱ्यांवर  केलेल्या गोळीबाराची लष्करी कोर्टाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गोळीबारात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5 जण जखमी झाले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मेजरने गुरुवारी दुपारी गोळीबार प्रशिक्षणाच्या वेळी दहशतवादी हल्ल्याची बोंब ठोकून तळावर गोंधळ निर्माण केला आणि मग वरिष्ठांवर गोळीबार केला. पॅनिक झालेल्या या मेजरने शस्त्रागारात धाव घेऊन तेथील जवानांना ओलीस ठेवले होते. त्याला शांत करण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि जवानांवरही त्याने अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेडही फेकले. या ग्रेनेडच्या स्फोटात दोन अधिकारी जखमी झाले. जखमींना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.