लोणावळ्यातील भाड्याचा बंगला महागात पडला, इन्स्टाग्रामवर खोटी जाहिरात करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणावळा येथे प्रशस्त बंगला असून तो भाड्याने मिळेल, अशी इन्स्टाग्रामवर खोटी जाहिरात करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या दोघांविरोधात अशा प्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

दिनकर (नाव बदलेले) यांना दोन दिवस सुट्टी एन्जॉय करायची होती. त्यांनी इन्स्टाग्रामवर लोणावळा व्हिला- 77 या खात्यावर बंगला भाड्याने मिळेल अशी जाहिरात वाचली होती. त्या जाहिरातीवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून दिनकर यांनी बंगला भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना नाश्ता, जेवणासह एका रात्रीचे 28 हजार रुपये भाडे सांगण्यात आले.

दरम्यान बंगल्याचा पत्ता समोरच्या व्यक्तिने दिल्यानंतर दिनकर यांनी आरोपींनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 50 हजार रुपये टाकले. त्यानंतर इलेक्ट्रिक समस्या झाल्याचे दिनकर यांना सांगण्यात आले. त्यामुळे आरोपींनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्यास सुरुवात केली, पण भामट्यांनी त्यांचा कॉल घेणे टाळले. त्यामुळे दिनकर यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एपीआय तुकाराम डिगे व त्यांच्या पथकाने तपास सुरू करून पुण्यात राहणारे अविनाश जाधवानी आणि आकाश जाधवानी या दोघा भावांना अटक केली. या दोघांनी अशा प्रकारे नसलेला बंगला भाड्याने देण्याच्या बहाण्याने अनेकांना चुना लावला.