मनतरंग – नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर

‘रिजेक्शन’ किंवा ‘नाकारलं जाणं’ हे तसं स्वीकारणं अवघड असतं आणि संवेदनशील, हळव्या व्यक्तीला हे म्हणजे आत्मसन्मानाला ठेच बसण्याइतकं क्लेशकारक असतं. त्यामुळे अशा व्यक्ती नैराश्यात जातात, त्यांचा शोक कालावधी हा सामान्य कालावधीपेक्षा अधिक असतो. अशा व्यक्ती या भूतकाळात इतक्या गढून जातात की, त्यांना वर्तमान हा नकोसा वाटतो.

सुनील (नाव बदलले आहे) त्या दिवशी नेहमीप्रमाणे रात्रीची कार चालवत होता. दिवसभर घरी बसून बसून तो कंटाळायचा. त्यामुळे रात्री उशिरा कार चालवणं हे त्याला आवडायचं. त्यात शर्वरीची (नाव बदलले आहे) आठवण त्याला अस्वस्थ करत होतीच. जवळ जवळ सहा महिन्यांपूर्वी त्यांचं चार वर्षांचं नातं संपुष्टात आलं होतं. सुनील तिचा विचार करतच कार चालवत होतं, पण अचानक त्याला ड्राईव्ह करत असताना घाम फुटला आणि हृदयाची धडधड वाढली. त्याने तिथल्या तिथे ड्राईव्ह करणं थांबवलं, गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.

“मला त्या दिवशी रात्री इतका त्रास झाला की, एका क्षणी मला वाटलं की, आता मी मरणार. नशिबाने तिथल्या दुकानदाराने मला धीर दिला आणि मी सुखरूप घरी आलो. शेवटी तुमच्याकडे यायचं ठरवलंच. मला हे खूप स्ट्रगलचं गेलं आहे. माझं ब्रेकअप झालं आणि जॉब गेला. दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या होत्या. मी आणि माझी मैत्रीण लग्न करणार होतो. माझ्या घरातल्यांना ती पसंत होती. तिचं माझ्या घरी येणं जाणं होतं. अचानक तिने माझ्याबरोबर बोलणं बंद केलं आणि फक्त एक मेसेज केला की, इट्स ओव्हर. नंतर तिने माझा किंवा माझ्या आईचा कॉलही उचलला नाही.’’ सुनील आता बोलता झाला होता. सुनीलची दुसरी मोठी समस्या होती ती म्हणजे त्याची नोकरी, जी अचानक त्याच्या हातून गेली होती. अचानक अशी चांगल्या पगाराची नोकरी जाणं आणि भावी जोडीदाराने नाकारणं हे त्याच्या पचनी पडलं नाही आणि तो कोलमडून गेला.

“माझ्यात अशी काय कमतरता आहे, ज्यामुळे मी नाकर्ता ठरलो?’’ असं जेव्हा हतबलतेने सुनील म्हणाला तेव्हाच त्याची समस्या उलगडली गेली. “तू नाकर्ता कसा काय ठरलास यामध्ये?’’ असं जेव्हा त्याला सत्रामध्ये विचारलं गेलं तेव्हा तो पटकन म्हणाला; “मॅम, मी अत्यंत साधा आणि मेहनती मुलगा आहे. मी या नोकरीसाठी भरपूर प्रयत्न केले होते आणि ती मी मिळवली होती. माझा प्राऊड होती ती नोकरी. शर्वरीला गमावलं मी…माझ्या चुकीमुळे.’’

“कुठली चूक होती ती?’’ असं विचारताच तो सांगू लागला, “मी आमच्या लग्नासाठी सेव्हिंग्स करत होतो, पण तिला लग्नाआधी भरपूर फिरायचं, मजा करायची होती. त्यामुळे आमच्यात वाद होऊ लागले. तिच्या म्हणण्यानुसार मी कंजूष होतो. ती माझ्या काटकसर करण्याच्या सवयीची खिल्ली उडवायला लागली. आमच्यात एकदा मोठ्ठं भांडण झालं आणि त्या दिवसानंतर सगळं संपलं.’’ अशी पुस्ती त्याने बोलता बोलता जोडली.

सुनील जे काही सांगत होता त्यावेळी तो पराकोटीचा हतबल वाटत होताच, पण शिवाय स्वतला दोषी ठरवल्यामुळे अपराधगंडाच्या भावनेतही गेलेला होता आणि त्यामुळेच त्याला चिंताग्रस्त विकाराने (एंक्झायटी डिसऑर्डर) ग्रासले होते. त्याला जाणवलेली हृदयाची धडधड, घाम फुटणं, भूक मंदावणं या लक्षणांबरोबरच रात्रीची झोप जाणं, कशातही रस नसणं, एकटेपणा जाणवणं, आत्मविश्वास जाणं, जीव घाबराघुबरा होणं हीही लक्षणं त्याला जाणवत होती हे बोलताना कळून आलं.

या सगळ्याला कारणीभूत ठरलेलं ते म्हणजे त्याला अनुभवायला आलेला नकार, जो त्याला पचवताच आला नव्हता. सुनीलने हे प्रामाणिकपणे मान्यही केलं होतं की, त्याला नकाराची सवयच नव्हती. कारण लहानपणापासून त्याला सगळ्या गोष्टी न मागता किंवा मागितल्याबरोबर मिळालेल्या होत्या. त्यामुळे त्याने स्वत कमावलं किंवा गमावलं असं काहीच नव्हतं. अचानक काही गोष्टी (नातं आणि नोकरी) दूर गेल्याने त्याच्या कम्फर्ट झोनला तडाखा बसल्यासारखं झालं आणि त्याचा परिणाम संवेदनशील असलेल्या सुनीलच्या मनस्वास्थ्यावर झाला.

‘रिजेक्शन’ किंवा ‘नाकारलं जाणं’ हे तसं स्वीकारणं अवघड असतं आणि संवेदनशील, हळव्या व्यक्तीला हे म्हणजे आत्मसन्मानाला ठेच बसण्याइतकं क्लेशकारक असतं. त्यामुळे अशा व्यक्ती नैराश्यात जातात, त्यांचा शोक कालावधी हा सामान्य कालावधीपेक्षा (सहा महिन्यांपेक्षा जास्त) अधिक असतो. अशा व्यक्ती या भूतकाळात इतक्या गढून जातात की, त्यांना वर्तमान हा नकोसा वाटतो. अतिविचार आणि स्वत:ला दोष देत या व्यक्ती झालेल्या घटनांचा क्रम, अर्थ त्याच्या पद्धतीने लावायला सुरुवात करतात आणि शेवटी त्याचा परिणाम अतार्किक भीती, चिंता यामध्ये होऊ शकतो.

सुनीलचं काही प्रमाणात हेच होत होतं. तो झालेल्या घटना मनातल्या मनात घोळवत होता आणि त्याला आलेल्या कडवट अनुभवांचा, टीकांचा त्याने परिणाम करून घेतला होता. त्यात त्याने काही मूलभूत गोष्टींचा विचारच केला नव्हता. शर्वरीचा उथळ स्वभाव, तिने त्याच्यावर ठेवलेला अविश्वास, त्याच्यावर फक्त बाह्य स्वरूपात प्रेम करणं या गोष्टी त्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्याला एकदम सत्यता पटली. नोकरी अचानक सुटणं म्हणून तो पचवू शकत नव्हता. त्याची सत्र जेव्हा चालू होती तेव्हा त्याच्या चिंता नियोजनावर आणि ताणाच्या व्यवस्थापनावर जास्त भर दिला गेलाच. शिवाय त्याच्या शोकाच्या कारणावरही त्याचे समुपदेशन करण्यात आले. खरं नातं म्हणजे काय? विश्वास, स्वत्व या अत्यावश्यक गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा केला गेला, जेणेकरून सुनीलचा आत्मविश्वास परत येईल आणि तो चिंतामुक्त होईल. हळूहळू सुनीलमध्ये अपेक्षित बदल दिसू लागला.

हल्ली सुनीलला तिची आठवण कमी येते आणि आली तरी तो स्वतला सांभाळू शकतो. त्याने पुन्हा एकदा नोकरी शोधायला सुरुवात केली आहे. त्याची भूक पुन्हा वाढत चालली आहे. त्या दिवशी तो क्लिनिकमध्ये प्रसन्न मुद्रेने आला. आल्या आल्या त्याने सांगितलं, “मॅम, आज मी जवळ जवळ दहा महिन्यांनी माझं फेवरेट फूड पिझ्झा खाल्ला. मस्त वाटलं. या आठवडय़ात मला झोपही छान लागतेय. थँक्यू व्हेरी मच. मी स्वतला सापडलोय. हेच तर मी शोधत होतो.पीस ऑफ माइंड.’’ त्याच्या या उद्गारांनी आणि समाधानी चेहऱयाकडे बघून मनाला खूप बरं वाटलं. एक आयुष्य मार्गावर येत होतं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]