साहित्य जगत – प्रकाशन समारंभातील वेगळेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रविप्रकाश कुलकर्णी

पुस्तक प्रकाशन समारंभपूर्वक करणं ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यामागे लेखक, प्रकाशक या दोघांची वा यापैकी एकाची हौस हे कारण असू शकतं किंवा पुस्तकाचं वेगळेपण वाचकांच्या मनात ठसावं यासाठी हा प्रयत्न असतो. अर्थात आजकाल पुस्तक प्रकाशनाचे कार्पाम सर्रास होत असतात. त्यामुळे त्याची अपूर्वाई वा वेगळेपण फारसं राहिलेलं नाही. अशा वेळी सहज मनात येतं की, समारंभपूर्वक प्रकाशन झालेलं मराठीतील पहिलं पुस्तक कोणतं असावं हे कळण्याची आपल्याकडे काही यंत्रणा नाही. अशा प्रकारचे विचार कुठल्याही पुस्तक प्रकाशनाला मी जातो तेव्हा मनात येतातच.

परममित्र पब्लिकेशन्सच्या ‘युगप्रवर्तक अद्वितीय संत तुकाराम’ या डॉ. देविदास पोटे संपादित दोन बृहत खंडांच्या प्रकाशन सोहळ्यातदेखील हे विचार मनात आलेच. मराठी मनाला संत तुकारामाची ओळख नाही असं होऊच शकत नाही. ‘नाठाळांचे माथी हाणू काठी, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ अशा प्रकारची तुकोबाची अनेक वचनं आमच्या रोजच्या बोलण्यात सहज येतात. इतका तो आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेलेला आहे. म्हणून तर ‘तुका’ आम्हाला आकाशाएवढा वाटतो. आमच्या भाषा आणि संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. सर्वसामान्यांपासून ते विद्वान जनांपर्यंत तुकारामाचा वेध पिढ्यान्पिढ्या घेतला गेला आहे आणि यापुढेही घेतला जाईल. तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि साहित्याची ही मोहिनी आहे. त्यातील 150 मान्यवरांनी तुकोबाचं जे आकलन मांडलं आहे त्याचं संकलन डॉ. पोटे यांनी या दोन बृहत खंडांत दिलेलं आहे. महाराष्ट्र सेवा संघ या नामवंत संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, संतसाहित्याचे अभ्यासक अमोल खैर, पोलीस आयुक्त आरपीएफ, डॉ. रवींद्र शिसवे आणि संपादक देविदास पोटे, प्रकाशक माधव जोशी यांच्या उपस्थितीत रीतसर प्रकाशन झाले.

आपल्याकडे पुस्तक प्रकाशन म्हटलं की, ती पुस्तकं रंगीत कागदात बांधून ठेवलेली असतात. हा बंदोबस्त इतका कडेकोट असतो की, प्रकाशनाच्या वेळी बांधलेल्या दोऱयाची गाठ सुटता सुटत नाही किंवा सेलो टेपने पॅकिंग केलं असेल तर तो कागद निघता निघत नाही. शेवटी प्रकाशन करणाऱयाला ओढाताण करत, प्रसंगी तो कागद टराटरा फाडत पुस्तक बाहेर काढावं लागतं. हा अनुभव बऱयाचदा येतो. शिवाय तो रंगीबेरंगी कागद मग तिथेच फेकून दिला जातो. यासंबंधात एक आठवण सांगतो. गोदाराणी परुळेकर यांच्या ‘माणूस जेव्हा जागा होतो’ आत्मकथेचं प्रकाशन दत्तो वामन पोतदार यांच्या हस्ते होतं. आयत्या वेळी पुस्तक बांधलेल्या गठ्ठ्याचा दोरा निघेना. पोतदार यांनी शांतपणे कोटाच्या खिशातून पाकीट काढलं. त्यातून छोटीशी कात्री बाहेर काढली. शांतपणे तो दोरा कापला आणि हसत म्हणाले, प्रकाशन म्हटलं की, हेदेखील ठेवावं लागतं. एवढं बोलून त्यांनी पुस्तक बाहेर काढलं, प्रेक्षकांना दाखवलं आणि प्रकाशन झालं.

परममित्र प्रकाशनने मात्र ही झटापट त्यांच्यापुरती टाळली आहे. एका बाजूला नाडी असलेल्या मोठ्या रुमालात ते पुस्तक गुंडाळून ठेवतात. नाडी उलगडली आणि कापड बाजूला कां की समोर पुस्तक हातात घेता येतं. किती सहज गोष्ट आहे नाही? हा प्रकार इतरही प्रकाशकांनी करून बघायला हरकत नाही. तर अशा सहज पद्धतीने ‘युगप्रवर्तक अद्वितीय संत तुकाराम’ या दोन खंडांचं प्रकाशन सहज झालं. भलेमोठे हे खंड हातात घेऊन दाखवणं अवघड होणार हे दिसत होतं. हे ओळखूनच प्रकाशक माधव जोशी यांनी पुस्तकाची मुखपृष्ठे लॅमिनेट करून प्रकाशन करणाऱयांच्या हातात दिली. लॅमिनेशन केल्यामुळे मुखपृष्ठाची कव्हर्स ताठ राहिली होती. प्रकाशनकर्त्यांनी ती श्रोत्यांना दाखवली, फोटो काढले गेले, प्रकाशन झालं! वजनाने जड आणि जाड पुस्तकांच्या बाबतीत केलेला हा प्रयोग अभिनव होता म्हणून ही नोंद. इतर प्रकाशकांनीदेखील हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.

हे बघताना एक आठवलं, त्र्यं. वि. सरदेशमुख यांना ‘बखर एका राजाची’ कादंबरीसाठी दमाणी पुरस्कार मिळाला होता. त्या वेळी त्यांना जी ट्रॉफी मिळाली ती वजनाने इतकी जड होती की, ती हातात घेताना त्यांची तारांबळ उडाली. पुरस्कार घेतल्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली. ते म्हणाले, तुम्ही प्रेमाने ट्रॉफी दिली पण ही जड ट्रॉफी पायावर पडली तर पायच मोडेल. झाल्या प्रकाराने त्या नंतरच्या वर्षापासून दमाणी पुरस्काराची ट्रॉफी हलकी झाली.
सांगायचं तात्पर्य एकच, प्रकाशन समारंभ करणाऱयांना आणि ते पाहणाऱयांनाही समारंभ सुसह्य व्हायला हवेत.