आषाढमास…चैतन्यमास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनश्री लेले

हा आषाढ सुरू झालेला कळतो त्यांना.. जे निसर्गाच्या जवळ आहेत. जे निसर्गातला बदल अगदी सहज टिपू शकतात. पावसाच्या हलक्या हलक्या सरींचं रूपांतर आता संततधारेत होऊ लागतं. सूर्याचं प्रखर तेज झाकण्याचं सामर्थ्य आता ढगात आलेलं असतं. वातावरण थोडंसं कोंदट, पण तरीही रम्य असतं. उन्हाळ्यात अंगोपांगी बहरणारी रंगीत फुलं… त्यांची जागा आता सोनटक्का, जाईजुईसारख्या पांढऱ्या पण सुगंधाने घमघमणाऱ्या फुलांनी घेतलेली असते. कोकिळेचा स्वर मूक झालेला असतो आणि त्याची जागा बेडकांच्या डराव डरावने घेतलेली असते. खरंच आहे…दर्दुरा: यत्र वक्तार : तूष्णी तिष्ठति कोकिल:…दर्दुर म्हणजे जे सारखे डर डूर करतात ते बेडूक बोलायला लागल्यावर गोड आवाजाची कोकिळा गप्प बसणं पसंत करते. कधी कधी वाटतं, आषाढात बोलणाऱ्या या बेडकांवर रचलेलं हे समाजाचंच एखादं रूपक तर नाही ना? म्हणजे समाजात दुर्जनांचा आवाज वाढला की सज्जन लोक काही काळ मौन धारण करतात…तसं काही?

ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा होऊन गेली की वेध लागतात ते आषाढाचे. पौर्णिमेनंतर काही दिवसांतच माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान असतं, त्यामुळे त्या निघायच्या आधी एकदा माऊलीचं तुकोबांचं दर्शन घेण्यासाठी देहू आळंदीला भक्तांच्या रांगा लागतात. साऱ्या आसमंतात एक उत्साह दाटून आलेला असतो. पावसाच्या हलक्या हलक्या सरींनी काही दिवसांतच होणाऱ्या मेघराजाच्या आगमनाची वर्दी दिलेली असते. इतके दिवसांच्या रुक्ष, तप्त वातावरणात एक आल्हाददायक बदल जाणवायला लागलेला असतो. उन्हाने करपून गेलेल्या माळरानावर अधेमधे हिरवे फटकारे दिसू लागतात. भूमीचे मार्दव सांगणारी हिरव्या कोंबाची लवलव दिसू लागते …आणि या अशा हळूहळू हिरव्या होऊ लागलेल्या भवतालात वाजत गाजत येते ती आषाढराजाची स्वारी.

‘…मेघरायाचं लगीन आभाळ वाजवी डफ। इजबाई करवली की येतीया झपझप…’ असं या आषाढ आगमनाचं वर्णन मालिनी आपल्या ओवीत करतात. आकाशात आलेला मेघ हा केवळ बरसण्यासाठी आलेला नाही तर तो धरित्रीशी विवाह करायला आलाय, नवरदेवाची स्वारी यावी तशी या मेघरायाची स्वारी ही ढगांच्या गडगडाटात येतेय आणि जिने तोरा मिरवलाच पाहिजे अशी करवली होते ती या मेघाबरोबर येणारी, चमकून जाणारी वीज. आषाढाच्या येण्याचं इतकं सुंदर, काव्यमय वर्णन या निसर्गकन्याच करू जाणोत.

हा आषाढ सुरू झालेला कळतो त्यांना.. जे निसर्गाच्या जवळ आहेत. जे निसर्गातला बदल अगदी सहज टिपू शकतात. पावसाच्या हलक्या हलक्या सरींचं रूपांतर आता संततधारेत होऊ लागतं. सूर्याचं प्रखर तेज झाकण्याचं सामर्थ्य आता ढगात आलेलं असतं. वातावरण थोडंसं कोंदट, पण तरीही रम्य असतं. उन्हाळ्यात अंगोपांगी बहरणारी रंगीत फुलं… त्यांची जागा आता सोनटक्का, जाईजुईसारख्या पांढऱ्या पण सुगंधाने घमघमणाऱ्या फुलांनी घेतलेली असते. कोकिळेचा स्वर मूक झालेला असतो आणि त्याची जागा बेडकांच्या डराव डरावने घेतलेली असते. खरंच आहे…दर्दुरा: यत्र वक्तार : तूष्णी तिष्ठति कोकिल:…दर्दुर म्हणजे जे सारखे डर डूर करतात ते बेडूक बोलायला लागल्यावर गोड आवाजाची कोकिळा गप्प बसणं पसंत करते. कधी कधी वाटतं, आषाढात बोलणाऱ्या या बेडकांवर रचलेलं हे समाजाचंच एखादं रूपक तर नाही ना? म्हणजे समाजात दुर्जनांचा आवाज वाढला की सज्जन लोक काही काळ मौन धारण करतात…तसं काही?

हा आषाढ सुरू झालेला कळतो त्यांना…जे संस्कृतप्रेमी आहेत, अभ्यासक आहेत, कालिदासाचे चाहते आहेत… कारण आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा करण्याची आपली रीत. खरं तर कालिदासाने स्वतःविषयी काहीही लिहिलेलं नाही म्हणजे त्याचा जन्म कधी झाला? कुठे झाला? त्याचे आईवडील कोण? तो कोणत्या राजाच्या पदरी होता? काहीच माहिती नाही. पण मग आषाढाचा पहिला दिवस त्याचा दिवस म्हणून का साजरा केला जातो? भारतीय मन हळवं आहे, आपल्या आवडत्या कवी-लेखकाबद्दल त्याला कमालीची आस्था आहे, त्याच्या जयंती, पुण्यतिथी या निमित्ताने त्याचं स्मरण करण्याची त्याला आवड आहे. जेव्हा त्या लेखकाच्या वैयक्तिäक जीवनाबद्दल कुठलीही माहिती मिळत नाही, तेव्हा रसिक त्याच्या साहित्यकृतीचं बोट धरतो. काfिलदासाच्या बाबतीत हेच झालं. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मग…त्याच्या सर्वांगसुंदर ‘मेघदूत’ काव्यातला ‘आषाढस्य प्रथम: दिवसे’ हा उल्लेख समोर ठेवून आषाढाचा पहिला दिवस हा रसिकांनी कालिदासाच्या नावावर केला. मेघदूताच्या दुसऱ्याच श्लोकात हा उल्लेख येतो. आपल्या राजाकडून म्हणजेच कुबेराकडून मिळालेली शिक्षा भोगण्यासाठी अलकानगरीपासून खूप दूर, निर्जन ठिकाणी एक यक्ष वस्तीसाठी आला आहे. आपल्या नगरीपासून वर्षभर दूर, आपल्या प्रिय पत्नीपासून वर्षभर दूर राहण्याचं अतिशय अवघड काम करतोय हा यक्ष. वर्षभरातले आठ महिने शिक्षा भोगून झाली आहे. आता उरलेत फक्त चार महिने. पण आषाढाच्या पहिल्या दिवशीच पाणी घेऊन निघालेला एक काळाकभीन्न असा मेघ त्या यक्षाला दिसतो, अस्वस्थतेला कसाबसा घातलेला बांध फुटतो आणि त्याचे डोळेही मेघासारखेच बरसू लागतात. आपल्या प्रिय पत्नीची त्याला अतिशय तीव्रतेने आठवण होऊ लागते. आषाढातला असा काळा मेघ पाहिल्यावर आपल्या प्रियजनांबरोबर राहणाऱ्या माणसाच्या चित्तवृत्ती ही बदलतात, मग आपल्या पत्नीपासून एवढ्या लांब एकट्या राहणाऱ्या यक्षाच्या डोळ्यात आसवं उभी राहणं हे किती स्वाभाविक..! आपल्या पत्नीला आपण सुखरूप आहोत हा निरोप पाठवला पाहिजे. जेणेकरून पुढचे काही महिने काढण्याचं बळ तिला मिळेल, असा विचार यक्षाच्या मनात येतो आणि समोर उभ्या राहिलेल्या मेघालाच दूत बनवून त्याच्या हातीच निरोप पाठवला तर? असा विचार यक्ष करतो आणि मेघदूत बनून निघतो…मेघाला दूत केलं ते आषाढाच्या पहिल्या दिवशी, एका विलक्षण कल्पनेला पंख लाभले आषाढाच्या पहिल्या दिवशी, आणि कवीच्या नावाबरोबरच ही तिथी ही संस्कृत साहित्यात अजरामर झाली…आषाढस्य प्रथम: दिवस: आषाढाचा पहिला दिवस उजाडला की संस्कृतप्रेमी न चुकता मेघदूत हाती धरतातच…त्यातले श्लोक म्हणतात, यक्षाची कथा सांगतात….नाम आणि काम या पलीकडे स्वतःविषयी काहीही न बोलणाऱ्या कालिदासाच्या स्मरणात पूर्ण दिवस घालवतात. साऱ्या रसिकांसाठी तो आनंददिवस असतो… संस्कृतची पालखी खांद्यावर घेऊन जाणारे हे वारकरीही आषाढातली ही मेघदूतवारी कधीही चुकवत नाही.. माघे मेघे वयो गतम् …म्हणजे मेघदूत वाचण्यात माणसांची वयं सरली…हे जे म्हटलं जातं ते अगदी खरं. आणि तीच गोष्ट पंढरीच्या वारकऱ्यांची. जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत वारी करायचीच हा इथला अलिखित नियम! ही वारी म्हणजे नेमकं काय? असं कोणी विचारलं तर सांगता येईल…

संसारातले अनेक प्रश्न मनात दाटून आले असतानाही सारं सारं विसरून मनाला कात टाकायची मिळणारी संधी म्हणजे वारी.
कोणीतरी आपला आहे, आपल्याला सांभाळणारा आहे, आपला योगक्षेम चालविणारा आहे….हा विश्वास आणि दिलासा निर्माण करणारी मनाची संजीवनी म्हणजे वारी.
वर्षभरात आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात काय काय घडलं हे त्या विश्वनियंत्याच्या कानावर घालायची सोय म्हणजे वारी.
प्रपंचातले कार्य प्र्रामाणिकपणे केलं की नाही याची त्या सर्वशक्तिमानाला कबुली देण्याची जागा म्हणजे वारी.
जीवनाचा रस्ता चुकला असेल तर ‘त्या’च्या साक्षीने पुन्हा एकदा योग्य रस्त्याला लागण्याची एक संधी म्हणजे वारी. थोडक्यात या आषाढात ही जीवनाची संजीवनीच आपल्याला मिळत असते.
याच आषाढात पडणारं भारतीय संस्कृतीचं आणखी एक उज्ज्वल प्रतिबिंब म्हणजे गुरुपौर्णिमा विंâवा व्यासपौर्णिमा… ‘भूतकाळाचा दिवा आणि भविष्याचा दिवा’ अशी `सर्वांगसुंदर सोपी व्याख्या गुरुदेव टागोरांनी केली. आपल्या जगण्याचं कारण दाखवू देणारा, आपल्या जीवनाचं नेमकं ध्येय दाखवून देणारा गुरु… त्याला संपूर्ण शरण जायचं. लीन व्हायचं. आपल्याला घडविणारा कोणीतरी असतो, याची कृतज्ञतेने जाणीव ठेवायला शिकविणारा हा दिवस. ‘साल में एक दिन गुरुदिन मनाया जाता है…बाकी दिन लोग उसे भूल जाते है’ बाकी दिन उसे भूल जाते यांच्या या ओळी खरंच विचार करायला लावतात. या एका दिवसाने काही खरंच घडतं का? असं प्रश्नही काहीना पडतो. हा एक दिवस जो आपल्या संस्कृतीने सांगितलाय तो सर्वांनी मिळून गुरूचा गौरव करण्याचा एरवी दर क्षणी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त होतच असते. कधी कृतीतून तर कधी मूकपणे. याच दिवसाची महर्षि व्यासांचंही स्मरण करायचं…महाभारत, भागवत, पुराणे, वेदांचं विभाजन. केवढा कामाचा आवाका…की आपण अवाक होऊन जावं… व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं…. म्हणजे व्यासांनी सारं जग उष्टं केलं असं म्हटलं जातं, म्हणजेच व्यासांनी जे जे म्हणून लिहिलं तेच नवीन नवीन होऊन येतं. म्हणजेच सगळ्याचे कर्ते व्यासमुनी! येन प्रज्ज्वालितो ज्ञानमय: प्रदीप:…ज्यांनी ज्ञानाचा दिवा उजळवला अशा व्यासांना वंदन!

किती चैतन्यमय हे सारेच उत्सव…बाहेर धारांचा पाऊस आणि अंतरंगात चैतन्याचा पाऊस…याशिवाय कांदेनवमी, दिव्याची आवस या तिथीही उत्साह द्विगुणित करणाऱ्या. कांदा वातूळ म्हणून पावसाळ्यात खाऊ नये हे खरं शास्त्र…. पण असं सांगण्यापेक्षा श्रावणात आणि शक्य असेल तर चातुर्मासात कांदा खाऊ नये असं त्याला धार्मिक अधिष्ठान दिलं कि लोक मनापासून पाळतात. पुढचे चार महिने कांदे खायचे नाहीत म्हणून आषाढात कांद्याचे पदार्थ खाऊन कांदे नवमी साजरी करायची. जेणेकरून पुढच्या चार महिन्यांची जिभेची इच्छा भागवायची. दमनापेक्षा शमन उत्तम हा आपल्या संस्कृतीचा विचार इथे दिसतो…थोडक्यात, या आषाढात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यात आपल्या संस्कृतीने माणसाच्या मनाचा, तब्येतीचा, संस्कारांचा सुंदर विचार केला आहे आणि उत्सव म्हणून ते सारसंचित आपल्या हाती सोपवलं आहे.

ता. क. हा आषाढ महिना भाषेतही मागे नाही… खरी सासू धरी कान, आखाड सासू मागे मान…ही म्हण किंवा मग अधिकार नसतानाही आपल्यावर अधिकार गाजविणारा एखादा आखाड सासरा ही असतोच की. पूर्वीच्या काळी आषाढात लग्न झालेल्या मुली माहेरी यायच्या, कारण म्हणे आषाढात सासू-सासऱ्यांचं तोंड पाहिलं तर सासू-सासऱ्यांना ते चांगलं नाही असं मानलं जाई. म्हणून त्या मुली माहेरी येत. अशा वेळी माहेरी कोणीतरी वृद्ध पुरुष किंवा स्त्री त्यांच्यावर अधिकार गाजवू पाही, त्यांच्याकडून कामं करून घेई तेव्हा आषाढापुरता सासरा किंवा सासू असं त्यांना म्हटलं जाई. त्यावरून या म्हणी आणि वाक्प्रचार भाषेत रूढ झाले.