साहित्य जगत- मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टींच्या निमित्ताने

>> रविप्रकाश कुलकर्णी

आता प्रकाशनाचा पसारा आवरता घेत आहे असं म्हणणारे नवचैतन्य प्रकाशनाचे प्रकाशक शरद मराठे नवीन पुस्तक प्रकाशित करत असतात. त्यांचा हा झपाटा काही औरच आहे. परवाच्या भेटीत म्हणाले, 6 जूनला कणेकरांच्या घरी अनौपचारिकपणे शिरीष कणेकरांचं नवं पुस्तक प्रकाशित करतोय. तुम्ही या. आता नवचैतन्य प्रकाशनातर्फे कणेकरांची पुस्तकं प्रकाशित होणं हे काही नवीन नाही. किंबहुना, अलीकडच्या काळात कणेकरांची जास्तीत जास्त पुस्तकं नवचैतन्य प्रकाशनने काढलेली आहेत.

मग लक्षात आलं, 6 जून 2024 म्हणजे कणेकर गेल्यानंतरचा, त्यांचा आलेला पहिला वाढदिवस. म्हणजे वाचकाने लेखकाचा वाढदिवस लक्षात ठेवणं आणि तो साजरा करणं असा भाग्ययोग फारच थोडय़ा लेखकांच्या वाटय़ाला येतो. ते भाग्य कणेकरांना लाभलेलं होतं. तीच गोष्ट कणेकर गेल्यानंतरही त्यांचे चाहते जसे विसरले नाहीत तसे नवचैतन्य प्रकाशनाचे प्रकाशक शरद मराठेही विसरले नाहीत.

कणेकरांचं हे कितवं पुस्तक असेल? त्याचं नाव काय? असा मनात विचार आला आणि आठवलं, कणेकरांच्या पुस्तकांची नावंदेखील नामी असत आणि त्याच्यावरची मल्लिनाथीदेखील. राजा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाचे नाव आहे ‘एक्केचाळीस!’ आता या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं नाव आहे, ‘मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी.’

‘एक्केचाळीस’ नावाच्या पुस्तकाबद्दल कणेकर लिहितात, ‘पुस्तकाचं नाव एकदम वेगळं (म्हणजे विचित्र) आहे की नाही? ते वेगळं, विचित्र, काहीच्या बाहीच व अगदीच कोणी न ठेवलेलं आहे. म्हणून मला त्याचा मोह पडत असावा हे मी मान्य करतो. कुठलीही गोष्ट करण्यात आपण प्रथम असण्यात एक वेगळीच किक आहे. ‘स्टँड अप कॉमेडी’ रंगमंचावर आणणारा मी पहिला होतो (असं म्हणतात बाबा) त्याचप्रमाणे आगापिछा व अर्थ नसलेला आकडा हेच पुस्तकाचं नाव ठेवणाराही मी पहिलाच असू शकेन. (आचरटपणात पहिला ठरण्यात कसली कर्तबगारी आहे म्हणा!) नावाला तसा अर्थ नसला तरी अगदीच अर्थ नाही असं नाही. हे माझं एक्केचाळिसावं पुस्तक म्हणून नाव ‘एक्केचाळीस!’ ते अक्षरांत लिहावं की आकडय़ात, याबाबत माझ्या मनात संभ्रम होता. शेवटी अक्षरांचा विजय झाला. आता तरी या लेखनाला कोणी अक्षर साहित्य म्हणेल का?’

असं बरंच काही शब्दांशी खेळत, गमती करत कणेकर शेवटी म्हणतात, ‘पुस्तकाच्या नावावरून एवढा पसारा मांडणारा बहुधा मी पहिलाच लेखक असेन. यातही पहिला.’

अर्थात हे सगळं कणेकरांच्या चाहत्यांना नवं नाही.  ‘पुन्हा यादों की बारात’ पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत त्यांनी म्हटलंय की ‘आलम दुनियेतील माझ्या सर्वात आवडत्या हयात व्यक्तीला म्हणजे मलाच!’ याचाच पुढे बृहत अवतार म्हणजे त्यांचं आत्मचरित्र ‘मी माझे मला.’ त्यांनी असंही म्हटलंय की, लेखन क्षेत्रात मी आचरटपणाच्या सीमारेषेवर घुटमळतोय, काहींच्या मते मी ती केव्हाच ओलांडली आहे. लेखनाचं कसं स्वागत करायचं हे वाचकावर सोडून मी आपलं लिहिण्याचं काम करीत राहावं असं काही वाचकांचं मत आहे.

या वाचकांच्या पाठिंब्यामुळेच कणेकरांनी ‘वेचक शिरीष कणेकर’ आणि नंतर ‘कणेकरायण’ हे निवडक लेखनाचे संग्रह काढले आणि वर म्हटलं, ‘वेचक’चा तिसरा खंड येणार नाही याची वाचकांना ग्वाही दिलीय. अजून तरी मी ती पाळल्येय. पुढेही पाळीन.

आणखी एक आठवतंय, कणेकरांनी म्हटलंय की, पु. ल. देशपांडे यांचं पुल झालं. व. पु. काळेंचं वपु झालं, सुहास शिरवळकरचं सुशि झालं, पण शिरीष कणेकरांचं शिक का झालं नाही? त्यामुळेच की काय पुढे त्यानी ‘निवडक शि.क.’ (संपादक दिलीप ठाकूर) भाग एक/दोन (नावीन्य प्रकाशन) प्रकाशित केले. तर शिरीष कणेकरांच्या पुस्तकांच्या नावाबद्दल अशा अनेक गोष्टी सापडतील. आता थोडं कणेकरांच्या लेटेस्ट ‘मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी’ या पुस्तकाबद्दल. ‘सामना’च्या उत्सव पुरवणीत हे लेख प्रसिद्ध झाले होते. नावावरून असा समज होतो की, मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी कणेकर सांगणार… पण प्रत्यक्षात असं नव्हतं. होतं काय तर कणेकरांनी छोटय़ा छोटय़ा लेखातून मोठय़ा लोकांच्या आठवणी सांगितल्या आहेत! यामध्ये दिलीप कुमार, लता मंगेशकर या त्यांच्या कायम जिव्हाळ्याच्या विषयाबरोबरच देव आनंद, राज कपूर यांच्या आठवणी येणं अपरिहार्यच. सी. रामचंद्र, अनिल विश्वास, नौशाद, सुधीर फडके अशा संगीतकारांच्या आठवणी आहेत. व. पु. काळे, वि. वा. शिरवाडकर, विद्याधर गोखले अशा लेखकांच्या पण आठवणी आहेत. सचिन तेंडुलकर, डॉन ब्रॅडमन यांची पण हजेरी आहे. एकूण 34 जणांच्या छोटेखानी आठवणी यात आहेत.

मात्र शिरीष कणेकर म्हणजे वाचनीयता हे वैशिष्टय़ या छोटय़ा लेखांतूनही हमखास दिसते. ‘मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी’ या नावाने कदाचित गैरसमज होईल म्हणून की काय, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक मोठं झाड आणि त्याला लागूनच आलेली छोटीशी फांदी आणि त्यावर दोन चिमुकले पक्षी, असं चित्र आहे. चित्रकार आहेत अविनाश कुंभार. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यायला हवी.