
>>आसावरी जोशी
कोल्हापुरची अंबाबाई… विठुमाऊली… ही सारी दैवते आपल्या जीवीची आवडी. आपली प्रत्येक संवेदना त्यांच्याशी जोडलेली. पण अनेक हजार वर्षाचा वारसा लाभलेल्या या मूर्तींची झीज का होते…? त्यावर काय उपाय करता येतो…?
गणपती बाप्पा… विठोबा… आदिमाया अंबाबाई यांचे सगुण साकार रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनाच्या जीवीची आवडी. मिटल्या डोळय़ांनी आपल्या प्राणप्रिय भक्तांवर अविरत माया करणारा विठोबा… निरागस हिरव्याशार डोळय़ांनी येणाऱया प्रत्येक भक्तावर प्रेमळ लक्ष ठेवणारा आपला सिद्धिविनायक.. आणि वात्सल्य व कर्तव्य ही दोन्ही रूपे तितक्याच समर्थपणे पेलणारी आदिशक्ती… आपल्या साऱयांचे चित्त, प्रश्न, समस्या, अगदी प्रत्येक अडचण या परब्रह्मांच्या पायाशी लीन होतात. हर एक सुखदुःख त्यांना सांगितले जाते. मनीचे गुज त्याच्याशी बोलले जाते. अगदी प्रत्येकाला त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा स्पर्श अनुभवायचा असतो.. दह्यादुधाच्या अभिषेकाने आपली भक्ती, श्रद्धा, कृतज्ञता दर्शवायची असते. आपली प्रेमळ, उत्कट भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते..
भक्तीचे, आराधनेचे, उपासनेचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानदेवांच्या मते यामध्ये सर्वश्रेष्ठ ठरते ती मानसपूजा. यामध्ये प्रत्येक सोपस्कार, प्रत्येक संस्कार मनातून, मनापासून केला जातो. येथे प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता नसते. पण आपल्याकडे सगुण साकार भक्ती खोलवर रुजली आहे. त्यामुळे षोडशेपचार पूजा, अभिषेक, सिंदूरलेपन इ. गोष्टी आपल्या उपासनेचा अविभाज्य भाग ठरतात.
ही आपली सारी श्रद्धास्थाने अक्षरशः अनेक हजार वर्षांचा वारसा सांभाळून, जपून ठाम उभी आहेत. आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर दह्यादुधाचा, सोळा संस्कारांचा प्रेमळ मारा मनापासून स्वीकारत… पण तरीही निसर्ग आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींना अनावर भक्तीपुढे कुठेतरी मर्यादा आहेतच. यातूनच या आपल्या श्रद्धास्थानांच्या मूर्तींची झीज सुरु होते. विठ्ठलपंतांचे नाजुकसे राजस पाय अजूनच तोळामासा झाले आहेत. देवीआईच्या मायेचा पाझर अखंड असला तरी दगडी मूर्तीला कुठेतरी मर्यादा आहेतच. काय आहेत या मर्यादा, का होते ही मूर्तींची झीज.. काय आहे त्यामागील विज्ञान…?
देखण्या मूर्तिकलेमागे विज्ञान आहे, तंत्रशुद्ध शास्त्र आहे. जे आपल्याकडेही अनेक शतकांपासून प्रचलित आहे. याबाबत सविस्तर माहिती ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे आणि वज्रलेपनकार स्वाती ओतारी यांनी दिली. आपल्याकडे सर्वसामान्यपणे संगमरवरी मूर्ती असतात. पण ज्या अतिप्राचीन मूर्ती आहेत त्या बेसाल्ट या दगडापासून घडविल्या आहेत. विठोबा आणि अंबाबाईची मूर्ती बेसाल्टपासूनच घडविली आहे. विठोबाच्या मूर्तीचा शोध आपल्याला 400व्या शतकात घेऊन जातो. कोल्हापूरची अंबाबाईही तितकीच प्राचीन आहे. जगभरात सर्वसाधारणपणे बेसाल्टच्याच मूर्ती घडविल्या जातात. पण बाहेरच्या देशात त्यांच्यावर थेट पाण्याचा, दह्यादुधाचा अभिषेक केला जात नाही किंवा कुंकवाचा अतिरिक्त वापरही केला जात नाही. पण आपल्याकडे केला जाणारा पंचामृताचा अभिषेक मूर्तीची झीज होण्यास कारणीभूत असतो. यामधील सर्वात महत्त्वाचा आणि मूर्तीचे नुकसान करणारा पदार्थ म्हणजे दही. त्याच्या आम्ल गुणधर्मामुळे मूर्तीच्या दगडावर परिणाम होण्यास सुरुवात होते. शिवाय पंचामृत स्नानानंतरचा ओशटपणा जाण्यासाठी देवास गरम पाण्याने सचैल स्नान घातले जाते. यामुळेही मूर्तीची झीज होते. मारुतीरायाला तेलाचा अभिषेक केला जातो. त्याला आणि गणपती बाप्पाला सिंदूरलेपन केले जाते. यामध्ये सिंदुराचे थरच्या थर चढून त्यामध्ये आत पाणी, तेल साचते. आणि ते कधीतरी बाहेर येते. मग देवाच्या डोळय़ातून पाणी आल्याचा भास होतो.
खरे पाहता यावर सोपा सुटसुटीत तर्कसंगत उपाय म्हणजे मूर्ती बदलणे. पण त्या मूर्तीशी आपल्या धार्मिक भावना खूप घट्टपणे रुजल्यामुळे, जोडल्या गेल्यामुळे आपल्या मनीच्या देवाच्या जागी दुसऱया मूर्तीची कल्पनाही आपण सहन करू शकत नाही. मग ही झीज थांबविण्याचा सोपा उपाय म्हणजे वज्रलेपन. स्वाती ओतारी या एकमेव महिला वज्रलेपक आहेत. वज्रलेपनाचे दोन प्रकार असतात. एका प्रकारात रसायने वापरली जातात. तर बऱयाचदा अजूनही पारंपारिक घटकांचा वज्रलेपनामध्ये वापर केला जातो. यामध्ये बेसाल्टचा चुरा, डिंक इ. घटक असतात. या अतिप्राचीन मूर्तींवर हवेच्या बदलाने क्षते पडतात. त्यातून हे दही, कुंकू त्यात जाऊन बसते. आणि हळूहळू मूर्ती झिजण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. वज्रलेप देणे म्हणजे झिजलेली मूर्ती पूर्ववत करणे. सिंदूरलेपनाने मूर्तीचे संरक्षण होते. पण त्याचेही दुष्परिणाम असतातच. हा वज्रलेप पाच–सहा वर्षांनी पुन्हा द्यावा लागतो; पण वज्रलेप दिला तरी अभिषेकापासून मूर्तीचे संरक्षण करणे केव्हाही चांगले.
ही आपली सारी दैवते आपल्या सुखदःखाचे सोबती. कष्टाने शिणलेल्या मनास गारवा तेच आपल्याला देतात. मग थोडा डोळस दृष्टीकोन ठेवून आपण आपली भक्ती, प्रेम त्यांना दिले तर आपल्या या देवांचे विज्ञाननिष्ठ असणे सिद्ध आणि साध्य होईल.
हे करून पाहूया
देवाशी मनाने जोडले जाणे सगळय़ात महत्त्वाचे.
मानसपूजेवर भर दिला तर बऱयाच गोष्टी साध्य होतील.
सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे धार्मिक स्थळांच्या जागी होणारी अनाठायी गर्दी कमी होईल.
मूर्तीचा प्राचीन वारसा सहज जपला जाईल.
अभिषेकाकरिता प्रतीकात्मक पितळेची मूर्ती वापरावी.
त्यामुळे मूर्तीची झीज होण्याचे प्रमाण कमी होईल.























































