
>> अरुण जोशी
संगीताची भाषा वैश्विक असते. म्हणूनच हिंदी कळत नसलेल्या कोणा आफ्रिकन माणसाला लतादीदींचे स्वर मोहित करतात आणि मोझार्टसारख्या अठराव्या शतकातल्या संगीतकाराची धून आपल्या हिंदी गाण्याला साज देते. त्यामुळे देशभरच्या गायक – गायिकांनी विविध हिंदुस्थानी भाषांमध्ये गायलेली गाणी हे आश्चर्य नव्हे, पण आदरपूर्वक कौतुकाची गोष्ट मात्र आहेच. ‘नाद मराठी’मध्ये गेल्या दोन लेखांत आपण गंगूबाई हनगल आणि भीमसेन जोशी या कर्नाटकातील गायकांच्या गाण्यांविषयी वाचलं. त्यापैकी भीमसेन तर पुढे महाराष्ट्रीयच झाले. याच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित कुमार गंधर्व.
शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली यांचा जन्म बेळगावजवळच्या सुलेभावी इथे 8 एप्रिल 1924 रोजी झाला. अगदी बालपणीच संगीताची मैफल रंगवणाऱया या मुलाला ‘कुमार गंधर्व’ म्हटलं जाऊ लागलं. नंतर तेच त्यांचं नाव म्हणून रसिकप्रिय ठरलं. कुमारांच्या 1937 मध्ये घेतलेल्या एका फिल्ममध्ये ते अवघ्या दहा वर्षांचे असताना ‘गोवर्धन गिरीधारी’ ही चीज सादर करताना दिसतात. हिराबाई बडोदेकरांनी गायलेली ही धून अप्रतिमरीत्या सादर करताना दिसतात. त्या काळात असं चित्रीकरण करून ठेवण्याने हिंदुस्थानी संगीतातला एक अमूल्य ठेवा जतन केला असल्याचं लक्षात येईल. आपल्याकडे एकूणच अर्कायक्हल किंवा जपणुकीची अनास्था असताना हे चित्रण अधिकच महत्त्वाचं वाटतं.
कुमारांचं हे गाणं ऐकल्यावर ‘हंस अकेला’सुद्धा जरूर ऐका. कुमारांची गंधर्व गायिकी त्यातून प्रतीत होईल आणि अशी कितीतरी गाणी आहेत. पहाटेच्या वेळी रेडिओवर लागणारी त्यांची भजनं एका वेगळ्याच पवित्र वातावरणात घेऊन जातात. बालगंधर्वांच्या गायिकीचा बोलबाला कुमार गंधर्वांच्या बालपणात खूपच होता. संपूर्ण हिंदुस्थानात बालगंधर्वांचं नाव गाजत होतं. त्यामुळे त्या काळातील उदयोन्मुख आणि तेजस्वी गायकांना गंधर्व पदवी मिळायची. कुमार गंधर्वांनी ती सार्थ केली आणि कालांतराने ‘मला उमगलेले बालगंधर्व’ असा कार्यक्रमही केला. त्यावेळी प्रसिद्ध झालेली कॅसेट आमच्याकडे आहे. त्यातून कुमार गंधर्वांच्या स्वरातील अनेक ‘जागा’ आपल्या कानी पडतात.
पंडित कुमार गंधर्वांची स्वरसाधना आणि स्वराविष्कार ऐन बहरात असताना वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी त्यांना दुर्धर व्याधीने ग्रासलं आणि पु.ल.देशपांडे यांच्यासारखे त्यांचे जिवलग मित्र तसेच हजारो रसिकांच्या काळजाचा ठोका चुकला. एका विलक्षण गायकीचा गोड गळाच स्तब्ध झाला होता. हवापालट करून प्रकृती सुधारावी यासाठी कुमारजी सहकुटुंब मध्य प्रदेशातल्या देवास इथे जाऊन राहिले. त्या सहा वर्षांच्या काळात त्यांना स्वरसाधना करता आली नाही. विख्यात गायकाच्या मनाला किती यातना देणारे हे दिवस! परंतु कुमारांनी शांतपणे संगीतावर चिंतन करण्यास सुरुवात केली. माळवा प्रांतातलं आसपास कानी पडणारं लोकसंगीत त्यांनी मनात साठवलं. स्वतंत्र रागनिर्मितीचा विचार केला, परंतु त्यातलं काहीही त्यांना स्वरांकित करता येत नव्हतं. अखेर प्रभावी औषधोपचारांनंतर हे ग्रहण सुटलं! कुमारांचा स्वर पुन्हा मोकळा झाला. नव्याने मैफली होऊ लागल्या. पंडित कुमार गंधर्व नावाचा तेजस्वी तारा पुन्हा तळपत राहिला.
आता नव्या संगीतमय आविष्कारांसह ते श्रोत्यांसमोर येऊ लागले. याच काळात त्यांची मराठी भावगीतं आणि नाटय़गीतं गाजली. कवी अनिल यांची ‘अजूनि रुसून आहे’ आणि ‘आज अचानक गाठ पडे’ ही कुमार गंधर्व शैलीतील भावगीतं आठवून पहा. मराठी नाटय़गीतं तर कुमारांनी भरपूर गायली आहेत… कशी त्या त्यजू पदाला (सं.एकच प्याला) यदुमनी सदना (सं. स्वयंवर), उठी उठी गोपाळा (भूपाळी, सं. देव दीनाघरी धावला). याच नाटकातलं ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे द्वंद्वगीत कुमारांनी वाणी जयराम यांच्यासह गायलं. नाटकाचं संगीत वसंत देसाई यांचं होतं. याशिवाय बालगंधर्वांनी गायलेली अनेक नाटय़गीतं कुमारांनी गायली.
हा लेख लिहिताना एक विशेष गोष्ट लक्षात आली की, कुमारांनी कविवर्य भा.रा.तांबे यांचीही गीतं गायली आहेत. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांनी गायलेली ‘नववधू प्रिया मी बावरते’ किंवा ‘मधू मागसी माझ्या सख्यापरि’ ही गाणी आठवत असतीलच. तर तीच गाणी पं.कुमार गंधर्वांनीही गायली आहेत आणि यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. कुमारांच्या आवाजात शास्त्र्ााrय संगीतामधील आलापीच्या छटेसह ‘नववधू प्रिया मी।़।़ बावरते’ आणि ‘मधू मी।़।़ लनात या’ ऐकायला वेगळंच आणि छान वाटतं.
संगीताबाबत जीवनभर प्रयोगशील राहिलेल्या कुमारांच्या ‘ऋणानुबंधाच्या गाठी’ रसिकांशी घट्ट जुळल्या. पद्मभूषण (1977), पद्मविभूषण (1990) असे सन्मान प्राप्त झालेले कुमार ‘कौन ठगवा नगरीया लूट रह्यो’ ही भैरवी रंगवून गात असत. मुंबईत गुणीदास संमेलनात त्यांना ऐकण्याचा योग आला. हा ‘ठगवा’ म्हणजे यमपाश. तो अखेर सर्वांभोवतीच पडतो. कुमार गंधर्व वयाच्या सदुसष्टाच्या वर्षी हे जग सोडून गेले. त्यांचे अमर स्वर अनेक मनांना संजीवनी देत राहतील.





























































