जामताऱ्याच्या जंगलातले कॉल सेंटर

135

>> आशीष बनसोडे

झारखंड राज्य सध्या ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांमुळे बदनाम झाले आहे. तेथील जामतारा जिल्हा हा ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांचे प्रमुख केंद्र बनले आहे. नुकतीच पोलिसांनी या भागात धडक मोहिम राबवली. जामताराची ही माहिती देतानाच अशा कॉल सेंटरच्या फोन कॉलपासून सावधगिरी बाळगताना काय करावे हे सांगणारा हा लेख.

जमाना ऑनलाइनचा आहे. सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगार तरी कसे मागे राहतील! काळानुरूप बदलणाऱ्या गुन्हेगारी विश्वानेदेखील गुन्हे करण्याची पद्धत बदलली आहे. इंटरनेट आणि ऑनलाइन कामकाजाला आपलंसं करीत गुन्हेगारांनीदेखील कुठेही बसल्या बसल्या नागरिकांना ऑनलाइन फसवून पैसा कमावण्यावर जोर धरला आहे. बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपत आलीय, कार्ड चालू ठेवण्यासाठी आवश्यक माहिती द्या अशी बतावणी करून नागरिकांना चुना लावण्याचे प्रमाण प्रंचड वाढले आहे. झारखंडच्या जामतारा जिह्यातील तरुण अशी फसवणूक करीत आहेत.

झारखंड राज्य सध्या ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांमुळे बदनाम झाले आहे. तेथील जामतारा जिल्हा हा ऑनलाइन फ्रॉड करणाऱयांचे प्रमुख केंद्रच बनले आहे. जामताऱ्यातील जंगलांना तेथील तरुणांनी कॉल सेंटरच बनवले आहे. जामतारा येथील सुंदोरजोरी गावचा तरुण सीताराम मंडल हा 2010 साली नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. कधी ढाब्यावर तर कधी रेल्वे स्थानकात काम केल्यानंतर त्याने एका कॉल सेंटरमध्ये नोकरी पटकवली. दोन वर्षांत त्याने बँकांचे ऑनलाइन कामकाज आत्मसात केले. त्यानंतर 2012 मध्ये नोकरी सोडून त्याने आपले गाव गाठले. लोकांशी कसे बोलून त्यांची बँक डिटेल मिळवायची आणि मग त्या आधारे त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून आपल्या बँक खात्यात कसे वळते करायचे हे मंडलला चांगलेच समजले होते. याचाच गैरफायदा उचण्यास त्याने सुरुवात केली. काही तरुणांना हाताशी धरून सीतारामने त्यांना प्रशिक्षित केले. मग कॉल करायचे कुठून हा प्रश्न उभा ठाकला. कोणाला आपल्या गोरखधंद्याचा सुगावा लागता कामा नये अशी जागा शोधण्यास त्यांनी सुरुवात केली. तेव्हा धनदाट जंगल त्यांना कॉल सेंटरसाठी सुरक्षित जागा वाटली. जंगलात जाऊन कुठल्याही मोबाईल क्रमांकावर फोन करायचा आणि संबंधिताचे बँक डिटेल्स मिळवायचे मग त्यानंतर त्यांची फसवणूक करून पैसे लाटायचे असा दिनक्रम मंडल आणि त्याच्या मित्रांचा सुरू झाला. बघता बघता त्याच्याकडे लाखो रुपये आले. मग त्याच्यासह त्याच्या मित्रांनी गावात साध्या रस्त्याचा पत्ता नसताना टुमदार बंगले बांधले, दारात महागडय़ा एसयूव्ही चारचाकी तसेच दुचाकी गाडय़ा उभ्या राहू लागल्या. घरांचे दरवाजे रिमोंट कंट्रोलचे झाले, फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवरून ऑनलाइन शॉपिंग सुरू झाली. हळूहळू हे लोण गावात, मग नंतर आजूबाजूच्या गावात पसरू लागले. आजच्या तारखेला जामतारा जिह्यातील जवळपास सर्वच गावातील तरुण ऑनलाइन फ्रॉड करण्यात एक्सपर्ट बनले असून त्याआधारे पैसे कमावून मातब्बर बनले आहेत.

देशभरात कुठेही बँकेच्या नावे फोन करून नागरिकांची फसवणूक झाल्यास पोलीस आरोपींना शोधायला जामतारामध्ये धडकतात. जंगलात बांधलेले मोबाईल टॉवर आणि दोन मोबाईल घेऊन सकाळी 10 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान तेथील तरुण कॉल सेंटर थाटून बसतात. त्यामुळे एटीएम कार्ड फसवणुकीतल्या आरोपीला पकडायला पोलीस दुसरे कुठेही न जाता झारखंड गाठतात. परिणामी देशपातळीवर झारखंडचे नाव बदनाम होऊ लागले होते. याची झारखंडचे पोलीस महासंचालक डी. के. पांडे यांनी गंभीर दखल घेतली आणि जामतारामध्ये सुरू असलेले भामटय़ांचे जंगलातले कॉल सेंटर उॊद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली. जामताराच्या पोलीस अधीक्षिका डॉ. जया रॉय यांच्या नेतृत्वाखाली सायबर विभागाचे उपअधीक्षक सुमित कुमार यांनी ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सात महिन्यांत पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल करून शेकडो भामटय़ांना अटक करून दोनशेहून अधिक मोबाईल जप्त केले तर असख्य बनावट सिमकार्ड हस्तगत केले. लोकांच्या पैशांवर खरेदी केलेल्या गाडय़ा जप्त केल्या. शिवाय ज्या जंगलांमध्ये कॉल सेंटर चालते तेथे खडा पहारा ठेवण्यास सुरुवात केली आहे.

जया रॉय आणि सुमित कुमार झारखंडचे नाव आणखी बदनाम होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, पण झटपट पैसा कमावण्याची चटक लागलेल्या तिकडच्या तरुणांना रोखणे अवघड काम बनले आहे. आजही ते तरुण गुपचूप जंगलात जातात आणि झाडांवर चढून लोकांना फोनाफोनी करतात. लोकांवर इम्प्रेशन पडावे यासाठी तरुणांनी संभाषण कौशल्य आणि इंग्रजीचे क्लासेस लावले आहेत. या भामटय़ांना रोखायचे असेल तर नागरिकांनी शहाणे बनले पाहिजे. कुठल्याही बँकेचे अधिकारी कर्मचारी मोबाईलवर फोन करून बँक किंवा एटीएम कार्डची डिटेल मागत नाहीत. ओटीपी नंबर तर अजिबात विचारत नाहीत. जामताराचे तरुण नेमके हेच काम करतात. ते बँक किंवा एटीएम कार्डची डिटेल मागतात आणि लोक ते देऊन फसतात. त्यामुळे आता नागरिकांनीच कोणालाही आपल्या बँकेची डिटेल देऊ नये. जर काही असेल तर बँकेशी संपर्प साधून विचारपूस करावी, पण मोबाईलवर बोलणाऱ्या कॉलरला अजिबात काही सांगू नये असे केले तरच झारखंडच्या तरुणांना बेक लागेल आणि ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे होणार नाहीत.

आशीष बनसोडे
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या