
>> अस्मिता प्रदीप येंडे
मानवाला आपल्या भावना व्यक्त करण्याचे वरदान मिळालेले आहे. कुणी संवाद साधून व्यक्त होते, तर कुणी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होते. अकचित्रांतून व्यक्त होणारे सतीश खोत यांचे ‘अर्करेषा’ हे पुस्तक विविध अर्कचित्रांचे बोलके कलेक्शन (अर्कचित्रसंग्रह) आहे. या पुस्तकात राजकारण, साहित्य, खेळ तसेच विविध कलासंपन्न व्यक्तिमत्त्वांचे अर्कचित्र साकारले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, चित्रकार वासुदेव कामत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, मराठी सिनेविश्वातील नागराज मंजुळे, गौरव मोरे , ािढकेट विश्वातील कपिल देव, विराट कोहली, साहित्य विश्वातील वि. वा. शिरवाडकर, अशोक नायगावकर, अशोक समेळ, अशोक बागवे, भालचंद्र नेमाडे, डॉ. रवींद्र शोभणे, शारदा प्रकाशनाचे डॉ. संतोष राणे, प्रदीप म्हापसेकर अशा विविध व्यक्तींची अर्कचित्रे या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत.
हे पुस्तक पाहताना जाणवते की, त्या त्या व्यक्तीचे अर्कचित्र रेखाटताना खोत यांनी कुठेही त्या व्यक्तीच्या मूळ व्यक्तित्वाला धक्का न लावता त्या व्यक्तीचे अस्सल व्यक्तिमत्त्व, त्यांची विचारसरणी, भूमिका चित्रातून पोहोचवली आहे. खोत यांनी साकारलेल्या अर्कचित्रांमध्ये फक्त ती व्यक्ती दिसत नाही, त्या व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या हावभावातून कळत जातो. प्रत्येक अर्कचित्रावर त्या त्या व्यक्तीची खासियत अधोरेखित करणाऱया ओळीसुद्धा दिल्या आहेत. एकूण 80 पानांचे हे रंगीत पुस्तक आहे. सतीश खोत यांनी मनोगतात व्यंगचित्र आणि अर्कचित्र यातील फरक समजावून सांगत रेषांची स्वतची अशी भाषा असते, त्या भाषेचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे अर्कचित्र पाहायला मिळते. तसेच मलपृष्ठावर जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी मार्मिक विवेचन केले आहे. चित्रकाराच्या नजरेतील प्रतिमा कागदावर जेव्हा उमटते तो क्षण अनमोल असतो, असाच निस्वार्थ आनंद देणारी ही कलेची अनुभूती नक्की संग्रही ठेवा.
अर्करेषा – अर्कचित्रसंग्रह चित्रकार : सतीश खोत
प्रकाशक : शारदा प्रकाशन
मूल्य : 400 रुपये




























































