पावसातही खेळा मनमुराद

बाळ तोरसकर, baltoraskar@gmail.com

पावसामुळे अनेकदा व्यायाम टाळण्याचे निमित्त मिळते. पण पावसात खऱया अर्थाने छान व्यायाम होतो….

मैदानी खेळात साधारणतः पावसाळ्यात व्यत्यय येत असतो व हा कालावधी खेळाव्यतिरिक्त कसा घालवायचा याची चिंता नेहमीच सर्वांना असते. खेळ व व्यायाम यांचा अनन्य साधारण संबध आहे. पावसाळ्याच्यावेळी मुख्य खेळव्यतिरिक्त इतरही खेळ खेळून खेळाडूंनी आपल्या क्रीडा गुणांना शाबूत ठेवण्यासाठी पूरक खेळ खेळावेत. खोखो, कबड्डी, क्रिकेट वगैरे मैदानी खेळ खेळताना या खेळांना पूरक असे खेळ आपल्याला खेळता येतात. या पूरक खेळांतूनही शरीराचा व्यायाम होतो व अशा व्यायाम प्रकारातूनही आपण खेळाचा आनंद मिळवू शकतो. उदा. दोरी उडया, उंच उडया, बेडुक उडया, छोटया शर्यती, लंगडी व मुख्य म्हणजे फुटबॉल. आता तर फुटबॉलचा विश्वचषकच सुरू असल्याने पावसाळा असूनसुध्दा फुटबॉल फिवर असल्याचे जागोजागी दिसून येते. जसे आपण मन लावून मुख्य खेळ खेळत असतो तसं इतर खेळसुध्दा व्यायाम म्हणून खेळल्याने आपल्या शरीरास पूरक व्यायामची साथ तर मिळतेच त्याचबरोबर पावसाळा संपल्यावर मुख्य खेळाच्या प्रवाहात यायला उशीर लागत नाही.

दोरी उडय़ा हा अनेकांचा आवडीचा खेळ असून तो कधीही आणि केंव्हाही खेळता येतो. मैदान ओले आहे, निसरडे झाले म्हणून न थांबता हा खेळ कोठेही खेळता येतो. उदा. लाकडी मैदानात, गवतावर, टणक भागावर किवा लादीवर, दोन घर – इमारतींच्या मध्ये, गच्चीवर कुठेही हा खेळ खेळता येतो. फक्त दोरीचा खर्च केला तर हा खेळ खर्चिक असा नाहीच. दोरी उडयांची स्पर्धा लावून सुध्दा हा खेळ म्हणून त्यातली मजा आपल्याला नक्कीच लुटता येते. ब्रयाच वेळा दोरी उडय़ा हा फक्त मुलींपुरता मर्यादित खेळ आहे असा चुकीचा गैरसमज आहे. खरेतर हा खेळ इतर खेळांना पूरक व भरपूर व्यायाम देणारा खेळ प्रकार आहे. केवळ दोरीच्या उडया मारता येतात हे यात महत्वाचे नसून तुम्ही किती वेळ न थांबता डोरी उडया मारू शकता हे देखील महत्वाचे आहे. त्यातूनच तुमचा स्टॅमिना लक्षात येतो. त्यासाठी तुम्ही दोन गट पाडू शकता व दोन्ही गटातील एकेकाने दोरी उडया मारायला सुरवात करायची व जो न थांबता जास्त उडया मारेल तो जिंकेल असे करत एकमेकांत शर्यत लावू शकता.

याचबरोबर पावसाळ्यात मैदानात चिखल झाल्याने किंवा निसरडे झाल्यामुळे इतर ठिकाणी बेडुक उडया, उंच उडया व लांब उडया, तीन पायांची शर्यत यांचाही सराव करता येवू शकतो किंवा त्यांच्या स्वतंत्र स्पर्धाही घेवू शकतो. उंच उडीच्या वेळी तुमच्यापैकी जे उंच असतील त्यांचा एक गट तयार करा व उरलेल्या इतरांसाठी दुसरा गट करा त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. मग खेळाडूंनी हातात खडू घेवून एखाद्या भिंतीलगत उभे राहून सर्वात उंच उडी मारायची व त्याचवेळी भिंतीवर खूण करायची. जो खेळाडू सर्वात उंच उडी मारेल तो जिंकेल असे दोन्ही गटात केल्याने निर्णय सुलभ होईल. जसे उंच उडया खेळताना दोन गट करायला सुचवले तसेच लांब उडय़ांच्या वेळीही साधारण जे उंच असतील त्यांचा एक गट तयार करा व उरलेल्या इतरांसाठी दुसरा गट करा व लांब उडय़ा मारण्याचा खेळ खेळावा. मात्र यात खेळाडू भिजलेला किंवा ओलसर असता कामा नये जेणेकरून उडी मारण्याची जागा ओली होऊन खेळाडूंना कोणतीही दुखापत होता कामा नये. यात काही खेळाडूंनी किंवा मार्गदर्शकांनी उडी किती लांब मारतात याची नोंद अंतर मोजून किवा खडूने खूण करून नोंदवून दोन्ही गटातील विजेता निश्चित करता येऊ शकतो. याच प्रमाणे बेडुक उडयांची शर्यत हा खेळही खेळू शकतो व तीन पायांची (दोन खेळाडू एकत्र येऊन त्यांचे बाजूबाजूचे म्हणजे एकाचा डावा व एकाचा उजवा पाय एकत्र बांधून) शर्यतही खेळता येऊ शकते. हे खेळ खेळल्याने पाय चांगले भरून येतील पण व्यायामही मस्त होईल. तेव्हा नेहमीच्या खेळांपेक्षा हे पूरक खेळ खेळून व्यायाम आणि खेळ दोन्हीची मजा लुटता येते.