>> डॉ. विवेक महाजन
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांना मध्यंतरी झोपेत हृदयविकाराचा झटका येऊन व त्यात त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या बाबतीत घडलेली घटना अशा अनेक दुर्दैवी घटनांपैकी एक होती आणि 27 टक्के हार्ट अटॅक्स हे झोपेमध्येच येतात असा अंदाज या विषयावरील पाहण्यांमधून मांडला गेला आहे. हार्ट अटॅक्स किंवा अचानक झालेले कार्डिअॅक अरेस्ट या घटना दिवसाच्या वेळी अधिक प्रमाणात घडतात. मात्र रात्री झोपेतही त्या घडण्याची उदाहरणे दुर्मिळ नाहीत.
तरीही योग्य लक्षणांना समजून घेतल्यास काही रुग्णांचे प्राण वाचविता येणे शक्य आहे. अशीच एक दुर्मिळ घटना 50 वर्षीय भरत यांच्या बाबतीत घडली. बदलापूर इथे राहणाऱ्या भरत यांनी आपल्याला लक्षणे जाणवू लागल्यावर तत्परतेने पृती केली, तत्काळ वैद्यकीय मदत मिळवली, ज्यामुळे त्यांना वेळीच आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत झाली. कामावर जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर ते लगेच डॉक्टरांकडे गेले. तिथे इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) काढला असता त्यात खूप मोठे चढ-उतार दिसून आले, त्यांचा रक्तदाबही वरखाली होत होता. क्लिनिकमध्ये असतानाच ते कोसळले आणि त्यांच्यावर तातडीने CPR (कार्डिओ पल्मनरी रिससायटेशन) दिले गेले. त्यांना हार्ट अटॅक येऊन गेल्याची पुष्टी त्यांच्या मेडिकल रिपोर्टस्मधून झाली. त्यांना लगेच त्यांच्यावर कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली व त्यानंतर तातडीने प्रायमरी अँजिओप्लास्टी केल्यावर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. काही आठवडय़ांपूर्वी भरत यांनी आपली दोन मुले व पत्नीसह आपला 50वा वाढदिवस साजरा केला. आपल्याला जाणवलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष न केल्यामुळेच हे शक्य झाले. या उदाहरणातून हार्ट अटॅकची लक्षणे समजून घेणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते आणि जीवदान देणारी उपाययोजना म्हणून CPR चे महत्त्व जितके सांगावे तितके थोडे आहे.
अमोल काळे यांना मात्र ते झोपेत असताना कार्डिअॅक अरेस्ट झाले. सर्वसाधारणपणे झोपेत येणाऱ्या हार्ट अटॅकच्या वेळीही हा प्रसंग दिवसा घडल्यास जाणवू शकणाऱ्या प्री-मॉनिटरी लक्षणांसारखी लक्षणे जाणवू शकतात. झोपेमध्ये कार्डिअॅक अरेस्ट होण्याचे प्रकार हे वयोवृद्ध आणि अधिक आजारी व्यक्तींच्या बाबतीत जास्त प्रमाणात जाणवतात हेही खरे आहे. मात्र अशा घटना तुलनेने तरुण व्यक्तींच्या बाबतीतही घडू शकतात.
थकल्यावर धाप लागणे किंवा छातीत जड जड वाटणे, खूप जास्त व लवकर थपून जाणे, थकल्यावर दरदरून घाम येणे आणि चक्कर आल्यासारखे वाटणे ही त्याची काही लक्षणे आहेत, जी काही आठवडय़ांपासून, दिवसांपासून किंवा तासांपासून वाढत आहेत असे जाणवल्यास ती ब्लॉकेजेसची स्थिती बिकट होत चालल्याची खूण असते व त्यातून येऊ घातलेल्या प्रसंगाची पूर्वसूचना मिळू शकते. मात्र काही वेळा ही घटना धोक्याची कोणतीही सूचना न देता घडू शकते. झोपेमध्ये कार्डिअॅक अरेस्टची घटना सर्वसाधारणपणे हृदय कमपुवत असलेल्या लोकांच्या बाबतीत घडते आणि त्यांनाही नजरेसमोर अंधारी येणे किंवा हृदयाची धडधड वाढण्यासारख्या धोक्याच्या सूचना मिळालेल्या असू शकतात.
झोपेमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढविण्यात योगदान देणारे कोणकोणते घटक आहेत हे निश्चित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाहण्या केल्या जात आहेत. अगदी साध्यासोप्या शब्दांत हे समजून घ्यायचे तर झोपेचे दोन टप्पे असतात. यापैकी NREM (नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट) स्लीप या पहिल्या टप्प्यामध्ये स्नायू शिथिल होतात, रक्तदाब कमी असतो व नाडीचे ठोके धीमे असतात. REM (रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप) या टप्प्यामध्ये स्नायूंचे आपुंचन, रक्तदाब व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. या दोन टप्प्यांपैकी एखाद्या टप्प्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण अधिक आहे का आणि रक्तदाब व नाडीच्या ठोक्यांतील हे चढ-उतार हार्ट अटॅक येण्यास पूरक ठरतात का? यावर अद्याप संशोधन सुरू आहे. घोरणे आणि दिवसभर झोपेची गुंगी राहणे यांसारखी लक्षणे असणाऱ्या ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अपीना (OSA) या समस्येकडे झोपेमध्ये हार्ट अटॅक व कार्डिअॅक अरेस्ट होण्यामध्ये योगदान देणारा घटक म्हणून अधिकाधिक प्रमाणात पाहिले जात आहे. त्याला रोखण्यासाठी वेळच्या वेळी तपासण्या करून घेणे अत्यावश्यक आहे.
म्हणूनच आजाराने गंभीर रूप धारण करणे टाळण्यासाठी किंवा अत्यंत वाईट स्थितीमध्ये मृत्यू टाळण्यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी वेळच्या वेळी स्क्रिनिंग करणे आणि तत्काळ वैद्यकीय मदत मिळविण्यासारखी आवश्यक पावले आपणहून उचलणे सर्वोत्तम ठरते. कारण अशी लक्षणे आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी टाळण्यासारख्या आहेत.
(कन्सल्टन्ट-इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, पहर्टिस हॉस्पिटल, कल्याण)