
>> डॉ. स्वप्नील तोरणे
गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण आणि संशोधन कार्यात भरारी घेणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जागतिक स्तरावर कार्याचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य केले आहे. विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा केल्या. त्यामुळे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स निर्माण करण्यात विद्यापीठाच्या सिंहाचा वाटा आहे. विद्यापीठाच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्त…
महाराष्ट्रात 3 जून 1998 रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाची मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर येथे विभागीय केंद्रे आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी 193 संलग्नित महाविद्यालये होती. आजपावेतो 425पेक्षा अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या आजवरच्या कार्यामुळे येथे शिक्षित झालेले डॉक्टर्स आणि इतर पॅरामेडिकल्स आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम काम करीत आहे.
विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा केल्या. त्यामुळे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स निर्माण करण्यात नाशिकचा सिंहाचा वाटा आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विद्यापीठाला मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर हे प्रादेशिक विभाग जोडण्यात आले आहेत. यामुळे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्राचे असले तरी माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने कामकाज सुयोग्यरीत्या कार्यरत आहे.
आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठातर्फे अनेक नवीन व अभिनव उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. कोविड-19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले. या परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला असल्याचे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या जाहीर भाषणात सांगितले.
युक्रेन येथील युद्धजन्य परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आरोग्य विद्यापीठ व इल्सेविअर या संस्थेच्या विद्यमाने डिजिटल कटेंण्ट तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून ऐच्छिक व ऑनलाइन स्वरूपाचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण ठरला आहे.
आरोग्य विद्यापीठातर्फे ‘इंटरनॅशनल एज्युकेशन हब’ कार्यान्वित करण्यात आले असून याद्वारे अन्य विद्यापीठ व संस्थांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्याद्वारे मोठय़ा प्रमाणात आरोग्य शिक्षण व संशोधनविषयक कार्य केले जात आहे. विद्यापीठातर्फे ग्रीष्मकालीन आंतरवासीयता उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर विद्वत्तापूर्ण तपासांमध्ये सैद्धांतिकज्ञान आणि विद्यार्थ्यांचे व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रतिष्ठत संस्थेमध्ये वास्तविक जीवनाचा अनुभव व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर योजना विद्यापीठाने सुरू केली आहे. योजनेत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रतिआठवडा रुपये दोन हजार पाचशे इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी सुमारे दोन ते चार आठवडे इतका असणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या समर इंटरशिप प्रोग्राम सेंटरवर ग्रीष्मकालीन आंतरवासीयता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटायझेशनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेपासून हॉलतिकीट, शोधप्रबंध, सिनॉप्सिस ऑनलाइन झाल्यामुळे एकूणच प्रक्रियेत अचूकता वाढली असून कमी मनुष्यबळातदेखील प्रभावीरीत्या कार्य करता येऊ लागले आहे. खर्चामध्ये मोठय़ा प्रमाणावर बचत झाली असून एकूणच कालावधीमध्ये बचत झाल्याने वेगवानता आली आहे. कागदपत्रे, छपाई, पुनःप्रती या गोष्टी टाळल्या जात असल्यामुळे कागदांची बचत होऊन पर्यावरणपूरक कामकाज केले जात आहे.
विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयांमध्ये विविध शैक्षणिक, परीक्षाविषयक व प्रशासकीय सुधारणा राबविल्या आहेत. वर्गात आणि चिकित्सालयात विद्यार्थ्यांना सक्तीची उपस्थिती, सुनिश्चित शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अध्यापनपद्धती, सर्व विद्याशाखांचे अभ्यासक्रम आणि पाठय़क्रम अद्ययावत करणे, विविध विषयांची एकात्मिक अध्यापनपद्धती आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी, सुनियोजित व साचेबध्द आंतरवासीयता कार्यक्रम, महाविद्यालयांची कालबद्ध तपासणी संलग्नित महाविद्यालयांतील शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, पहिल्या संलग्नीकरणासाठी कठोर निकष, शिक्षकांची मान्यता, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आदी प्रशासकीय बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य विद्यापीठ परिसरात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेस शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाबरोबरच रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णसेवादेखील होणार आहे. आरोग्यसेवा व संशोधन कार्यासाठी पदव्युत्तर महाविद्यालय समाजासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. विद्यापीठ परिसरात सुमारे पदवीच्या 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे व त्यास संलग्न 430 खाटांचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. याचबरोबर 15 विषयांमध्ये 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा उपलब्ध होणार आहे. यामध्ये दरवर्षी वाढ होणार असून याचा नाशिक विभागातील रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर लाभ होणार आहे. तीन वर्षांनंतरच साधारण तीनशेपेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी रुग्णालयामार्फत उपलब्ध होऊ शकतील.
समाजात अवयवदानासाठी प्रोत्साहन व मोठय़ा प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठातर्फे ‘महाअवयवदान अभियान’ यांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. अवयवदान जनजागृतीसाठी विविध मान्यवरांचे ऑनलाइन मार्गदर्शन व विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो.
विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘कुलगुरू का कट्टा’ उपक्रम सुरू करण्यात आला असून शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी व समस्या येतात. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांशी या उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. महाविद्यालय स्तरावर सर्वच समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. ई-मेलद्वारा प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या, तक्रारी व सूचनांची दखल विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. यासंदर्भात नियोजित वेळेनुसार कुलगुरू ऑनलाइन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सकारात्मक बदलांमुळे शैक्षणिक प्रमाणकांमध्ये लक्षणीय सुधारणा, परीक्षांच्या निकालात विहित वेळेत लागणे, पारदर्शक परीक्षा पद्धतीविषयी विद्यार्थ्यांना विश्वास, विद्यार्थ्यांकडून सुसंवादात वाढ, अशा वैशिष्टय़पूर्ण बदलांमुळे विद्यापीठाची यशस्वी वाटचाल होत आहे.
(लेखक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
























































