विषमुक्त अन्न व जागतिक तापमानवाढ

>> अॅड. गिरीश राऊत

हवा, पाणी व अन्न विषमय होण्याचे आणि जागतिक तापमानवाढीचे कारण एकच आहे. उद्योग, वीजनिर्मिती, अणुऊर्जा, बांधकाम, वाहतूक व रासायनिक शेती इत्यादी. थोडक्यात औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकसित अर्थव्यवस्था हेच त्यासाठी कारणीभूत आहे. मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. तरी माणसे गाफील आहेत. मोटार, वीज, सिमेंट काँक्रीटसारख्या गोष्टी प्रगतीची व विकासाची चिन्हे मानली जात आहेत. पण प्रत्यक्षात ती माणसाला असाध्य व्याधी देणारी आणि पृथ्वीला निर्जीव बनवणारी विनाशाची प्रतीके आहेत.

हवा, पाणी व अन्नाद्वारे आपल्या शरीराची धारणा होते. या तीनही गोष्टी आज कमालीच्या प्रदूषित झाल्या आहेत. हे प्रदूषण वैज्ञानिक पद्धतीने दाखवून सिद्ध करण्याची गरज नाही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आहे. ही तीनही प्रदूषणे शरीरावर एकत्र दुष्परिणाम करतात. गेल्या 50 वर्षांत झालेली आजारांची मोठय़ा प्रमाणातील वाढ विषमुक्त हवा, पाणी व अन्नासाठी चळवळ होण्यास कारण आहे. यापैकी अन्नाचा विचार करताना अर्थातच अन्न उगवणे, पिकवणे व जतन करण्याची हरित क्रांतीपासून आलेली नवी शेती पद्धती दोषी ठरते. ‘महायुद्धांत उभारलेले रासायनिक उद्योग पुढे कसे चालवायचे या विवंचनेतून नायट्रोजन, पोटॅशियम व फॉस्फरस यांचा जमिनीला खत म्हणून पुरवठा करण्याचे पिल्लू सोडण्यात आले. जणू काही यापूर्वी भूमी वांझ होती. ही भूमीची गरज नव्हती. ती उद्योग, शहरीकरण व अर्थव्यवस्थेची गरज होती. मात्र ते पद्धतशीरपणे लपवण्यात आले.’ हे करताना औद्योगिकीकरणासाठीच आणलेली शैक्षणिक व्यवस्था, त्यातील विद्यापीठे कामाला आली.

या मंडळींनी कधी स्वतः शेती केली नव्हती, मातीत हात घातला नव्हता की कधी स्वतःच्या हाताने झाड लावले नव्हते. कोटय़वधी वर्षांत ज्या आपल्या कधीही गरजेच्या नव्हत्या अशा वस्तूंची कारखान्यात यंत्र व रासायनिक प्रक्रियांद्वारे निर्मिती केली जाऊ लागली होती. मग ‘प्रगती’ व ‘विकास’ हे शब्द रूढ केले गेले व असा अनावश्यक वस्तू वापर करणाऱयांना ‘आधुनिक’ संबोधण्यात आले. ते शहरांत राहू लागले. यांच्या आधीच्या अगणित पिढय़ा पृथ्वीशी जोडलेल्या होत्या, पण आता यांची पृथ्वीशी असलेली नाळ तुटली, नाते तुटले.

एक दाणा जमिनीतून हजार दाणे प्रसवतो. एक नारळ पुरला तर शेकडो नारळ देणारे झाड उगवते. एक मासळी लाखो पिलांना जन्म देते. यात पैशांचा संबंध नसतो. उष्णता किंवा प्रदूषण होत नाही. ही पृथ्वीची कोटय़वधी वर्षांची किमया आहे. याच्या अगदी विरोधात औद्योगिक जग काम करते. हे औद्योगिक जग नैसर्गिक नाही. असे सर्रास म्हटले जाते की उद्योग नसतील तर जगणार कसे? म्हणजे उद्योग नोकरी देतो व नोकरी जगवते असे धरले जाते. पण वस्तुस्थिती आहे की पृथ्वी आपल्याला जगवते, नोकरी नाही. औद्योगिक जगतातील माणूस तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार व मनोरंजनात इ.मध्ये स्वतःला गुंतवून घेतो. यासाठी त्याला मुख्यतः पैसा लागतो. ज्यामुळे तो जगतो ते अन्न तो अतिशय थोडय़ा पैशात उपलब्ध करून घेत आला. त्याला व्याधीमुक्त शरीरासाठी शेतीला उद्योगमुक्त करावे लागेल. अर्थात तरीही तो निरोगी होणार नाही, कारण प्रदूषित हवा व पाणी. म्हणजे पूर्ण आरोग्यासाठी केवळ शेतीच नाही तर जीवन म्हणजे सृष्टी व पृथ्वी उद्योगमुक्त करावी लागेल. पृथ्वी हा अनंत ग्रह, तारे असलेल्या विश्वातील जीवन अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह आहे. केवळ हाच ग्रह त्याच्या अद्वितीय जडणघडणीमुळे व विशिष्ट तापमानामुळे जीवनाची धारणा करून ते विकसित करू शकला. यात मानवी कर्तृत्वाचा काही भाग नाही.

12 सप्टेंबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेने कॅन्सरच्या प्रसाराविषयी एक विशेष अभ्यास अहवाल जाहीर केला. त्यानुसार सध्या जगत असलेल्या माणसांपैकी दर पाच माणसांतील एका माणसाला (150 कोटी) त्याच्या आयुष्यात कॅन्सर होणार आहे व हे प्रमाण फक्त पाच वर्षांत दर तीन माणसांत एक माणूस (250 कोटी) असे होणार आहे.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाचा विळखा जगाला पडला नव्हता तेव्हा पृथ्वीच्या विविध भागांत एक ते दहा लाख माणसांत एक माणूस इतका ‘कॅन्सर’ हा भयंकर आजार दुर्मिळ होता. जीवनशैलीच्या मोहिनीमुळे व जगणे म्हणजे काय ते न समजल्याने, उद्योग-नोकरीची जगण्याशी चुकीची सांगड घातल्याने आता घराघरात कॅन्सर आला व उष्णता भाजून काढू लागली तरी माणूस आपल्याच मस्तीत आहे. हवा, पाणी व अन्न विषमय होण्याचे आणि जागतिक तापमानवाढीचे कारण एकच आहे. उद्योग, वीजनिर्मिती, अणुऊर्जा, बांधकाम, वाहतूक व रासायनिक शेती इत्यादी. थोडक्यात औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकसित अर्थव्यवस्था हेच त्यासाठी कारणीभूत आहे. मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. तरी माणसे गाफील आहेत. मोटार, वीज, सिमेंट काँक्रीटसारख्या गोष्टी प्रगतीची व विकासाची चिन्हे मानली जात आहेत. पण प्रत्यक्षात ती माणसाला असाध्य व्याधी देणारी आणि पृथ्वीला निर्जीव बनवणारी विनाशाची प्रतीके आहेत.

धरणे कोरडी करणारी, भूजल घटवत जाणारी, उष्म्याच्या लाटा, अवकाळी, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, अतिवेगवान वादळे, वणवे लावणारी, ध्रुवांवरील, पर्वतांवरील बर्फ वितळवणारी, सागरपातळी वाढवणारी, मानवाला नष्ट करणारी, अपरिवर्तनीय बनलेली तापमानवाढ घडवण्यास, कार्बन-डाय-ऑक्साईड व इतर वायूंचे वार्षिक सुमारे 3100 कोटी टनांचे उत्सर्जन कारण आहे.

आपली सध्याची जीवनशैली म्हणजे मानवजातीसह जीवसृष्टीची अंताकडे वाटचाल आहे. हिंदुस्थानला संयम व शहाणपणावर आधारलेली व म्हणूनच चिरंतन टिकलेली एकमेव संस्कृती देणाऱया आपल्या पूर्वजांच्या कृषियुगात जगाने परत जाणे हाच त्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. वातावरणातील कार्बन वायू तापमान वाढते ठेवणार असल्याने तो वाढू नये. हे फक्त औद्योगिकीकरण व शहरीकरण पूर्णपणे थांबले तरच शक्य आहे. हे सत्य आपण स्वीकारणार का आणि त्यानुसार पावले उचलणार का, हा खरा प्रश्न आहे. सरकार किंवा कुणी इतर ते करील म्हणून वाट पाहू नये. समाजानेही त्यात पुढाकार घ्यायला हवा.

यावर उपाय सांगा असे लोक म्हणतात. आज माणूस यांत्रिकीकरण सहज आत्मसात करतो. विकास आणि आधुनिक जीवनशैलीची झालेली सवय यामुळे या गोष्टी धोकादायक असूनही स्वीकारल्या गेल्या. हे टाळायला पाहिजे. वास्तविक माणसाने सजीवसृष्टी आणि पृथ्वीचे संरक्षण यांना समोर ठेवून आचारविचार ठेवायला हवा. पूर्वी तो तसा होता. पण कालांतराने ते बदलत गेले. मुळात माणसाची प्राथमिक गरज ही फक्त हवा (प्राणवायू), पाणी व अन्न एवढीच आहे. पुढे वस्त्र्ा, निवारा व वाहतूक या गरजा महत्त्वाच्या असल्या तरी त्या सुमारे 60 वर्षांपूर्वी पर्यंत जशा भागवल्या जात होत्या त्याप्रमाणे भागवायला हव्यात. नैसर्गिक पद्धतीने पाला पाचोळा कुजवून त्या खतावर फिरती व मिश्र पिके घेणे, चरखा व हातमागावर वस्त्र्ा बनवणे, मातीची व कुडाची घरे बांधणे हाच पृथ्वी आणि सोबत मानवाच्या रक्षणाचा एकमेव उपाय आहे.

पूर्वी पृथ्वीवरील अन्न हे विषमुक्त होते आणि तापमानही जीवनाचे पूर्ण उच्चाटन घडवणारी मर्यादा ओलांडत नव्हते. गेली सुमारे पंचवीस हजार वर्षे तर ते सरासरी योग्य प्रमाणात होते. अन्नाबाबतची समस्या देशात 60 वर्षांपासून व तापमानाबाबत जगात यंत्र आल्यापासून फक्त 250 वर्षांत निर्माण झालेली आहे. एका बाजूला पृथ्वी, समुद्र, नदी, जंगल, पर्वत, वातावरण आणि त्यातून मानवासह घडलेली जीवसृष्टी आहे तर दुसऱया बाजूला स्वयंचलित यंत्र आहे. मोटार, वीज, सिमेंट, स्टील, प्लॅस्टिक, टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन, बोअरवेल आदी मानवनिर्मित वस्तू आहेत. त्यांच्याकडे इंद्रियांद्वारे खेचणारी मनाची लालसा, संग्रहवृत्ती, अहंकार आहे. गेल्या काही वर्षांत होत असलेली वातावरणातील तापमानवाढ आता अपरिवर्तनीय झाली आहे. सरासरी तापमान वाढण्याचा वेग पाच ते दहा वर्षांत 1 अंश सेल्सियस असा अनाकलनीय, पण वास्तव आहे. थोडक्यात पृथ्वीवरील मानवजात आणि जीवसृष्टीचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. अशावेळी कोपर्निकस ब्रुनो व गॅलिलीओने बाणवलेली फक्त सत्य मानणारी वैज्ञानिक वृत्ती मानवजातीने दाखवण्याची, औद्योगिकीकरण व शहरीकरण थांबवण्याची व पृथ्वीचे शरीर विषमुक्त करण्याची गरज आहे.

विषयुक्त विकास हीच दुर्घटना
– हिंदुस्थानात वीजनिर्मितीसाठी रोज सुमारे 15 लाख टन कोळसा जाळला जातो. त्यामुळे सुमारे 23 लाख टन ‘कार्बन डाय ऑक्साईड’ वायू रोज वातावरणात सोडला जातो व सुमारे सात लाख टन राख दऱ्याखोऱ्यात तसेच नदी, खाडी व समुद्रात टाकली जाते. त्यासाठीही लाखो लिटर पाणी लागते. लाखो टन विषारी वायू सूक्ष्म राखेसह वातावरणात सोडले जातात. या औष्णिक वीज कारखान्यांना थंड ठेवण्यासाठी नदी, खाडी, व समुद्रातून प्रत्येक दिवशी सुमारे साठ हजार कोटी लिटर पाणी घेतले जाते व गरम झालेले पाणी पुन्हा नदी, सागरात सोडले जाते. या घडामोडीत जीवसृष्टीचा प्रचंड नाश होतो व तापमानवाढ होते. दरवर्षी पृथ्वीवर 1 हजार 596 कोटी टन कार्बन डाय ऑक्साईड वायू वीजनिर्मितीमुळे वातावरणात सोडला जातो.

– जर्मनीतील ‘हायडेलबर्ग’ येथील एनव्हायर्नमेंट ऍण्ड फोरकास्टिंग इन्स्टिटय़ूटच्या अहवालाप्रमाणे मोटार शोरूममध्ये येण्याआधीच हवा, पाणी व जमिनीचे अपरिवर्तनीय नुकसान केलेले असते. प्रत्येक मध्यम आकाराची मोटार 25 हजार किलोग्रॅम कचरा व 422 दशलक्ष घनमीटर हवा कच्च्या मालाच्या स्वरूपात, प्रत्यक्ष बांधणीच्या आधी प्रदूषित करते. म्हणजे प्रत्यक्ष वापर होत असताना आणि भंगारमध्ये गेल्यावर किती नुकसान होत असेल याची कल्पना केलेलीच बरी!

– एक मोटार एका वर्षात सुमारे सहा टन कार्बन डाय ऑक्साईड वायू सोडते. जगात सुमारे 200 कोटी मोटारी आहेत. वाहनांमुळे पृथ्वीवर एका वर्षात सुमारे 1 हजार 691 कोटी टन ‘कार्बन डाय ऑक्साईड वायू’ उत्सर्जित केला जातो. इतर विषारी वायू आणि पदार्थ वेगळेच.

– सिमेंट उत्पादनातून प्रतिवर्षी सुमारे 400 कोटी टन ‘कार्बन डाय ऑक्साईड’ वायू वातावरणात जातो. एक टन काँक्रीटसाठी सुमारे दोन हजार टन पाणी वापरले जाते.

– तथाकथित आधुनिक जीवनशैलीमुळे असे अनेक विषारी पदार्थ वातावरणात सोडले जातात किंवा जमिनीत गाडले जातात. त्याचाच परिणाम पर्यावरणावर, मानवी आरोग्यावर आणि पृथ्वीच्याही आयुष्यावर होत आहे.

(लेखक भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या