
>> जयश्री संगीतराव
सत्यवती – मी सत्यवती, कौरव पांडवांची पणजी. एक शापित ऋषिकन्या.
माझ्या जन्माबद्दल अनेक वादंग आहेत. बुद्धीने चलाख आणि सुंदर. त्यामुळे कोणीतरी थोर ऋषी आणि अप्सरा माझे माता-पिता असावेत, पण दाशराजांनी माझे पालनपोषण केले. तेच खरे माझे परमप्रिय पिता. जन्मापासूनच भोवऱयात सापडलेली मी नवजीवन जगू लागले. माझे आयुष्य दिसामासाने आकार घेऊ लागले होते. वाटसरूंना पैलतीरावर पोहोचवण्याच्या पित्याच्या कार्यात हळूहळू मी सहाय्य करू लागले होते. बघता बघता वर्षे सरली, सौंदर्याला तारुण्याचे तेज चढले. याच नवतरुण्याच्या वेलीने शांतनु राजाला वेढून टाकले.
एकदा कुरुवंशातील राजा शांतनु शिकारीसाठी आले असता सावजाचा पाठलाग करता करता आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी आम्हाला बघितलं आणि क्षणार्धात ते आमच्यावर मोहित झाले. आमचीही काहीशी तशीच अवस्था झाली. त्यांनी पित्याकडे आमचा हात मागितला. आमच्या भाग्याचे जणू नवे दालनच उघडले होते. आम्ही नाही, पण आमच्या पित्याने विवाहाच्या काही अटी घातल्या की, माझ्या पुत्राला राजगादी मिळणार असेल तरच मी मुलीचा हात तुमच्या हातात देईन. हे ऐकताच महाराजांची मोठी द्विधा मनःस्थिती झाली. ज्येष्ठ पुत्र देवव्रताचा राजगादीवरील अधिकार ते कसा हिसकवणार म्हणून खिन्न मनाने ते हस्तिनापुरास परतले. पित्याची ती अवस्था जाणून घेण्याचा देवव्रताने पुष्कळ प्रयत्न केला, पण महाराजांनी अवाक्षरही उच्चारले नाही. इकडे आमची ही घायाळ स्थिती झालेली. एकीकडे पित्याच्या अटी तर दुसरीकडे महाराजांची म्लान मुद्रा! काय होणार पुढे, या विचारात असतानाच देवव्रताचे आमच्याकडे आगमन झालेच. पित्याची मनःस्थिती त्यांनी पुरती ओळखली असावी. देवव्रत आमच्यापर्यंत पोहोचलाच. माझ्या पित्याने त्यालाही सर्व अटी सांगितल्या. देवव्रताने क्षणाचाही विलंब न लावता त्या मान्यही केल्या, पण बापाचं मन काही शांत बसेना. ‘जर-तर’च्या शंकांनी त्यांचे हृदय धडकायला लागले. अखेर त्यांच्या विश्वासाखातर देवव्रताने दोन कठोर प्रतिज्ञा केल्या की, राजपदावर कधीच बसणार नाही आणि आजीव ब्रह्मचारी राहीन. महाराजांमध्ये गुंतलेल्या आमच्याही मनावर जणू गारुडच झालं होतं. काय चाललंय हे जणू कळतच नव्हतं. पूर्ण समाधान करूनच बाबांनी आमच्या विवाहाला संमती दिली आणि देवव्रताची मातोश्री बनून आम्ही हस्तिनापुरास दाखल झालो. महाराजांशी विवाह झाल्यावर आम्ही ऐश्वर्याच्या झुल्यावर मजेत झुलत होतो. दोन गोंडस राजकुमारांना जन्म देऊन आम्ही राज्याला वारसही दिला, पण नियतीला ते सुख पाहावलं नाही. महाराजांच्या निधनाने तिने आम्हाला गाठलंच. देवव्रताच्या आधाराने आम्ही त्या लहानग्यांना वाढवत होतो. थोरल्याला राजगादीवर बसवलं, पण त्याचंही अकाली निधन झालं. म्हणून दुसऱयाला राजमुकुट घातला. आता आमच्यातले मातृमन राज्याच्या वारसासाठी आसुसलेलं होतं. म्हणूनच भीष्माच्या मदतीने काशीराजांच्या दोन कन्या अंबिका आणि अंबालिका यांना स्नुषा म्हणून महाली आणलं. हे सगळे करत असताना ज्येष्ठ कन्या अंबा हिच्यावर घोर अन्याय झाला. सूडाने पेटलेल्या अंबेचा त्यात नाहक बळी गेला आणि अजून एका पापाची आणि सूडाची वाटेकरी आम्ही झालो. नियतीचा सूड मात्र अजूनही संपला नव्हता, ना आमचं दुर्भाग्य सरलं होतं. काही दिवसांतच दुसऱया पुत्राचाही वियोग आमच्या नशिबी आला. माझ्या पोटी जन्मलेल्या पुत्रांना राजपदावर बसवावं ही आमच्या वडिलांची इच्छा नामशेष झाली. माणूस माझं, मला, माझ्यासाठी अशा वलयाभोवती किती गुरफटला जातो, पण त्यातलं काहीही आपल्या हाती नसतं. नियती कठपुतलीसारखी आपल्या नशिबाला फिरवत असते. त्याचा प्रत्यय आम्हाला आला. महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे देवव्रताचे अधिकार हिसकावून काय मिळवले? आमच्या पित्यासाठी देवव्रताने प्रतिज्ञा केली नसती तर? ही वेळ आलीच नसती. मन स्वस्थ बसू देत नव्हते, पण इथे थांबून चालणार नव्हते. राज्याला वारस तर हवाच होता. कुरुवंशच नष्ट होण्याच्या मार्गावर होता. आमच्यामुळे राजपदावर कधीही बसणार नाही व आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी वेळ ज्याच्यावर आणली त्या भीष्मालाच राज्यावर बसण्याची विनवणी करावी का? आम्ही तसं केलंही. अगदी गडगडलो त्यांच्या पायावर, पण आपली प्रतिज्ञा मोडतील तर ते भीष्म कसले? त्यांनी अगदी आदरपूर्वक आमची मागणी नाकारली. हस्तिनापुराचे साम्राज्य पुन्हा एकदा एकाकी झालं. काय करावं? घराण्याची कर्ती म्हणून आम्ही सगळय़ा बाजूंनी विचार करून बघितला. राज्याला कोणीतरी उत्तराधिकारी तर हवाच. म्हणून देवव्रताला विश्वासात घेऊन आमचा कौमार्यावस्थेतील प्रथम पुत्र व्यासालाच सुनांच्या पोटी अपत्य जन्मविण्याची विनंती केली. इकडे दोन्ही सुनांनाही विश्वासात घेतले. वाटलं, आता नशीब पालटेल, पण इथेही फासे उलटेच पडले. व्यासांचे ते भयानक रूप बघून एक बेशुद्ध पडली, तर दुसरी भीतीने पांढरीफटक! परिणामतः त्यातून निपजला तो एक जन्मांध धृतराष्ट्र आणि दुसरा पंडू रोगाने ग्रस्त. कुरू राज्याला वारसदार मिळाले, पण त्यालाही गालबोट लागलंच. काय म्हणावं या साऱयाला? विचारांनी मन नुसतं कसंनुसं झालं. दोष माझ्या दुर्भाग्याचा, नियतीच्या आश्वासक संकेताचा, कुणाच्या शापाचा की पेटलेल्या सूडाचा, पण ही सत्यवती उन्मळून पडली नाही. नशिबाच्या पुढच्या दानाची वाट बघत ती जगत राहिली आणि वाटय़ाला आलेलं निर्धाराने झेलतही राहिली. स्वीकारलं तिने पदरात पडलेलं दान आनंदाने. कर्तव्यबुद्धीने कुरुकुलाची ज्येष्ठ म्हणून हे सारं सत्यवती सहन करत राहिली. मूग गिळून, डोळय़ातली आसवं पिऊन शांतपणे…
महाभारतातल्या स्त्री व्यक्तिरेखा
पुराणकथेनुसार ब्रह्माचे वंशज म्हणजे अत्री. अत्रीपासूनच राजा नहुष, ययाती, पुरू, भरत, त्यांचा पुत्र शांतनु आणि पुढे भीष्म, धृतराष्ट्र, पंडू आणि नंतर कौरव, पांडव, जे महाभारत घडण्यास खऱया अर्थाने कारणीभूत मानले जातात, अशी ही वंशवेल. या कुलातील पराक्रमी सत्ताभिलाषी वृत्तीचे पुरुष जसे महाभारत घडायला कारणीभूत ठरले, त्याचप्रमाणे त्या कुलातील स्त्रीयाही तितक्याच जबाबदार ठरतात, असं मानलं तर वावगं होणार नाही.
या सगळय़ात आधी नाव घ्यायचं झालं तर दासराज कन्या सत्यवती म्हणजेच कौरव-पांडवांची पणजी. त्यानंतर कुंती, गांधारी, द्रौपदी, उत्तरा यांचा उल्लेख होतो. या साऱयांच्या प्रतिज्ञा, करारीपणा, प्रसंगी आंधळं पुत्रप्रेम, मानापमानाची भावना या सगळय़ांचा परिणाम म्हणजेच महाभारत.
या वंशाच्या त्या आधारस्तंभ बनल्या तशाच कुळाच्या नाशाला कारणीभूतही ठरल्या का? हाही विचार करण्याचा मुद्दा आहे. या साऱयांबरोबरच एक नाव आणखी डोळय़ासमोर येतं ते म्हणजे शुक्राचार्य आणि जयंतीची रूपवती पुत्री देवयानी. शुक्राचार्य म्हणताच डोळय़ांसमोर येतो तो त्यांचा कोपिष्ट स्वभाव, जो त्यांच्या कन्येत पुरेपूर उतरला. खरं तर देवयानीचा महाभारताशी प्रत्यक्ष संबंध नाही. तरीही क्रोध, मानापमान, बदला आणि गर्विष्ठपणा यासाठी प्रसिद्ध असलेली देवयानी सूडबुद्धीने वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठेला आपली दासी बनवून घेऊन गेली, पण इथेच तिचे दुर्दैव किंवा पुरू वंशाचे दैव म्हणावे की, ज्यामुळे तिचा पती ययातीपासून शर्मिष्ठेला झालेला पुत्र पुरूरवापासून कुरुवंश वाढला.
दुष्यंत, शकुंतला यांचाही उल्लेख व्हायलाच हवा. कारण शकुंतलेचा पुत्र भरत कुरुवंशाचा वंशज ठरला. अर्थातच कुरुकुलातील या सर्व स्त्र्ाया महाभारत घडण्यासाठी कारणीभूत ठरल्या असे मानले जाते. कधीतरी त्यांच्याही मनात हा विचार आला असेल. स्वतःच्या मनात, अंतःकरणात डोकावताना मन हेलावलं असेल. एकांतात असताना डोळे पाण्याने भरले असतील आणि ‘जर-तर’ हा विचार त्यांच्याही मनाला नक्कीच शिवून गेला असेल. या सर्व स्त्र्ायांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडण्याचा हा प्रयास.




























































