कवडसे – आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेंद्र पाटील

परवा संध्याकाळी मी माझ्या घराच्या अंगणात निवांत बसलो होतो. सांज उतरणीला आली होती. गुरंढोरं आपल्या घरी परतू लागली होती. हळूहळू अंधार पसरू लागला. रानातली पाखरांची कुजबुज, मंदिरातल्या सनईचा सूर, वाऱयाचा आवेग, पानांची सळसळ, अंगणात चंद्राचं डोकावून पाहणं आणि अंगणभर प्रकाश होऊन त्याचं पसरून जाणं… सगळं अनुभवत होतो.

एक पणती स्वतचं अस्तित्व जपणारी, तिच्या मिणमिणत्या प्रकाशात तिच्यात काहीतरी शोधणारा मी, पण नेमकं काय तेच ठाऊक नाही. इतक्यात त्या अंगणात माझ्या एकेक आठवणी जमा होऊ लागल्या आणि मनातली हुरहुर कमी होऊ लागली. जणू याच आठवणी शोधत होतं माझं मन. बघता बघता आठवणींची गर्दी अंगणभर पसरली. एकेक आठवण माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. एखादी आठवण घेऊन गेली दूर नेहमी आवडायचं. तिथे त्याच क्षितिजावर माझा हात धरून ओढून नेलं मला आठवणीने आणि मी रमलो तिथेच. काही क्षण आता इथेच थांबू या, असं वाटत असताना दुसरी आठवण मला तिथून दूर घेऊन गेली एका सुन्या वाटेवर, जिथे मी कधीकाळी वाट पाहायचो कुणाची तरी. वाटेकडे टक लावून डोळे थकून जायचे माझे. पण मी वाट पाहणं कधी सोडलं नाही. कारण मन आशावादी होतं माझं. शिशिरानंतर वसंत हा येतोच नवा बहर जन्माला घेऊन, असं नेहमी वाटायचं मला, पण वसंत नेहमीच हुलकावणी देऊन गेला होता मला. त्या वाटेवरल्या सरणाऱया क्षणाच्या आठवणी खूप काही शिकवून जात होत्या. माझ्या मनाला नको होता आता वसंत. कारण ग्रीष्माच्या तप्त झळांमध्ये भाजून निघालेलं माझं मन आता अलिप्त राहू लागलं होतं सर्व सुखांपासून. पुन्हा मला त्याच आठवणी जागवून गेल्या. त्या वाटेवरच्या झळा, यातना, मनातलं काहूर, आसवांचा पूर… इतक्यात एक प्रेमळ आठवण मला तिथून अलगद घेऊन गेली तिच्या गावी आणि साऱया जखमा भरून निघाल्या. नवी आठवण सुख देऊन घाव भरून गेली, पण किती दिवस या चंचल आठवणी मनाला हेलकावे देत राहणार हाच विचार करताना पुन्हा एक आठवण मला खूप एकटं करून गेली. असं वाटत राहिलं की, कुणीच नसावं भोवताली, असावा फक्त मीच एकटा, पण हा एकांत खरच एकांत नसतो. कारण अशाच वेळी माझ्या भोवती माझे विचार, जुन्या आठवणी गर्दी करू लागतात. जसं आता या आठवणींनी गर्दी केली आहे. तशीच प्रत्येक आठवण मला काहीतरी देऊन गेली. काही आठवणी दुःख देऊन गेल्या. काही आठवणी आषाढातल्या मुसळधार सरींच्या, काही आठवणी श्रावणसरींच्या… अशा अनेक रंगांच्या ढगांच्या वेडय़ा, अल्लड आठवणी माझ्या एकाच मनात जमा होतात आणि मी त्यांना शोधू लागतो तेव्हा माझ्या अंगणात माझ्याच समोर येऊन त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडतात. पुन्हा मनाला प्रश्न पडतो… आठवण, आठवण, आठवण! काय असते ही आठवण? कुठे राहते ही आठवण? काय करते ही आठवण? कशी दिसते ही आठवण? आठव जरा तू पटकन आठवण, आठवण, आठवण, उगा कोणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. मी म्हणतो, मला प्रिये आली तुझी आठवण, वादळ निघून गेलं की वाऱयाची येते आठवण, आठवण, आठवण,आठवण!
– [email protected]