
>> महेंद्र पाटील
काल तिचा खूप दिवसांनी फोन आला. शेवटचा कॉल तिचं लग्न ठरलं हे सांगायला आला होता. त्यानंतर आज आला. सुरुवातीला काय बोलावं सुचत नव्हतं. कारण सगळे विषय बदलले होते. सगळे निकषही बदलले होते… मनाचे आणि नात्याचेही! होय, कितीही काही म्हटलं, आपण छान मित्र आहोत, मित्रासारखे राहू वगैरे वगैरे… लग्नानंतर सगळे निकष बदलतातच, हे माझ्या मनाला पक्पं ठाऊक असल्यामुळे माझं मन शांत होतं. तिने विचारलं, काय झालं? नेहमीसारखा वाटत नाहीस. मी म्हणालो, असं काही नाही. मी आहे तसाच आहे आणि तिथेच आहे. मनातल्या मनात वेगळा संवाद चालला होता. कोण बदललंय? तू, मी की प्राक्तन?
असं म्हणतात, की प्राक्तन कधी बदलत नाही, पण मला मात्र याबाबतीत वेगळा अनुभव होता. माझं प्राक्तन पावलोपावली बदलत गेलं. प्रत्येक वाटेवर नवे अनुभव, नवी क्षितीजं आणि दरवेळी आयुष्याच्या वाटेवर भेटणारे नवे प्रवासी… खूप काही शिकवून गेले. कधी कधी वाटतं, पुस्तपं वाचली नाही याची शिक्षा असावी. इतकी वेगवेगळी माणसं देवाने समोर आणली. त्यांना वाचता वाचता इतपं काही शिकलो की, आता पुस्तपं वाचली नाही या गोष्टीची मनाला खंत वाटत नाही. जेव्हा माणसं सोबत असतात तेव्हा आपण त्यांना वाचायला नेहमी चुकतो. ती अचानकपणे दूर गेल्यावर आपण त्यांना खऱया अर्थाने वाचू लागतो. त्या व्यक्तीशी ओळख झाल्यापासून ती व्यक्ती हळूहळू किंवा अचानक दूर जाईपर्यंतच्या तिच्या सोबत केलेल्या प्रवासाची एकेक पानं पुन्हा मागे जाऊन आपण चाळू लागतो तेव्हा समजतं की, आपल्याला नियती वारंवार संकेत देत होती. पण आपण किती दुर्लक्ष केलं… नियती सल्ले वगैरे देण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही. ती शांत चित्ताने आपलं काम करत असते… आणि बेमालूमपणे कधीतरी एकदम वेगळंच करून मोकळी होते. आपण तिच्या नावाने बोटं मोडतो. असे अनेक विचार तिच्याशी बोलताना माझ्या मनात घोळत होते. आमचा रटाळवाणा कॉल सुरूच होता. इतक्यात ती म्हणाली, आपण या पावसात लॉंग ड्राईव्हला जाणार होतो ना. मी म्हटलं, हो, जाणार होतो, पण राहून गेलं. त्यावर ती लगेच म्हणाली, काही राहून वगैरे गेलं नाही. आपण आताही जाऊ शकतो. मी क्षणभर विचार करून बोललो, आपण म्हणजे कोण कोण? तू, मी आणि तुझा… ती पटकन म्हणाली, फक्त तू आणि मी. मी लगेच होकार दिला नाही. पाहू या, असं म्हणालो.
मनात विचार सुरूच होते. खरंच होईल का हा प्रवास तिच्यासोबत? काय साध्य होईल या प्रवासातून? हा प्रवास तेव्हा झाला असता तर…? आजचं सगळं आयुष्यच वेगळं असतं. तो प्रवास खूप काही देऊन गेला असता… एकमेकांना… छान समजून घेता आलं असतं. मनातले समज-गैरसमज दूर झाले असते. ओळख अजून गहिरी झाली असती आणि मैत्री या सुंदर काsंदणाचं रूपांतर प्रेम या शब्दात झालं असतं. कदाचित. हो, शब्दच म्हणता येईल या प्रेमाला. कारण मैत्रीच्या सीमारेषा पार केलेल्या नात्याला प्रेम म्हणायला मन लगेच धजावत नाही. आमच्या बाबतीतही असंच झालं. एकमेकांच्या मनाचा थांग घेण्याऐवजी एकमेकांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रापंचिक गोष्टींचा थांग घेऊ लागलो आणि त्यात मी कदाचित नापास झालो. मग ‘मैत्री’ हाच अंतिम शब्द ठरला. तिला तिच्या भौतिक सुखांची आणि स्वर्गीय स्वप्नांची पूर्तता करणारा जोडीदार मिळाला आणि आमची गोष्टच संपली. तिच्या सगळय़ा भौतिक गरजा आणि वेडी स्वप्नं पूर्ण करता करता तो इतका धावत असेल की, त्याला हिची मानसिक स्वप्नं पूर्ण करायला वेळच उरला नसेल. म्हणून कदाचित तिने विचार केला असावा की, या सगळ्या स्वर्गीय स्वप्नांची पूर्तता करू शकणारा आपला जुना मित्र ‘सपनो का सौदागर’ नक्कीच कुठल्या तरी वळणावर माझी वाट पाहात असेल. कारण तिच्या एका शब्दावर मी धावत सुटायचो… कुठेही, कधीही, केव्हाही! धावताना आपण का धावतोय आणि कुठपर्यंत धावायचं हे मलाच ठाऊक नव्हतं. फक्त ठाऊक होती ती एकच गोष्ट… तिच्या मनाचं क्षितिज. तिथवर जाता येईल याची शाश्वतीसुद्धा नव्हती मला. तरी मी इतका धावलो की, त्या रस्त्यांवर उसंत असूनही मी ती घेतली नाही. कधी शांतपणे चालले नाही. तिच्या सहवासात असताना तिच्यामागे धावलो आणि ती नसताना तिच्या आठवांच्या मागे धावलो. अजूनही धावतोय… आणि त्यात आता पुन्हा एकदा नव्या प्रवासाची जुनी चाहूल. पुन्हा तेच रस्ते… तीच वळणं… ते अबोल क्षण आणि पुन्हा तीच सुरंगी संध्याकाळ… उद्याचे स्वप्नं पाहायला शिकवणारी, पण पुढे काय? संध्याकाळ झाली की, ती तिच्या वाटेने आणि मी माझ्या. तिच्या मनातली अधुरी स्वप्नं पूर्ण करून ती पुन्हा तिच्या आणि त्याच्या विश्वात रममाण होईल. माझ्या मनात मात्र पुन्हा तीच वेडी हुरहूर. तोच जुना विरह. त्या दुःखातली वेदना, पण अचानक तिच्या मनात प्रवासाबद्दल यावं? विचारांचं वादळ मनात घोंघावायला लागलं. मग मनानेच ठरवलं, यावेळी आपण नापास नाही व्हायचं. यावेळी नियतीला नापास करायचं. तिला हरवणं शक्य होईल का माहीत नव्हतं तरी मनाचा निर्धार मात्र पक्का होता. इतक्यात मेसेजचा बीप वाजला. मोबाईल हातात घेऊन मी वाचू लागलो. खूप दिवसांनी तुझ्याशी बोलताना छान वाटलं, ऐक ना… पुढच्या महिन्यात मला सलग तीन दिवस सुट्टी आहे. तर आपण तेव्हा प्लॅन करूयात का? मी रिप्लाय केला, विचार करून सांगतो. मला वेळ असला तर जाऊ.
मी असं काही उत्तर देईन असं तिला वाटलं नसेल. तिच्या बोलण्यात इतका आत्मविश्वास होता की, जणू तिच्या मनाला तिने सांगितलं असेल की, माझ्या एका शब्दावर हा धावत येईल. पण तिला काय ठाऊक? आताशा मी चेहरे आणि त्या चेहऱयामागची मनं ओळखायला शिकलो होतो. खरंच तो ठरवलेला अधुरा प्रवास व्हावा असं मलाही मनापासून वाटत होतं. पण या क्षणी मी स्थिर होतो. आता तिच्यासोबत प्रवास करायचं ठरवलं तर माझी एक अट असेल. ती मी तिला कवितेच्या भाषेतून सांगेन. तिला माझ्या कविता फार आवडायच्या. खूप दिवसांत मीसुद्धा कविता केली नव्हती. आज सकाळच्या तिच्या पह्नकॉलनंतर माझ्या मनात काही शब्द जुळायला लागले होते. त्याच शब्दांनी तिला अट घालायची आणि प्रवासाला निघायचं. तो बंध हवा, तो छंद हवा, ज्या वळणावर भेट झाली, मला जुना तो गंध हवा…




























































