संभवामि युगे युगे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

आपण अजून सुशेगात आहोत… निसर्गाला डिवचत, समुद्राला खिजवत, वृक्षांना तोडत, हवेला दुखवत, मुलांना गुलामासारखं वागवत, कष्टकऱयांची हेटाळणी करत. आपण निद्रिस्त… भारित… बधिर… मठ्ठपणे रवंथ करतोय. चाकोरीतलं जगणं, सत्य पाहून आम्ही चॅनल व रस्ते बदलतो. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य ठेवणारे लोक वेगळेच असतात, पण असतात ते प्रत्येक युगात! त्यांच्यातच एक छोटा कृष्ण लपलेला असतो! ‘‘संभवामि युगे युगे’’ म्हणत!

पाऊस आला…
जास्तीचे दान देऊन गेला…
कोरोना आला…
जास्तीचे जीव घेऊन गेला…

येणारा जीव जातो हे तत्त्वज्ञान काय कामाचं?
कोरोना कुठं जातोय? जाणाऱया माणसाचा शोक पण निरोप देताना करता येत नाहीय. मनातल्या मनात कुढायचं, रडायचं. ताप येतोय की काय, शिंक येतेय की काय, खोकला येतोय की काय म्हणून धास्तावायचे दिवस. केवढे हतबल, दुबळे जंतू झालोत आपण! एक जंतू दुसऱया जंतूबरोबर लढतोय! चिंतातुर जंतू. आता एवढी माणसं पटपटा चिलटासारखी मरून राहय़लीत. काही कोरोनात, काही युद्धात, काही पुरात. मग एवढय़ा विकासाचं करायचं काय? देव, यज्ञ, धर्म, नेते, बडी राष्ट्रे, पैसा, सत्ता, काही काहीच चाललं नाही. कोरोनाचा जंतू रूप बदलत राहय़ला.

पुराणात नरसिंह, मोहिनी, कूर्म, वराह, वामन, अनेक अवतार ऐकले, पण ते अवतार देवादिकांचे ऐकलेले. दानव किंवा जंतूंचे अवतार प्रथमच पाहिले. अफगाणिस्तानातले दानव न् कोरोनाचे जंतूंचे बदलते अवतार. भीषण युगाला आपण सामोरे जातोय. मृत्यूपेक्षा सतत मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असणं जास्त भयप्रद. मृत्यूनंतर सगळेच प्रश्न संपतात, पण तो कसा, कुठे, कधी येणार हेच जास्त भयानक यातनादायी.
‘‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत
अभ्युथानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम
परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे’’
असं तो राजधुरंधर, मुत्सद्दी, दिव्यदृष्टिदाता कृष्ण हा सांगून गेलाय, पण मग अजून कसा आला नाही तो? की फक्त अर्जुनाचं सांत्वन, समजूत काढण्यापुरतंच होतं की काय? आता तुम्ही तुमच्या नशिबावर जगा असं म्हणून सोडून दिलं की काय त्या जगन्नियंत्यानं?
नित्शे म्हणून गेलाय… ‘‘परमेश्वराचा मृत्यू झालाय.’’
याचा अर्थ असाही होतो की, तो याआधी होता. की हा साराच पसारा निरर्थक – ऍब्सर्ड… निर्हेतुक…! पण जर प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू, ईव्हन तारांगणही एका नियमात बसलंय, इलेक्ट्रॉन.. प्रोटॉन… हवा… मोसम… साऱयांचं एक वेगवेगळं गणित, मग ते निरर्थक कसं? माणसाचं अस्तित्व निरर्थक की त्यानं स्वतःच्या बुद्धीनं अर्थपूर्ण बनवावं म्हणून निसर्गानं त्याला आव्हान देऊन सोडून दिलंय?
की आम्ही भस्मासुर झालोय? आम्ही आपल्याच हातानं निसर्गाचा विनाश करत करत आपल्याच डोक्यावर हात ठेवतोय?
मन श्रेष्ठ की बुद्धी? निसर्ग श्रेष्ठ की निसर्गातल्या प्रत्येक वस्तूला, चराचराला, लाकूड, पाणी, अग्नी, मोसम यांना आपल्या सुखसोयी व फायद्यासाठी बदलवणारा मानव श्रेष्ठ? सत्ता श्रेष्ठ की प्रजेची सदसद्विवेकबुद्धी? पैसा श्रेष्ठ की भावना?
पैशानं सुखाचं जगणं कदाचित विकत घेता येतं, भाकरी विकत घेता येते, पण रात्रीची निरामय झोप? समाधान? आरोग्य? ते कुठं विकत घेता येतं? आई-बापाचं प्रेम, बहीण-भावाची माया या साऱया अदृश्य गोष्टींनी आपल्याला बांधून टाकलंय… न् हे जग म्हणूनच सोडवत नाही आपल्याला. येणारा जाणारच हे तत्त्वज्ञान आपल्या प्रत्येकाला ठाऊक. तरीही जाणाऱयाला निरोप देताना ‘अजून तरी आपण जिवंत आहोत’ याची स्वतःला खात्री देत राहतो. येणारा प्रत्येक दिवस ‘बोनस’ आहे असाच साजरा करतो. अजूनही गणपतीला काय आरास करायची? दिवाळीला काय कसा खर्च करायचा? पुढल्या वर्षी काय संकल्प करायचा याचाही हिशेब काही जण करतातच की!
कदाचित कोरोना जाईल… कदाचित दहशतवाद संपेल… कदाचित नोकरी लागेल… कदाचित पैसे मिळतील… कदाचित घर मिळेल… कदाचित 79 नंबरची बस मिळेल… कदाचित त्या बसमध्ये बसायला जागा मिळेल… कदाचित खिडकीची जागा मिळेल… कदाचित एखादी सुंदर बाला जवळ बसेल… कदाचित घरी जाताना स्वस्त, ताजी भाजी मिळेल… कदाचित मी घरी सुखरूप पोचेन!
असे असंख्य ‘कदाचित’ आपण खिशात, मनात, मेंदूत बाळगूनच हिंडतो!
भा.रा. तांबे म्हणून गेलेत,
‘‘जन पळभर म्हणतील हाय हाय…
मी जाता राहील कार्य काय?’’
हे खरं असलं तरी ‘जन’ विसरले तरी चालतील, पण आता जगायचंय! आपल्या अटी-शर्तींवर जगणं कठीण असतं, पण चालेल… ऍट एनी कॉस्ट… जगायचंय.
पारतंत्र्य आलं तर? दहशतवादी आले तर? तर जगणार की मारणार? हाच खरा प्रश्न!
जगण्याची आसक्ती आणि तत्वं, मूल्यं हे तेव्हा एकमेकांसमोर ठाकतात!
आपण अजून सुपात आहोत. जात्यातल्यांना पाहत चुकचुक करण्यात अर्थच नाही.
भरडलं जाणं… दहशत… युद्ध… अणुबॉम्ब… जैविक शस्त्रं हे अजून आपल्यापर्यंत आलंच नाहीय.
आपण अजून सुशेगात आहोत… निसर्गाला डिवचत, समुद्राला खिजवत, वृक्षांना तोडत, हवेला दुखवत, मुलांना गुलामासारखं वागवत, कष्टकऱयांची हेटाळणी करत. आपण निद्रिस्त… भारित… बधिर… मठ्ठपणे रवंथ करतोय. चाकोरीतलं जगणं, सत्य पाहून आम्ही चॅनल व रस्ते बदलतो. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य ठेवणारे लोक वेगळेच असतात, पण असतात ते प्रत्येक युगात!
त्यांच्यातच एक छोटा कृष्ण लपलेला असतो!
‘‘संभवामि युगे युगे’’ म्हणत!

[email protected]