
>> मलिका अमरशेख
निसर्गाचा बॅलन्स राखला नाही, तर निसर्ग त्याच्यापरीनं व्यवस्था करतो न् त्याची शिक्षा कठोर न् कडक असते. आताच शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या भाकितानुसार जी जंगलतोड न् बेसुमार प्रदूषण केलं आहे, त्यामुळे मुंबईसह हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर पूर, वादळ, चक्रीवादळ यांचा धोका वाढणार आहे, पण आम्ही कशाला ऐकतोय? सारतोय समुद्र मागे, भर टाकतोय, पूल टाकतोय. जणू काय आम्ही कोलंबसच झालोय. पाणी आणि जंगल हे आपला श्वास आहेत हे आपण विसरतोय. आता पुनश्च जंगलं उगवावी लागतील. तरच आपण तग धरू. त्याआधी स्वतःतली अज्ञानाची, विषमतेची, जंगलं नष्ट करूया. प्रेमाचं, समानतेचं, ज्ञानाचं हिरवंगार बीज रुजवूया!
गुलजारजींच्या नव्या पुस्तकात ‘धूप आने दो’ वाचत असताना त्यांनी झाडांवर एक प्रकरण लिहिलंय. त्यात जंगलातल्या पानगळीचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय, ‘‘बहावा आणि चिनारची वृक्ष मंडळी आपल्या पहाडी भागात अशी काही रंगांची दाटी करतात की, वाटतं रंगीबेरंगी कपडे घालून ही कुठलीतरी वरातच चालली आहे की काय?’’ आणि पुढे ‘‘मी गच्चीवरून बघतो, चंद्रही पिवळसर केशरी झालेला! असं वाटतं की, हासुद्धा पिकल्या पानासारखा टपकन माझ्या हिरवळीवर पडेल!’’ किती सुंदर कल्पना, किती रमणीय प्रतिमा! तर इतक्या तरल कल्पना सुचणं, त्यासाठी निसर्गाशी एकरूप व्हावं लागतं.
आपण तर भराभरा झाडं तोडतो, भराभरा त्याचं फर्निचर न् कागदात रूपांतर करून भराभरा सिमेंटचं जंगल उभारतोय. संवेदना, सहिष्णुता ही गावं केव्हाच मागं पडलीयत. ‘ग्रेट डिक्टेटर’मधला चार्ली शेवटच्या अप्रतिम भाषणात म्हणाला होता, ‘‘वी आर नॉट मशिन्स…!’’ शंभर वर्षांपूर्वी तो म्हणाला होता. आज कुणी चार्ली नाही न् सांगितलं कोणी तरी ऐकणारे कान ‘मशिन्स’ झालेत. हेडफोनची बटनं कानात घातल्यावर नाहीच ऐकू येणार ना!
आम्ही युद्ध खेळतो, क्रिकेट खेळतो, पैसा न् माणसांना खेळवतो. आम्ही माणसासारखं वागायचं सोडून बाकी सर्व गोष्टी करतो.
झाडं न् मुलं जन्माला घालण्याचं वेड कधीच सोडून दिलंय. आम्ही त्याऐवजी नवनव्या मोबाईलना जन्म देतो. त्यात खूप फायदा असतो. पुस्तकांऐवजी आम्ही बँकबुक वाचतो, पेपर पण वाचतो. म्हणजे कोणी किती कोटी कमावले व किती गमावले हे कळतं.
कोरोना काळात ओझोनचं भोक बुजलं होतं, हवा स्वच्छ झाली होती. असं होऊन कसं चालेल? शुद्ध हवेची सवयच मोडली ना! मुसकं घालून हिंडायचं, ध्हत्ग्हा बोलायचं, व्हिडीओ फोन करायचा. आता सांगा, मुसकं घातल्यावर सगळय़ाच पोरी सारख्या दिसतात. नेमकी आपली प्रेयसी कोणती ते कसं ओळखायचं? न् ऑनलाइनवर शिकणं-बिकणं ठीकाय, पण ऑनलाइनवर प्रेम कसं करायचं? किती लोकांनी ऑनलाइनवर लाइन मारण्याचा प्रयत्न केला न् कित्येकांना चार-पाच लाखांचा फटका बसला. म्हंजे प्रेम, पोरगी नाहीच, वर पैसे पण गेले!
अजबच! माणसं घरात न् जंगलातले प्राणी बाहेर मस्त फिरतायत आपले! गुंड, मवाली, स्मगलर असे लोक मस्त बाहेर न् पोलीस न् सरकारी अधिकारी, मंत्री जेलात! अजबच ना!
निसर्गाचा बॅलन्स राखला नाही, तर निसर्ग त्याच्यापरीनं व्यवस्था करतो न् त्याची शिक्षा कठोर न् कडक असते. आताच शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या भाकितानुसार जी जंगलतोड न् बेसुमार प्रदूषण केलं आहे, त्यामुळे मुंबईसह हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर पूर, वादळ, चक्रीवादळ यांचा धोका वाढणार आहे, पण आम्ही कशाला ऐकतोय? सारतोय समुद्र मागे, भर टाकतोय, पूल टाकतोय. जणू काय आम्ही कोलंबसच झालोय.
‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला’
पण आम्ही कोलंबस नाही. त्यानं नवीन प्रदेश शोधला तरी आम्ही आहे तोच प्रदेश घालवायला बसलोय. लक्षात घ्या, आजवर आपण कुणावर आक्रमण केलं नाही, वसाहती केल्या नाहीत. उलट आपणावरच आक्रमण केलं गेलंय.
बाहेरचे लोक आपल्याच देशात आले. इंग्रज, नंतर डच, नंतर पोर्तुगीज, अगदी पहिले आर्य हेही बाहेरून आलेत. एतद्देशीय अनार्य म्हणजेच दस्यू या लोकांना त्यांनी गुलाम बनवून चौथा वर्ण बनवून टाकला. म्हणजेच अमेरिकेतल्या रेड इंडियनप्रमाणेच!
‘असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला’
अशातली गत!
जगाच्या नकाशावर हिंदुस्थान जरी छोटासा जमिनीचा तुकडा दिसला तरी तिन्ही बाजूंनी समुद्र, विविध जैव व खनिज संपत्तीनं समृद्ध आणि सहिष्णू एतद्देशीय. त्यामुळे लुटण्यासाठी गिऱहाईकच भेटलेले! इंग्रजांनी जाताना फाळणीची जखम दिली. पोर्तुगीजांनी संस्कृती इथल्या लोकांत पेरून दिली. एकटी पारशी जमातच काय शब्दाला जागली. खरंच दुधातल्या साखरेप्रमाणे ते विरघळून गेले. एवढेच नव्हे तर उद्योगधंदे उभारून व्यापार-उदीम यामुळे अर्थव्यवस्था बळकट केली, पण तरीही प्रत्येक प्रदेशाची एक स्वतःची व्यवस्था दुसऱयाने येऊन नष्ट करणे हेच चूक आहे.
जमीन, संपत्ती, मूल आणि स्त्राr या फक्त ऍसेटच्या फायद्याच्या गोष्टी आहेत असेच सारे समजतात आणि ही गंभीर बाब आहे याकडे कुणाचंच लक्ष नाहीय. सर्वांना समान वेतन, समान हक्क असं साम्यवादाचं तत्त्वज्ञान असणारा देश आज आपल्याच एका प्रदेशावर हल्ला करतोय, लोकांना देशोधडीला लावतोय. शहर बेचिराख करतोय आणि आपल्याकडले नवरे बायकोला मारताना जसे इतरांना देत देतात तसं ‘‘आमच्यात पडू नका, नायतर तुम्हाला पण मारेन’’ असं साम्यवादी पंतप्रधान सांगतात!
त्यामानानं निसर्गाच्या नियमानुसार वागणारे प्राणिमात्र, पक्षी जगत, जलचर…त्यांच्यातही वर्चस्वावरून भरपूर झुंज होते. वाघ-सिंह-माकड-हरीण यांच्यामध्ये झुंजीत जो जिंकेल तोच टोळीप्रमुख होतो. त्यांच्यासुद्धा हद्दी ठरलेल्या असतात, पण त्यांच्या झुंजीमुळे बाकीच्यांना हानी नसते किंवा या हद्दीत हा वाघ शिरलाय म्हणून दुसरा वाघ ते जंगल जाळून टाकत नाही. भूक लागली नाही, तर वाघ हरणाकडे ढुंकून बघत नाही. आपण तसे नाही आहोत. आपण आपली भाकरी तर खातोच न् दुसऱयाचीही घेतो. गरज असो नसो, पैसा, धान्य, प्रॉपर्टी करून ठेवतो. त्यामानानं मुंग्याच जास्त व्यवहारी न् हुशार. पावसाळय़ाआधीच त्या धान्य वारुळात भरून ठेवतात. कारण त्या पावसात बाहेर पडूच शकत नाहीत.
तर असं हे एकंदरीत. शास्त्रज्ञ सांगतायत विश्व प्रसरण पावतंय. आपणही प्रसरण पावतोय. समुद्रात जमिनीवर हातपाय पसरतोय, जंगलातही. पाणी आणि जंगल हे आपला श्वास आहेत हे आपण विसरतोय.
आता पुनश्च जंगलं उगवावी लागतील. तरच आपण तग धरू. त्याआधी स्वतःतली अज्ञानाची, विषमतेची, जंगलं नष्ट करूया. प्रेमाचं, समानतेचं, ज्ञानाचं हिरवंगार बीज रुजवूया!
malikaamarshaikh1234 @gmail.com




























































