
>> प्रसाद ताम्हनकर
पूर्वीच्या काळी म्हणे कोणा बनेल ‘नटवरलाल’ने भल्या भल्या आसामींना गंडा घालत ताजमहाल, लाल किल्ला यासारख्या वास्तू त्यांना विकत देण्याचा बहाणा करून त्यांना हातोहात उल्लू तर बनवलेच, पण वरती हजारो, लाखो रुपयांची टोपीदेखील घातली होती. हिंदुस्थान सरकारच्या मालकीच्या या राष्ट्रीय वास्तू स्वतःच्या भासवून त्या विकण्यापर्यंत मजल मारणाऱया नटवरलालला लोक आजही विसरलेले नाहीत. मात्र आता हा नटवरलाल आणि त्याच्या जातकुळीतले लोकदेखील ज्यांना वंदन करतील अशी आधुनिक नटवरलालांची पिढी अवतरली आहे. आणि ही नवी नटवर पिढी एवढी बेरकी आहे, की कायदादेखील सहजपणे वाकवण्याचे कसब ती अंगी बाणवून आहे. या बहाद्दरांनी चक्क अमेझॉनच्या जंगलातील जमिनी विकायला काढल्या आहेत आणि तेदेखील थेट फेसबुकच्या माध्यमातून. पृथ्वीचे फुप्फुस म्हणून अमेझॉनचे जंगल ओळखले जाते आणि जगातील 20 टक्के ऑक्सिजन या जंगलातून मिळत असतो. या वर्षावनाच्या जंगलाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून संरक्षित करण्यात आलेले आहे. मुख्य म्हणजे यातील जमिनी, या इथल्या आदिवासी जमातींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. असे असतानादेखील या भूखंड माफियांची मजल या जमिनी थेट स्वतःच्या मालकीच्या दाखवून विकायला काढण्यात आलेल्या आहेत. यातील काही जमिनींच्या तुकडय़ांचा आकार इतका मोठा आहे की, त्यात हजार फुटबॉलची मैदाने आरामात सामावली जातील. या जमिनींच्या विक्रीची नुसतीच जाहिरात देऊन हे लबाड लोक थांबलेले नाहीत, तर यातील काही जाहिरातींमध्ये चक्क जमिनीचे सॅटेलाईटद्वारे काढण्यात आलेले फोटो आणि जीपीएस को-ऑर्डिनेटची सेवादेखील पुरवण्यात आलेली आहे. यातील अनेक विक्रेते, हे आपल्याकडे या जमिनीचे दाखले (सर्टिफिकेट) नसल्याचेदेखील उघडपणे मान्य करतात. ब्राझील सरकारच्या कायद्यानुसार कोणत्याही जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून असा दाखला असणे हे बंधनकारक आहे. मात्र या भूखंड माफियांची तयारी सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडे तर आहेच, पण कायद्याला वाकुल्या दाखवणारीदेखील आहे. एका मोठय़ा जागतिक वृत्तसंस्थेतर्फे या विषयाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना असे आढळून आले की, हे कावेबाज भूखंड माफिया आता कायद्याच्या आधारेच या जमिनी स्वतःच्या मालकीच्या करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांनी आधी या जगातील सगळ्यात मोठय़ा वर्षावनातील अनेक भूभागावरती मोठय़ा प्रमाणात जंगलतोड करून, त्या जमिनी शेतीखाली आणण्याची मोहीमच आखली आहे, तर काही ठिकाणी सरसकट आगी लावून जंगलाचा भाग बेचिराख केला जात आहे. जंगल असलेल्या जमिनी अर्थात ज्यावरती झाडे आहेत त्या जमिनी राष्ट्रीय संरक्षण कायद्याखाली येतात. मात्र ज्या जमिनीवरती आता जंगलच उरलेले नाही, त्यांना संरक्षण कसले देणार? त्यापेक्षा त्या आता सरळ सरकारने आमच्या मालकीच्या करून द्याव्यात असे प्रयत्न या महाभाग भूखंड माफियांनी चालवलेले आहेत. हे अनोखे उद्योग बघून इथले आदिवासी तर थक्कच झालेले आहेत. ‘हा आमचा, आमच्या संस्कृतीचा अपमान आहे’ अशीच प्रतिक्रिया इथला प्रत्येक आदिवासी देतो आहे. इथे आजही काही अशा आदिवासी टोळ्या आहेत, ज्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्कही आलेला नाही. इतर आदिवासी थोडय़ाफार प्रमाणात बाहेरच्या जगाच्या संपर्कात आहेत आणि अशाच एका टोळीच्या प्रमुखाने या जाहिरातींसंदर्भात कारवाईसाठी ‘फेसबुक’ला साकडे घातले आहे. मात्र ‘व्यापारासंदर्भात आमचे काही नियम असून, ते मोडले जात नाहीत तोवर आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही,’ अशी लबाड भूमिका फेसबुकनेदेखील घेतली आहे. मात्र आता फेसबुकवरती जगभरातीलच पर्यावरणप्रेमी, पर्यावरण तज्ञ इत्यादींचा वाढता दबाव बघता, फेसबुकने ‘आम्ही स्वतः यासंदर्भात काही करू शकत नसलो, तरी ब्राझील सरकार काही कारवाई करण्यास उत्सुक असल्यास, त्यांना मदत करायला तयार आहोत,’ अशी नवी भूमिका घेतली आहे. मात्र खुद्द ब्राझील सरकारच या विषयावरती मूग गिळून गप्प असून, त्यांचा या बेकायदा धंद्यांना आतून पाठिंबाच आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींतर्फे उघडपणे केला जातो आहे.
z [email protected]




























































