साय-फाय – हृदयी भीती जागते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

काही काळापासून #heartattack हा हॅशटॅग सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर असे वेगवेगळे ट्रेंड येत असतात आणि अल्पावधीत विसरलेदेखील जात असतात, मात्र #heartattack हा ट्रेंड मात्र बराच काळ चर्चेत आहे आणि पुढेदेखील राहण्याची शक्यता आहे. हृदयविकाराच्या अचानक आलेल्या झटक्याने होणारे मृत्यू आणि त्यासंदर्भातील घटनांमुळे हा ट्रेंड प्रचंड प्रमाणात चर्चेत आहे.

अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर हा विषय मोठय़ा प्रमाणात चर्चेत आला. पुनीत राजकुमार हे जिममध्ये व्यायाम करीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सोशल मीडियावर अशा अचानक येणाऱया हृदयविकाराच्या झटक्यांचे व्हिडीओ मोठय़ा प्रमाणावर शेअर होऊ लागले. लग्नात नाचता नाचता कोणाला आलेला हृदयविकाराचा झटका, कोणाला बागेत फिरत असताना अचानक आलेला झटका तर कोणाला मैदानात क्रिकेट खेळत असताना आलेला अचानक झटका अशा अनेक सत्य घटनांचे व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आले. त्यातच विनोदवीर राजू श्रीवास्तवची घटना घडली आणि पुन्हा एकदा या विषयावरच्या चर्चेने जोर पकडला.

राजू श्रीवास्तव हेदेखील जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना अचानक खाली कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले. पुढे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या अशा अचानक येणाऱया हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये गेल्या काही काळापासून लक्षणीय वाढ झालेली आहे. मानवाची बदलती जीवनशैली हे यामागचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. हृदयाचा आकार आणि स्नायूंचे वाढणे, रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि हृदयातील रक्त पंप होण्यात येणारे अडथळे यामुळे हृदयविकाराचा झटका येतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या अचानक येणाऱया झटक्यांचा आणि कोरोनाचा मोठा संबंध आहे असे अनेक लोकांचे मत आहे. कोरोना होऊन गेलेल्या आणि व्हॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारचे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र अशा कोणत्याही दाव्याचे समर्थन करणारे पुरावे सापडले नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ ठामपणे सांगत आहेत. त्याचबरोबर तरुणांमध्ये ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान यांचे वाढते प्रमाण हेदेखील अशा झटक्यांमागचे प्रमुख कारण असल्याचे ते स्पष्ट करतात.

स्त्र्ायांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त आहे असादेखील एक मतप्रवाह आहे. डॉक्टर सांगतात की, साधारण 45 वर्षांच्या स्त्र्ायांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचे प्रमाण 10ः1 आहे. याचा अर्थ दहा पुरुषांच्या तुलनेत एका महिलेला हृदयविकाराचा झटका येतो. या संरक्षणाचे प्रमुख कारण आहे हार्मोन. महिलांमध्ये ‘इस्ट्रोजेन’ नावाचे एक हार्मोन असते आणि पुरुषांमध्ये ‘टेस्टोस्टेरॉन’ नावाचे हार्मोन असते. या काळात जोपर्यंत स्त्र्ााrला मासिक पाळी सुरू असते, तोपर्यंत तिच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी खूप जास्त असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत महिलेला मासिक पाळी असते, तोपर्यंत हा हार्मोन तिचे संरक्षण करतो, परंतु रजोनिवृत्तीनंतर तिचा हृदयविकाराचा धोका वाढतो.

वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराची शक्यता पुरुष आणि महिलांमध्ये समान होते, तर 65 वर्षांनंतर पुरुषांपेक्षा स्त्र्ायांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची अधिक प्रकरणे नोंदवली जातात. याचवेळी आजकाल तरुणींमध्येदेखील हृदयविकाराच्या अचानक येणाऱया झटक्यांची काही प्रकरणे नोंदवली गेल्याकडे तज्ञ लक्ष वेधतात. मुलींमध्येदेखील वाढत चाललेली व्यसनांची व्रेझ, बदलती जीवनशैली आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे प्रचंड सेवन ही प्रमुख कारणे असल्याचे ते सांगतात. पुरुषांबरोबर महिलांनीदेखील आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते सांगतात. विशेषतः गृहिणी बराच काळ घरात असतात आणि त्या काळात त्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष देत नाहीत, व्यायाम करत नाहीत हे अत्यंत चुकीचे आहे.
मुख्य म्हणजे जिम लावल्याबरोबर एकदम व्यायामाचा सपाटा लावू नका. हळूहळू व्यायाम वाढवत न्या. मुख्य म्हणजे स्टेरॉइड आणि इतर उत्तेजक द्रव्यांपासून लांब राहा. घाम जास्त येत असेल तर आवश्यक तेवढे पाणी पीत राहा आणि शरीरात मिठाची कमतरता ठेवू नका.

– [email protected]