जहांगीर’मध्ये ‘कला मेळा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. गजानन शेपाळ

विविध शैली आणि तंत्रांच्या सहाय्याने अभिव्यक्त होणे ही एक स्वयंभू प्रक्रिया असते. कलाकार कुणीही असो. म्हणजे तो उपयोजित कलाकार, चित्रकार अथवा शिल्पकार, काहीही असो. अभिव्यक्त होण्यासाठी सर्वांनाच एका अद्भुत क्षणाची वाट पाहावीच लागते. तो क्षण आला की सृजन सुरू होते. सादरीकरण करण्याची माध्यमे आता कदाचित बदललेली असतील, मात्र आशयगर्भता ही सारखीच असते.

महाराष्ट्राला वेरुळ-अजिंठय़ाचा जगप्रसिद्ध वारसा लाभलेला आहे. गड-किल्ल्यांसह वाडे-हवेलींसारख्या वास्तूंचाही प्रदीर्घ इतिहास या राज्याला महान बनवतो. समृद्ध शेती, जास्तीत जास्त कसदार शेती आणि सर्व ऋतूंना सहजभावाने सामोरे जाणारे समाजजीवन. या सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रातील कलाकार हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनः पुन्हा प्रतिभाशक्तीवर आरूढ होऊन दिहीमान कलाकृतींना जन्माला घालतात.

‘सृजनाला’ वेळ-काळ-प्रसंग कितीही नाजूक आणि क्लिष्ट असला तरी अभिव्यक्त होण्यास कुणीही अडवू शकत नाही. हे पुन्हा एकदा एकोणसाठव्यांदा महाराष्ट्रातील व्यावसायिक कलाकारांनी सिद्ध केलं. प्रयोजनही तसंच आहे. कलाकारांच्या पंढरीत…जहांगीर कला दालनाच्या सर्व दालनांमध्ये महाराष्ट्रातील निवडक सुमारे तीनशेंहून अधिक व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृती एकाच वेळी, एकाच ठिकाणी प्रदर्शित झालेल्या पाहायला मिळण्याची संधी 8 ते 14 जानेवारीच्या सप्ताहात राज्याच्या कला संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे.

या प्रदर्शनातून हजारो रुपयांच्या कलाकृती कलासंग्राहक आणि कलारसिक खरेदी करतात. कलाकारांच्या कला प्रतिभेचा यथायोग्य सन्मान व्हावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कला संचालनालयामार्फत एकंदर पंधरा कलाकारांना राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. प्रत्येकी 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र अशा स्वरूपात दीड लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान केले जातात. अर्थातच रकमेपेक्षा पुरस्कार हे ज्या नावाने दिले जातात ते अमूल्य असते. याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील परंतु देश-विदेशात ज्यांचे कलाविषयक योगदान स्पृहणीय आहे. अशा कलाकाराचा यथायोग्य सन्मान राज्यशासनाकडून केला जातो. रोख 25,000 रुपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह या स्वरूपात हा गौरव असतो. या वर्षी ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांना ‘ज्येष्ठ कलाकार’ सन्मानाने गौरविले आहे. या प्रदर्शनाच्या एका दालनात त्यांच्या कलाकृतीदेखील प्रदर्शित केलेल्या आहेत.

मूर्त-अमूर्त, अर्धमूर्त अशा विविध शैली आणि तंत्रांद्वारे साकारलेल्या कलाकृती पाहताना कलाकाराच्या प्रतिभाशक्तीची जाणीव होते. या कलाकृती म्हणजे सद्यस्थितीतील सामाजिक वा समकालिन विषय असल्यामुळे हे प्रदर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिबिंबच असते, असे सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रभारी कलासंचालक प्रा. राजीव मिश्रा यांनी दिली. या प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असेही ते म्हणाले. प्रभारी कलासंचालक आणि प्राचार्य, सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि प्रभारी कलासंचालक तसेच त्यांचे सहकारी यांनी केले आहे.