पाऊलखुणा – दिवा म्हणतो, वात दे…

>> राजीव मुळ्ये

अमावस्येच्या गडद काळोखात साजरा होणारा एकमेव उत्सव म्हणजे दिवाळी. अंधारावर प्रकाशाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक मानला जाणारा हा उत्सव नव्या संदर्भात आपल्याला काय सांगू पाहतो आहे? बदल हीच कायम राहणारी एकमेव गोष्ट आहे, हे मान्य करून जर आपण प्रवास करतो आहोत, तर दिवाळीतले दिवे आपल्याला भविष्यातली कोणती वाट दाखवू पाहत आहेत? बदलांच्या या प्रवासात आपण स्वतःमध्ये कोणते बदल घडवणं अपेक्षित आहे?

रंगीत आकाशदिव्यांच्या माळेनं रस्ता उजळलेला. रंगबिरंगी रांगोळ्यांनी अंगण सजलेलं पण त्यांच्या लवलवत्या ज्योतींनी वातावरण प्रसन्न झालेलं. फराळाचे खमंग पदार्थ कधी एकदा चाखायला मिळतायत, असं झालंय… आणि अचानक धडधड वाढते. बाहेर पडलो तर कोरोनाची बाधा होणार नाही ना? पुठे हात लागून वा पुणाच्या संपका&त येऊन कोरोना घरात तर येणार नाही ना? हे कमी की काय म्हणून ऐनवेळी पाऊस तर कोसळणार नाही ना? लहानग्यांनी कष्टानं बनवलेल्या किल्ल्यावरचं सैन्य भिजणार तर नाही ना? सणासुदीला ही कसली धास्ती. हा कसला ताण. ही कसली बंधनं?

चाळीस-पन्नास पावसाळे पाहिलेल्यांना लहानपणीची दणकेबाज दिवाळी आठवते आणि प्रश्न पडतो, असं का घडतंय? उत्तरादाखल पुन्हा एक प्रश्नच येतो… दिव्यांच्या उत्सवाकडून आपण काय शिकलो? ‘बदल हीच कायम राहणारी एकमेव गोष्ट आहे,’ असं मान्य केलंय ना आपण? मग हेच बदल पचनी पडायला त्रास का होतोय? मिट्ट काळोखात तेवणाऱया पणतीच्या ज्योतीवर नजर स्थिर होते आणि विचारचक्र सुरू होतं. खरंच, ही ज्योत नसती तर..? मानवजात काळोखात दिवस पंठत असताना पहिल्या दिव्याचा शोध पुणी लावला असेल? गरजच माणसाकडून सगळं करून घेत आली असणार, मग आजची गरज काय? आपण काय करणं गरजेचं आहे? हे करायचं नाही, ते करायचं नाही, मग करायचंय काय? या दिव्याचा आज आपण उत्सव साजरा करतो आहोत. तोच दाखवेल का मार्ग?

दिवा म्हणतो, वात दे… ‘नटसम्राट’मध्ये ऐकलेलं वाक्य. दिवा उजळण्यासाठी वात आवश्यक. दिव्यात तेलही हवंच. आपल्या शरीराला जसं अन्न लागतं, प्राणवायू लागतो तसंच. प्राणवायू तर दिवसेंदिवस कमी होत चालला. घातक वायूच वाढले. रस्ते तेवढेच; पण रहदारी मात्र वाढली. नाकाला कापड गुंडाळल्याखेरीज घरातून बाहेर पडता येईना. अन्न मिळवण्यासाठी ही यातायात. घातक वायूंनी भरलेल्या रस्त्यावरून असंच पोटासाठी पुणापुणाला पुठल्यापुठल्या वातावरणात काम करावं लागत असेल. दिवाळी या सगळ्यांच्या घरी असेल. दिव्यांमध्ये तेलवात घालण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल!

सरकार आणि न्यायालयानं फटाक्यांवर निर्बंध आणले म्हणून आपण हिरमुसतो, पण सध्या टिपेला पोहोचलेल्या प्रदूषणात आपण भर का घालायची? या प्रदूषणामुळेच वातावरणीय चक्र बदललंय. पाऊस लहरी झाला. यंदा तर तो कोपला. शेतकऱयाला देशोधडीला लावतोय. अन्नधान्याची टंचाई आणि महागाई निर्माण करतोय. निसर्गचक्रच पुरतं बदलून गेलंय. गेल्या दहा-वीस वर्षांत नैसर्गिक आपत्ती जगभरात वाढल्यात. निसर्गातल्या घटकांचं बेसुमार दहन करणं हीच विकासाची वाट आपण निवडली आणि मग निसर्ग कोपला. आपल्या प्रेमाच्या माणसाचा रुसवा आपण काढतो; मग ज्याचा आपण एक छोटासा अंशमात्र आहोत त्या निसर्गाचा रुसवा आपणच नको का काढायला? चारच दिवसांत अचानकपणे वातावरणात वाढणारे सल्फर डायऑक्साइडसारखे घातक वायू पुणाच्या तरी जिवावर बेततात. उत्तरेकडे तर गडद धुपं असतं, धुराशी त्याचा संगम होऊन तयार झालेला ‘स्मॉग’ नावाचा अत्यंत विषारी थर राजधानी दिल्लीला लपेटून घेतो तेव्हा चिमुकल्या मुलांना श्वासही घेता येत नाही. आपण फटाके आनंदासाठी, मर्यादित स्वरूपात पह्डले असते तर ही वेळ आली नसती. पण फटाक्यांमध्येसुद्धा हल्ली स्पर्धा लागते. श्रीमंत लोक लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं ‘लक्ष्मीप्रदर्शन’ करतात. सणावाराच्या निमित्तानं स्पर्धा करण्याची आपली संस्कृती खरोखरच नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन, कमपुवत घटकांना सण साजरा करण्यासाठी मदतीचा हात देण्याची, आपल्यासाठी वर्षभर काम करणाऱयांना ‘दिवाळी पोस्त’ देण्याची आपली परंपरा आहे. पण उगवत्या पिढीला तर ‘पोस्त’ शब्दही ठाऊक नसेल.
अंधार हे अज्ञानाचं तर दिवा ज्ञानाचं प्रतीक. अंधारावर प्रकाशानं, अज्ञानावर ज्ञानानं मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणजे दिवाळी. अमावस्येच्या गडद अंधारात साजरा होणारा एकमेव उत्सव. सभोवताली पसरलेल्या विविध स्वरूपाच्या अंधाराकडे आपलं लक्ष या निमित्तानं वेधलं गेलं पाहिजे आणि शक्य तिथं एक दिवा आपण लावला पाहिजे. घरावर केलेल्या रोषणाईतले लुकलुकणारे विजेचे रंगबिरंगी दिवे कोणत्या देशात तयार झालेले आहेत? आपल्यावर डोळे वटारणाऱया देशात तर ते तयार झालेले नाहीत ना? पणत्या, आकाशपंदीलही हल्ली तिकडूनच येतायत. फटाकेही चायना मेड! आपण तेच सगळं खरेदी केलं असेल तर दिव्यांच्या उजेडानं आपल्याला काय दिलं? दिवे लावूनसुद्धा आपण अंधारातच नाही का?

नुकतीच एक बातमी वाचली. दिवाळीसाठीची ‘ऑनलाइन’ खरेदी यंदा 30 हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या ऑनलाइन शॉपिंग पंपन्या भारतीय आहेत का? त्याच प्रमाणे या व्यवसायात असलेल्या सर्वच्या सर्व पंपन्या विश्वसनीय आहेत का? असत्या तर मोबाईलऐवजी साबणाची वडी पाठवली गेली असती का? आपल्याकडे तरुणांना नोकरीऐवजी व्यवसाय करण्याचा सल्ला हरघडी दिला जातो. दुसरीकडे, अशा शेकडो व्यावसायिकांचा व्यवसाय एक ‘मॉल’ गिळंकृत करून जातो. मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय केल्यामुळे स्वस्तात विक्री करणे मॉलना परवडतं. मॉल आले तेव्हा छोटय़ा व्यावसायिकांनी विरोध केला. आता ‘ऑनलाइन शॉपिंग’ला मॉलवाले विरोध करतायत. या घटनांचा अर्थ आपण समजून घेतला का?

खरा आनंद
संपत्तीचं विपेंद्रीकरण झालं तरच सगळ्यांचा सण सुखाचा होईल. सगळ्यांच्या घरात दिवे उजळू शकतील. हल्ली समाजसेवी संघटना, अंध-अपंगांसाठी काम करणाऱया संस्था, महिलांना सक्षम करणारे बचतगट दिवाळीच्या अनेक वस्तू बाजारात आणतात. अशा वस्तूंची निवड केली तर उपेक्षित, वंचित लोकांच्या घरात एक दिवा लावल्याचं समाधान आपल्याला मिळणार नाही का? दिवाळीसाठी रोषणाईनं सजलेली बाजारपेठ पाहून भान हरपतं हे खरं, पण त्या प्रखर प्रकाशझोतांमध्ये एखाद्या दुकानाच्या पायरीवर बसून रांगोळी आणि रंग विकणारी, फाटपं पातळ नेसलेली स्त्राr जेव्हा आपल्याला दिसेल, किल्ल्यावरचे सैनिक विकणारी चिमुकली मुलं दिसतील तेव्हाच दिव्यांनी आपल्याला ‘दृष्टी’ दिली असं म्हणता येईल. दिवा म्हणतो, वात दे; पण ती वात तो निःशुल्क मागत नाही. मोबदल्यात तो दिवा ज्ञानाचा प्रकाश देतो. अज्ञानाचा अंधकार दूर करतो. सुज्ञपणाची अशी एखादी वात एखाद्या दिव्याला या दिवाळीत आपण देऊया. अज्ञानाच्या गडद अंधारात लपलेला ‘खरा आनंद’ आपल्याला दिसल्याखेरीज राहणार नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या