
>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
अमेरिकेचे एफ 35 विमान दक्षिण चिनी समुद्रात गेल्या महिन्यात अपघातग्रस्त झाले आणि खोल समुद्रात बुडाले. त्याचा शोध अमेरिकन नौदल तर करीतच आहे पण चीन आणि रशियादेखील गुप्तपणे शोधमोहीम राबवीत आहे. या विमानावरील संपर्क यंत्रणेबद्दल चीनला उत्सुकता असून ते मिळविण्याची चीनची धडपड असावी. रशियाच्या शोधमोहिमेचाही तोच उद्देश असावा. दक्षिण चिनी समुद्रातील आणि विशेषतः तैवानजवळच्या सामुद्री आखातात चीन, अमेरिका आणि त्याचे मित्रदेश यांच्या लष्करी हालचाली आणि संयुक्त सरावाची व्याप्ती बघता येत्या काळात अशा अपघाताच्या अजून काही घटना घडू शकतील
गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण चिनी समुद्रात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांकडून दक्षिण चिनी समुद्रात संयुक्त नाविक कवायती चालू आहेत. वर उल्लेखलेल्या सर्व देशांनी आपापल्या अत्याधुनिक विमानवाहू नौका अथवा लष्करी नौका घेऊन या कवायतीत भाग घेतल्याची माहिती जाहीरपणे पुढे आलेली आहे, पण याच काळात काही लक्षवेधी असे अपघातही दक्षिण चिनी समुद्रात घडलेले आहेत, पण या अपघातांची जाहीरपणे आणि सर्वदूर अशी वाच्यता झालेली दिसत नाही.
काही महिन्यांपूर्वी दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या अत्याधुनिक अशा क्लास 3 श्रेणीतील पाणबुडीला अपघात झाला होता. अमेरिकेच्या नौदल ताफ्यातील अत्याधुनिक आणि महाकाय समजल्या जाणाऱया ‘कनेक्टिकट’ या पाणबुडीने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात दक्षिण चिनी समुद्रातून प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान या पाणबुडीला मोठा धक्का बसला. हा धक्का हा या पाणबुडीची कोणत्या तरी गोष्टींबरोबर टक्कर झाल्यामुळे घडल्याचे सांगितले गेले. ‘कनेक्टिकट’ पाणबुडीवर असणाऱया सर्व संरक्षक पूर्वसूचना देणाऱया साधनांनी काहीही इशारा दिला नसताना अशी घटना घडणे हे आश्चर्य होते. त्या पाणबुडीतील 11 कर्मचारी पाणबुडीला बसलेल्या धक्क्याने जखमी झाले होते. म्हणजे हा धक्का बराच मोठा होता हे वेगळे सांगणे न लागे, पण या अपघाताची कुठेही चर्चा झालेली दिसली नाही.
नुकतेच अमेरिकेच्या ‘एफ 35’ या अत्याधुनिक अशा स्टेल्थ श्रेणीतील विमानाला दक्षिण चिनी समुद्रामध्ये अमेरिकेची विमानवाहू नौका ‘कार्ल विन्सन’ भ्रमण करत असताना या नौकेवर लँडिंग करताना अपघात झाला आणि ते समुद्रात कोसळले. विमान पाण्यात कोसळल्यानंतर पूर्णपणे खोलवर समुद्रात बुडालेही.
अत्यंत महागडे असे हे विमान समजले जाते. 75 दशलक्ष ते 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे हे एक अत्याधुनिक विमान आहे. एका एफ 35 लढाऊ विमानाची किंमत आहे सुमारे 600 करोड रुपये. या विमानाची निर्मिती अमेरिकेतील लॉकहिड मार्टिन या कंपनीकडून केली जाते. त्या विमानात जसजशा साधन सोयी उपलब्ध केल्या जातात त्यानुसार त्याची किंमत वाढत जाते. या किमतीवरून या विमानाची असाधारण उपयुक्तता लक्षात येते. 2000 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे विमान उडते. या विमानाच्या दोन्ही बाजूंच्या पंखांवर क्षेपणास्त्रs डागता येतात हे वैशिष्टय़पूर्ण आहे. एकाच वेळी 6 क्षेपणास्त्रs या विमानावरून डागता येतात. एकदा इंधन भरले की हे लढाऊ विमान सलग 2000 किलोमीटर प्रवास करू शकते. शत्रू देशाच्या रडारना चकमा देण्यात हे विमान वाकबगार आहे. या विमानात असे काय विशेष आहे हे वाचकांना कळावे म्हणून ही माहिती. या विमानाची उपग्रहांशी संपर्क यंत्रणा अत्याधुनिक असून या विमानाने प्रवास करता करता गोळा केलेल्या माहितीचे अमेरिकेतील मुख्यालयात बसून तातडीने पृथक्करण करण्याची सोय आहे.
‘कार्ल विन्सन’ या विमानवाहू जहाजावर एका वेळी 11 एफ 35 विमाने वाहून नेण्याची क्षमता आहे. या विमानाला झालेला अपघात किंवा जेथे हे विमान दक्षिण चिनी समुद्रात कोसळले ती जागा तैवान जवळच्या सामुद्री क्षेत्रामध्ये येते. 24 जानेवारीपूर्वीच चीनने त्याची सुमारे 39 लढाऊ विमाने तैवानच्या हवाई हद्दीमधून नेल्याचे दिसून आले. चीनच्या हवाई दलाच्या एवढय़ा संख्येने तैवानच्या हवाई हद्दीमधून विमाने नेण्यामागचा उद्देश हा केवळ आणि केवळ तैवानला धमकावण्याचाच होता. अजूनही चीनकडून तैवानच्या हवाई हद्दींचा भंग करण्याचे काम वारंवार सुरूच असते. 24 जानेवारी 2022 रोजी ही अमेरिकेच्या लढाऊ विमानाची अपघाताची घटना घडल्याचे सांगितले जाते.
अमेरिकेच्या विमान वाहू नौकेवर (यू.एस.एस. कार्ल्स विन्सन) वर एफ 35 या विमानांचा ताफा ठेवलेला आहे. एफ 35 विमानांच्या या ताफ्यातील प्रत्येक विमानाचे दरदिवशी रुटिन म्हणजे सरावाचे उड्डाण केले जाते. विमानांना उत्तम स्थितीमध्ये ठेवण्यासाठी ही सर्व उड्डाणे केली जातात. त्या एफ 35 च्या सर्व उड्डाणांदरम्यान 24 जानेवारी 2022 रोजी एका ‘एफ 35’ विमानाला अपघात झाला आणि ते दक्षिण चिनी समुद्रात कोसळले. विमान उतरवीत असताना विमानवाहू नौकेवर असणारी धावपट्टी कमी पडली म्हणून हा अपघात झाला की काय न कळे. त्या विमानाच्या पायलटला अमेरिकेच्या नौदलाच्या हेलिकॉप्टरने वाचविले. हे ‘एफ 35’ विमान दक्षिण चिनी समुद्रात कोसळल्यानंतर जपानच्या कोस्टल गार्डने या विमानाचा खोल समुद्रातील ठावठिकाणा शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. पण गमतीचा भाग असा की, पुढे उघड झालेल्या माहितीनुसार चीनच्या नौदलानेही हे दक्षिण चिनी समुद्राच्या तळाशी जाऊन पोहोचलेल्या विमानाला ताब्यात घेण्यासाठी गुप्तपणे जोरदार मोहीम उघडल्याचे सांगितले गेले. या विमानावर उपलब्ध असणाऱया संपर्क यंत्रणेबद्दल चीनला उत्सुकता असून ते मिळविण्याची चीनची धडपड असावी असे बोलले गेले. अजूनही या खोल समुद्राच्या तळाशी जाऊन बसलेल्या विमानाला ताब्यात घेण्यासाठी चाललेला शोध संपलेला नाही हे विशेष. रशियालाही या बुडालेल्या विमानाला ताब्यात घेण्यात रस असावा असे सांगतात.
नोव्हेंबर 2020 मध्येही ब्रिटिश विमानवाहू नौका एच.एम.एस. एलिझाबेथ यावर तैनात असलेल्या ‘एफ 35 बी’ या एका विमानाला नौकेवरून उड्डाण करताना मेडिटेरियन समुद्रात अपघात झालेला होता आणि ते विमान तेथील समुद्रात कोसळले होते. त्यापूर्वी म्हणजे 2019 मध्येही जपानच्या नौदल ताफ्यातील ‘एफ 35 ए’ विमानालाही पॅसिफिक समुद्रात अपघात झाला होता, पण दक्षिण चिनी समुद्रात नुकत्याच झालेल्या एफ 35 या विमानाला झालेल्या अपघाताची चर्चा जास्त होताना दिसते आहे. कारण एकच. दक्षिण चिनी समुद्रात चीन, अमेरिका आणि अमेरिकेचे मित्रदेश यांच्यामध्ये निर्माण झालेला तणाव.
चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील आणि विशेषतः तैवानजवळच्या सामुद्री आखातात चीन, अमेरिका आणि त्याचे मित्रदेश यांच्या लष्करी हालचाली आणि संयुक्त सरावाची व्याप्ती बघता येत्या काळात अशा अपघाताच्या अजून काही घटना घडू शकतील.
























































