खाऊगल्ली – थंडीत खावेत गरमागरम पराठे

>> संजीव साबडे

थंडीत जशी गरम शेतात बसून भाकरी, भरीत, हुरडा, शेव खाण्याची गंमत आहे, तशीच मजा पराठे खाण्यात असते. मुंबई व महाराष्ट्रात असंख्य खाऊगल्ल्या असल्या तरी वेगवेगळय़ा प्रकारे आणि वेगवेगळय़ा चवीचे पराठे मिळणारी एकही गल्ली नाही. मुंबईतल्या अशाच काही पराठेगल्ली ठरलेल्या जागांचा हा शोध.

आता सर्वत्र चांगली थंडी पडू लागली आहे. अशा थंडीत कधी कांदाभजी, बटाटेवडा, कधी छोले भटुरे, गरमागरम भाकरी व मटण किंवा भरीत, झुणका हे खावे असे जवळपास प्रत्येकालाच वाटते. समोर तळला जाणारा समोसा, कचोरी वा रगडा पॅटिस पाहून तोंडाला पाणी सुटते आणि अनेकदा पुढच्या क्षणी आपण ते पदार्थ खात असतो. पंजाब, दिल्ली आणि एकूणच उत्तर हिंदुस्थानात आपल्यापेक्षा खूपच अधिक थंडी पडते आणि लोक रेस्टॉरंट, ढाबे आणि गाडीवर सतत काही खाताना दिसतात. समोसा, गरम जिलबी, छोले भटुरे व कुलचे असे सतत चालू असते. एवढेच नव्हे, तर या कडाक्याच्या थंडीत आईपीम तसेच चाट मसाला घातलेला गाजर, मुळा, काकडी व केळी, फळे खाणारे लोक दिवसभर दिसत राहतात. या थंडीत जशी गरम शेतात बसून भाकरी, भरीत, हुरडा, शेव खाण्याची गंमत आहे, तशीच मजा पराठे खाण्यात असते.

मराठी घरात चपाती वा पोळी. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ यांची भाकरी. थालीपीठ, धपाटी, ठेपला, पुऱया व कधी तरी दशम्या हे प्रकार जितक्या सहजपणे होतात तसे पराठे मात्र होत नाहीत. नाश्त्याला गरमागरम पराठा त्यावर पांढरे व पिवळे लोणी, सोबत हिरवी व लाल ओली चटणी असेल तर दिवस मस्त जातो. दोन पराठे पोट भरायला पुरेसे असतात. शाळेत जाणाऱया मुलांनाही पराठे

सॉसबरोबर खायला आवडतात. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात थंडीत सकाळ, दुपार, संध्याकाळी व रात्री पराठे, आचार, दही आणि सॉस हाच आहार असतो. तिथे चटण्या हा प्रकार कमीच. दिल्लीत चांदणी चौक भागात ‘गली पराठेवाली’ नावाप्रमाणेच पराठय़ांसाठी अतिशय प्रसिद्ध. तिथल्या सर्व टपरीवजा रेस्टॉरंटमध्ये ऑर्डरनुसार शुद्ध तुपातील वेगवेगळे पराठे बनवले जातात. मुंबई व महाराष्ट्रात असंख्य खाऊगल्ल्या असल्या तरी फक्त मराठी खाद्यपदार्थ व केवळ डोसे, फ्रँकी असा एखादाच, पण वेगवेगळय़ा प्रकारे आणि वेगवेगळय़ा चवीचे पराठे मिळणारी एकही गल्ली नाही. असंख्य प्रकारचे पराठे मिळणारे धाबे व रेस्टॉरंट खूप आहेत. ढाबा, टपरी व रेस्टॉरंटमध्ये तेथील सोयीनुसार 30 ते 200 व 250 रुपयांना पराठा मिळतो. म्हणजे जास्तीची रक्कम पंखे किंवा एसी, उत्तम टेबल व खुर्च्या, मांडणी, वेटरचे पगार आणि काही वा बऱयाच प्रमाणात दर्जाची असते.

पराठा म्हटल्यावर सुमारे 35 वर्षांपूर्वी कुलाब्याच्या बडे मियाकडे खाल्लेली बैदा रोटी व खिमा रोटी आठवते. दिल्लीत बहादूरशाह जाफर मार्गावर एक बुटका सरदार रोज संध्याकाळी गाडी लावायचा. त्याच्याकडील अंडा पराठा तर बेस्टच. फुलका फुगला की त्याला भोक पाडून त्यात तो आधी फेटून ठेवलेले अंड ओतायचा आणि दोन्ही बाजूंनी तुपावर परतून प्लेटमध्ये द्यायचा. मुंबईतील उडिपी वा मराठी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये आता पराठा ही डिश हमखास असते. पण ते खावेत ओन्ली पराठा, पराठा वर्ल्ड, नॅचरल पराठा, डिलक्स पराठा, ओये काके… या रेस्टॉरंटमध्येच. बोरिवलीच्या पराठा झोनमध्ये आलू (बटाटा) गोभी (फ्लॉवर) आलू-मटर, पनीर व मेथी, मेथी-आलू चीज-कांदा असे अनेक उत्तम पराठे मिळतात. खरे तर पराठे म्हणजे पोळी-भाजीची आणि सँडविचची सुधारित आवृत्ती. बटाटे, वाटाणे, पनीर, फ्लॉवर यांची मसालेदार भाजीच आत भरलेली असते. पण भाजी भरलेला पराठा तुटता कामा नये, कच्चा राहू नये म्हणून त्यासाठी प्रयत्न करताना करपून चालत नाही. मेथीचा पराठा म्हणजे मेथी व बटाटय़ाची भाजीच असते.

परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये ‘ओये काके’ हे पंजाबी रेस्टॉरंट काहीसे महाग असले तरी तेथील मेथी-आलू, गोभी, पनीर पराठे उत्तम मिळतात. संध्याकाळनंतर तिथे पराठे खाणाऱया तरुण-तरुणींची गर्दी असते. खारला लिंकिंग रोडवर ‘ओन्ली पराठा’ एकदम बेस्ट. तिथला पंच पराठा अप्रतिम. त्यात पनीर, राजमा, लाल सिमला मिरची, लसूण हा मसाला असतो. तेथील आलू व गोभी पराठाही पोटभरीचा. इथले पराठे शुद्ध तुपातच बनवलेले असतात. वर्सोवा येथील कासम सीग पराठा, अंधेरीच्याच इन्फिनिटी मॉलमधील टाइम्स ऑफ पराठा आणि गोरेगावच्या सिनेमॅक्सजवळील के1 मध्ये चिकन व मटणचे खिमा पराठे मस्त असतात. जुहू भागातील फिलिप ढाबाही खिमा पराठय़ांसाठी प्रसिद्ध आहे. परळच्या एस. एस. राव मार्गावर कल्पतरू इमारत आहे. तेथील स्पाइस अफेअरमधील खिमा पराठे खूप चांगले असतात. कुर्ल्याला पश्चिमेला फूड किंग रेस्टॉरंटमध्येही लोक खिमा पराठे व कबाब खायला मुद्दाम जातात. ठाण्याला कधी गेलात तर तिथे राबोडी परिसरात

अल्लारखा रेस्टॉरंटमध्ये मटण व चिकनचे पराठे उत्तम मिळतात.

पराठा हा पंजाबी लोकांचा खाद्यपदार्थ असला तरी भारतातल्या प्रत्येक प्रांताचे संस्कार त्यावर होत जातात. या पराठय़ांची ही खाद्यसफर पुढच्या भागात चाखूया.

[email protected]