‘क्लीन चिट’चे गौडबंगाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरल्याचे अनेक पुरावे समोर येऊनही आणि चीनने जगापासून या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे बराच काळ लपवूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी समितीने चीनला क्लीन चिट दिली. अमेरिकेने अंग काढून घेतल्यानंतर निर्माण झालेली पोकळी साधत चीनने प्रचंड पैसा ओतत आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये आपला वरचष्मा निर्माण केला आहे. जागतिक आरोग्य संघटना तर चीनधार्जिणी असल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे या चौकशीनाटय़ाचा निकाल अपेक्षितच म्हणावा लागेल. अर्थात नंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी थोडे घूमजाव करीत अद्याप याबाबत अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल असे म्हटले आहे, पण तरीही संशयाचा धूर कायमच राहणार आहे.

येणाऱया काळात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, हिंदुस्थान आदी देशांनी अत्यंत गांभीर्याने एकत्र येऊन चीनवर कारवाईबाबतची मागणी लावून धरणे गरजेचे आहे. मागील काळात चीनच्या चौकशीचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेमध्ये आला तेव्हा चीनने व्हेटो पॉवरचा वापर केला होता. त्यामुळे सुरक्षा परिषदही हतबल झाली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आज जागतिक समुदायाने चीनविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जरी धाव घेतली तरी आणि त्यांनी सुनावलेली शिक्षा करण्याचा अधिकार सुरक्षा परिषदेलाच आहे. तिथे चीनला नकाराधिकारासह कायम सदस्यत्व असल्याने या शिक्षेचाही काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आज याबाबत एक विचित्र काsंडी तयार झालेली आहे. इतिहासात डोकावल्यास अमेरिकेने 50-60 वर्षे जगावर अधिसत्ता गाजवली. किंबहुना ती अनिर्बंध हुकूमशाहीच होती. अमेरिकेने अनेक देशांत हस्तक्षेप केले, राजवटी उलथवून टाकल्या, अफगाणिस्तान-इराकमध्ये सैन्य घुसवले, अनेक निष्पाप नागरिकांना मारले; पण कुणीही त्याविरोधात आवाज उठवू शकले नाही. आज तोच प्रकार चीनबाबत घडतो आहे. येणाऱया काळात याबाबत जागतिक समुदाय कशा प्रकारे पावले टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अपेक्षेप्रमाणेच जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी समितीने कोरोना विषाणू संसर्गाच्या उगमाबाबत चीनला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुतः, चीनला या समितीचे जाणे हाच मुळी एक देखावा होता. त्यामुळे ही समिती काय अहवाल देणार हे अवघ्या जगाला माहीत होते. गेल्या वर्ष-सवा वर्षापासून संपूर्ण जगापुढे, आरोग्य विज्ञानापुढे महाआव्हान बनून राहिलेल्या आणि जगाचे अर्थकारण, समाजकारण आदींवर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणाऱया या महामारीस कारणीभूत असलेल्या कोरोना विषाणूबाबत चीनकडे स्पष्टपणाने संशयाची सुई जात आहे. या विषाणूचा उगम हा चीनमधील वुहान शहरात झाला आणि त्याचा प्रसारही चीनकडून झाला, असे आरोप-दावे पुराव्यानिशी केले गेले आहेत. या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एका चौकशी समितीचे गठन केले होते. अर्थात, याबाबत 60 देशांकडून मागणी करण्यात आल्यानंतर ही समिती नेमण्यात आली होती.
कोरोना संसर्गाच्या गेल्या वर्ष-दीड वर्षातील चीनची एपंदर वर्तणूक पाहता ती अत्यंत संशयास्पद आणि गूढ अशी राहिली आहे. कोरोनाचा उगम कसा झाला याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे जगात धुमाकूळ घालणारा हा विषाणू म्हणजे चीनचे बायोलॉजिकल वेपन अर्थात जैविक अस्त्र आहे असा दावा केला गेला आहे. दुसरीकडे चीनमध्ये ज्या पद्धतीने खवल्या मांजर, वटवाघूळ यांसारखे अनेक प्रकारचे प्राणी खाल्ले जातात. त्यातून हा विषाणू प्राण्यांतून माणसांत आल्याचे सांगितले गेले आहे. याबाबत भलेही मतमतांतरे असली तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, चीनने सुरुवातीपासून या विषाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती जगापासून लपवून ठेवली ! वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रसार होऊ लागला होता तेव्हा चीनमधील काही डॉक्टरांनी, शास्रज्ञांनी याबाबत त्वरित जागृत होऊन पावले उचलण्याची गरज असल्याचे तेथील सरकारला सांगितले होते. हा विषाणू वेगाने पसरत असून तो अत्यंत धोकादायक असल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते, पण चीनमधील शी जिनपिंग सरकारने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. परिणामी, या विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत गेला.

गेल्या 20 वर्षांमध्ये चीन हा जागतिक उत्पादन प्रक्रियेचे केंद्र बनल्यामुळे कच्च्या मालासाठी, मूलभूत गरजांसाठी बहुतांश देश हे चीनवर विसंबून आहेत. औषधनिर्मितीचाच विचार करता युरोपियन देश, अमेरिका यांबरोबरीने गरीब देशही मोठय़ा प्रमाणावर चीनवर अवलंबून आहेत. गेल्या दोन दशकांत जागतिक पुरवठा साखळीचा चीन हा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे चीनमधून या विषाणूचा प्रसार होऊनही त्याविरोधात बोलण्यास कोणी पुढे येताना दिसले नाही. अखेर यामध्ये पहिल्यांदा अमेरिकेनेच आवाज उठवला. त्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी चीनवर आरोप करण्यास सुरुवात केली, परंतु चीनची मग्रुरी इतकी की आपल्यावर आरोप करणाऱया देशांविरोधात चीनने अरेरावी सुरू केली. ऑस्ट्रेलियावर आर्थिक निर्बंध टाकले, इंग्लंडला विविध धमक्या दिल्या. अमेरिकेलाही त्यांचा औषध पुरवठा बंद करण्यात येईल, अशा स्वरूपाच्या अनेक धमक्या चीनकडून दिल्या गेल्या. परंतु तरीही जगभरातील सुमारे 60 देश एकत्र आले आणि त्यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत, उगमाबाबत, प्रसाराबाबत चीनची चौकशी करावी, अशी मागणी केली. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली खरी, पण तो केवळ फार्स होता. अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बिल क्लिंटन यांच्या काळात सदस्य राहिलेल्या एका अधिकाऱयांनी एका मुलाखतीत या चौकशीबाबत अत्यंत महत्त्वाचे दावे आणि खुलासे केले आहेत. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत चीनची चौकशी करण्याचे केवळ नाटक केले. या चौकशी समितीमध्ये कोण सदस्य आहेत, हे चीननेच निर्धारित केले होते. त्यामुळे ते चीनविरोधात अहवाल देणार नाहीत हे उघड होते. त्यांचा दुसरा आरोप अधिक महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, जेव्हा ही चौकशी समिती वुहानमध्ये गेली त्यावेळी अनेक बाबींमध्ये माहिती घेणे अवघड होते. म्हणून चीननेच एक प्राथमिक अहवाल तयार केला आणि तो समिती सदस्यांना दिला. सदस्यांनीही तो मान्य केला. परिणामी, या अहवालातील निष्कर्ष हे चीननेच काढलेले आहेत. त्यामुळे हा अहवाल चीनला दोषी धरणे शक्यच नव्हते. थोडक्यात, या समितीचे नाटक करून चीनने आणि जागतिक आरोग्य संघटनेने जगाच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे, असेच म्हणावे लागेल.

आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशा प्रकारची स्थिती नेहमीच पाहायला मिळते. अलीकडील काळात चीनचा हा प्रभाव वाढण्याचे एक कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने अनेक बहुराष्ट्रीय संघटनांमधून अंग काढून घेतले. त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती. याचा फायदा घेत चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा कमालीचा वाढवला. आज विश्व आरोग्य संघटनेलाही चीनकडून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक मदत दिली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांची निवडच मुळी चीनच्या पाठिंब्याने झाली होती. जागतिक संघटनांना अमाप निधीपुरवठा करून चीनने त्यांना आपल्या हातचे बाहुले बनवले आहे. विश्व आरोग्य संघटनेकडून चीनच्या चौकशी समितीची नेमणूक झाल्यानंतर प्रत्यक्ष तपासाची प्रक्रिया सुरू होण्यात बराच अवधी गेला. या काळात चीनने आपले सर्व पुरावे नष्ट करून टाकले. कोणताच पुरावा मागे न राहिल्याने वुहानच्या इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमधून कोरोना विषाणूचा प्रसार झाला अहो, हे सिद्ध करणे अवघड होऊन बसले आहे. परिणामी, आज जगाला अभूतपूर्व तडाखा देऊन चीन नामानिराळाच राहिला आहे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)