शिरीषायन – मामा ओ मामा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
चंद्रकांत पालकर, पुणे

>>शिरीष कणेकर

आमच्या इथे एक गृहस्थ राहायचे. मूर्तिमंत जमदग्नी. किंबहुना जमदग्नी कसे असतील याची मी त्यांच्यावरून कल्पना करायचो. ‘मला चहा द्या’ हेदेखील ते ‘उघडय़ा गटारात टाकून मारीन’ असं म्हणायचे. एके दिवशी ते एकाएकी शांत, सौम्य, मवाळ झाले. देवाची करणी आणि नारळात पाणी.

त्यांच्यातील या अविश्वसनीय, आमूलाग्र बदलाचं कारण मी त्यांच्या मुलाला विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या बहिणीच्या लग्नानंतर हा बदल झाला असावा.’

मी चमकलो. मामाच्या लग्नानंतर मीही समजूतदार, कनवाळू, अबोल झालो असेन का? अरे हो, मामा म्हणजे कोण आधी सांगू दे. मामा म्हणजे माझी मुलगी श्वेता. तिला लहानपणी मी का कोण जाणे, लालूमामा म्हणायचो. पुढे त्यातलं लालू गळून पडलं. फक्त ‘मामा’ राहिलं. आजही दोन मुलांची आई असलेल्या माझ्या मुलीला मी मामा म्हणतो. ते माझ्याबरोबरच संपेल, कारण दुसरं कोणीच तिला मामा म्हणत नाही. आपसूकच ती माझी ‘एक्स्लूझिव्ह’ मामा झाली. मी अण्णांचा ‘मिस्टर शिरीष’ होतो, तशी ती माझी ‘मामा’ झाली.

आजही ती कणेकरच आडनाव लावते. ‘का गं?’ मी विचारलं, ‘इतकी वर्षे कणेकरच होतीस की. आता लग्न झालंय तर नवऱयाचं आडनाव लावायला नको का?’
तिनं नाक उडवलं. पर्यायानं मला उडवलं. मी गप्प झालो. मुलीशी हुज्जत घालणारा बाप अजून जन्माला यायचाय. कणेकर या आडनावाचा इतका अभिमान बाळगणारा पुरुष मला भेटलेला नाही.
शाळेत असताना एकदा घरी आल्या आल्या तिनं मला विचारलं,
‘पपा, टकूराम कोण होता?’
‘टकूराम?’
‘आमची टिचर सांगत होती की, ही वॉज अ पोएट ऍण्ड अ सेंट.’

‘तुकाराम गं चांडाळणी, तुकाराम. टकूराम म्हणे.’
मामापूर्व काळात कधी स्वतःसाठी देवळात गेल्याचं मला स्मरत नाही. मामानं मला भक्तिमार्गाला लावलं. म्हणजे देवळाचा रस्ता दाखवला. परीक्षेचा निकाल जवळ आला म्हणजे निकाल लागू नये म्हणून ती मला घेऊन देवळांच्या वाऱया करायची. मी वडाळय़ाच्या गोण्या मारुतीलादेखील गेलोय. (तो कोणत्या विषयाचा देव होता हे तिला विचारायला पाहिजे.) मी रीतसर प्रदक्षिणा वगैरे घालून बाहेर येतो… तो माझ्या चपला गायब. अंगठे तुटलेल्या व इतक्या झिजलेल्या चपलाही चोरणारे चोर असू शकतात? बाहेर तीन-चार वृद्ध, विकलांग, थकलेल्या भिकारणी बसल्या होत्या. त्यातल्या एकीनं माझ्या चपला समोर नीट मांडून ठेवलेल्या होत्या. तिनं त्या सांभाळून ठेवल्या असं मानून मी तिच्यावर दहा-पाच पैशांची खैरात करावी एवढीच माफक अपेक्षा.

‘पपा, ती भिकारीण तुमच्या ओळखीची आहे?’ मामानं मला विचारलं.
‘हो.’ मी तिरसटून म्हणालो, ‘पूर्वी आम्ही एकत्रच भीक मागायचो!’ मामाचं शंकानिरसन झालेलं दिसलं. त्या म्हाताऱया भिकारणीच्या सुरकुतलेल्या चेहऱयावर मंद स्मित झळकलं. माझ्या मुलीनं माझी योग्यता ओळखल्याचा तो आनंद असावा.

मामा लहान असताना खूप खाबू होती. (खादाडपेक्षा खाबू हा शब्द बाळसेदार, घरगुती व निरुपद्रवी म्हणावा लागेल. लोकांचं मूल ते खादाड, आपलं मूल ते खाबू!) तिचा जन्मच ‘खाऊगल्ली’तला असं मी सांगे.
मामा आठवीत असताना मी सहज गमतीत लिहिलं, ‘नशिबाची व ग्रहांची अशीच साथ राहिली तर ती अशीच शिकत, शिकत, शिकत नववीतदेखील जाईल.’

मामानं ते वाचलं नसावं अशी माझी समजूत होती. पण अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ‘चाइल्ड सायकॉलॉजी’ व ‘स्कूल काऊंसेलिंग’ या दोन पदव्या एकाच वेळी घेतल्याबद्दल विद्यापीठाच्या हिरवळीवर तिचे फोटो निघत होते तेव्हा लांबूनच ती मला ओरडून म्हणाली, ‘पपा, मी आठवीच्या पुढे शिकले बरं का!’

माझे दात तिनं माझ्या घशात घातले होते. काही बोलण्याची सोयच नव्हती. नाहीतरी मुलीपुढे कोणाचं चालतं?

मामा अमेरिकेची झाली. तिकडे हळदीकुंकू करते, सवाष्ण पुजते, वरणापुरणाची जेवणं घालते. ‘हॉलोविन’देखील करते. मुलांसाठी आपलं कायस्थी जेवण करते व त्यांना कौतुक नाही हे पाहून कष्टी होते. माझा पेपरातला फोटो पाहून तिचा थोरला विचारतो, ‘इज ही अ सेलिब्रिटी ऑर अ क्रिमिनल?’ मामातली कणेकर दुखावते.

मध्यंतरी तिने मला माझी जाम खरडपट्टी काढणारा मेल केला. ‘इनफ इज इनफ!’ तिनं निर्वाणीचा बोल लावला. मी सुन्न झालो. मामा सोडून दुसऱया कोणाची बिशाद लागली होती मला असं सांगण्याची? मी ऐकून घेतलं, कारण ती मामा होती. दुसरं कोणी असतं तर मी त्याला उभा आडवा सोलला असता.
मला तीन तीनदा मेसेज करून आणि फोन करून ती सांगते – ‘संध्याकाळी लग्नाच्या रिसेप्शनला प्रभादेवीला टॅक्सी मिळत नाही. तुम्हाला त्रास होईल, तुम्ही जाऊ नका.’
मी जात नाही.
कधी कधी मला वाटतं की माझी आईच तिच्या रूपानं माझ्या आयुष्यात परतली तर नसेल?
कधी कधी आपल्या रात्री तिचा फोन येतो व ती दरडावून म्हणते, ‘जागे का आहात? झोपा आता. ऍसिडिटी वाढेल.’
कोणाला तरी माझी काळजी आहे या विचारानं सुखावून मी झोपतो.

– [email protected]