>> विवेक दिगंबर वैद्य
सिद्ध सत्पुरुष ‘श्री नारायण महाराज’ (बेट-केडगाव) यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणारा हा लेख.
कर्नाटक येथील शिंदगी या गावी वास्तव्यास असलेल्या एका दत्तभक्त घराण्यात श्री नारायण महाराज यांचा जन्म झाला असला तरीही आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा विस्तार बहुतकरून महाराष्ट्रातच झाला. कर्नाटकातील शिंदगी या छोटय़ाशा खेडेगावात भीमराव व लक्ष्मी हे वृत्तीने सालस व देवभोळे असे बेतास बात आर्थिक परिस्थितीतील एक जोडपे राहत होते. या उभयतांची श्री दत्तगुरूंवर विलक्षण श्रद्धा व भक्ती होती. भीमरावांशी लग्न झाल्यानंतर बऱयाच कालावधीने लक्ष्मीबाईंना दिवस गेले. विजापूर जिह्यातील बागलकोट येथील त्यांच्या माहेरी वास्तव्यास असता बाईंनी एका तेजस्वी बालकास जन्म दिला. या बालकाचे नाव ‘नारायण’ ठेवण्यात आले. श्री दत्तकृपेने जन्मास आलेला हा बालक बालवयापासूनच त्याच्या देहकायेवर राजयोग्याची चिन्हे बाळगून होता.
बालवयीन नारायणाला उमज येण्याआधीच त्याच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे दुर्दैवाने पोरकेपणा नशिबात आला. या कारणामुळे नारायण नरगुंद येथे राहणाऱया त्याच्या आजीच्या छत्रछायेखाली राहू लागला. त्याला बालवयातच समज व परिपक्वता आली होती. पुढे पोरवयीन नारायण बहुतांश काळ परमेश्वराच्या नामजपात घालवीत असे. कधी त्याने जवळच असलेल्या वेंकटेशाच्या मंदिरात ध्यानस्थ बसावे तर कधी डोंगरातील एखादी निर्जन गुहा शोधून तिथे ध्यान लावावे असा त्याचा नित्य छंद आणि दिनक्रम होऊन गेला.
नरगुंद येथील श्रीधर भट नामक एका आप्तेष्टामुळे नारायणाला नित्य उपासनेचे बाळकडू मिळाले. स्नानसंध्या, सूर्यनमस्कार, गायत्री मंत्राचा जप, गुरुचरित्र पठण या गोष्टींचे त्याला आकर्षण वाटू लागले अन् अल्पावधीतच ईश्वरी श्रद्धाभक्तीत मग्न राहणाऱया या बालकाने योगमार्गातील अनेक गोष्टी आत्मसात केल्या. तो दिवसरात्र कर्मकार्यातच मग्न राहू लागल्यामुळे त्याचा घरातील वावर दिवसेंदिवस कमी झाला. यावरून म्हाताऱया आजीने कुरकुर करण्यास सुरुवात केली. तेव्हा ईश्वरप्राप्तीचे ध्येय गाठण्याचा निश्चय केलेल्या नारायणाने त्याच्या आजीचे राहते घर सोडले आणि तिला अखेरचे वंदन करून तो भ्रमंतीच्या हेतूने घराबाहेर निघाला.
वयाच्या दहाव्या वर्षी घरदार सोडलेल्या नारायणाने कुंदगोळ, यल्लम्मा परिसर, सोगर, विजापूर, उगूरगोळ, गुर्लहसूर, हुबळी अशी भ्रमंती केली. यादरम्यान त्याला अनेक साधुसंतांचे दर्शन व मार्गदर्शनही लाभले. पुढे हुबळी येथे त्याची भेट सिद्धारूढ स्वामींशी झाली. स्वामींची कृपा प्राप्त झाल्यावर नारायणास शहापूर मुक्कामी असलेल्या विद्यानंद महाराजांकडे (बेलापूर) जाण्याची सूचना करून सिद्धारूढ स्वामींनी ‘‘विद्यानंद महाराजांची परंपरा तुला पुढे चालवायची आहे’’ असे स्पष्ट केले.
श्री विद्यानंद महाराजांकडे रीतसर शिक्षण घेऊन नारायण नृसिंहवाडी, औदुंबर, पलूस, सज्जनगड अशी भ्रमंती करीत पुण्यास आला. दरम्यान, नारायणामधील देवत्वाची प्रचीती अनेकांना अनेकदा येती झाली आणि पाहता पाहता नारायणाचे रूपांतर ‘श्री नारायण महाराज’ या बिरुदावलीत झाले. दौंडजवळील आर्वी येथे त्र्यंबकराव अत्रे यांच्या पत्नीची पिशाचबाधेपासून मुक्तता करणाऱया श्री नारायण महाराजांनी त्यांच्यातील दैवी शक्तीचा प्रत्यय देत अनेकांना रोगमुक्त, समस्यामुक्त केले. श्री दत्तात्रेयांचा नामगजर होताच श्री नारायण महाराजांच्या हातातून गंगेची धार निघत असे. अनेक भक्तांना श्री दत्तात्रेयाचा दृष्टांत होऊन ‘‘श्री नारायण महाराजांचे दर्शन घ्यावे, तो माझाच अवतार आहे’’ असा स्पष्ट दाखला मिळत असे. त्यामुळे श्री नारायण महाराजांना ‘दत्तावतारी’ सत्पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले.
काही दिवसांनी श्री नारायण महाराज पुण्यानजीक सुप्याजवळील एका बेटावर झोपडी बांधून नित्यकर्म प्रारंभ करते झाले. त्यांच्या दर्शनार्थ लोकांच्या झुंडीच्या झुंडी बेटावर येत असत. याच बेटावर असलेल्या एका औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंच्या पादुका प्रकट झाल्याने केडगावजवळील हे बेट अधिकच प्रसिद्धीस आले. बरेचसे भाविक श्री दत्तपादुकांचे व श्री नारायण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. प्रसिद्ध सत्पुरुष श्री अवतार मेहेरबाबा यांचा श्री नारायण महाराजांवर अतिशय लोभ होता.
प्रसिद्ध गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्या आवाजावर एकदा विपरीत परिणाम झाला. औषधोपचारांनीही बरा न होणारा त्रास श्री नारायण महाराजांच्या कृपेने मार्गी लागला आणि त्या व्यवस्थितरीत्या गाऊ लागल्या. या गोष्टीची इतकी प्रसिद्धी झाली की, संगीताचार्य विष्णू दिगंबर पलुस्कर, विविध प्रांतांचे संस्थानिक व जहागीरदार, अमीर-उमराव श्री महाराजांच्या दर्शनास येऊ लागले. याचा परामर्श घेत श्री नारायण महाराजांनी श्री दत्त संप्रदायाचा विस्तार केला आणि श्री दत्तभक्तीची भक्ती प्रेरणा सर्व थरांतील लोकांपर्यंत पोहोचवली.
एकदा पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल वुडहाऊस शिकारीसाठी बेटावर आले. त्यांना अतिशय तहान लागली असता श्री नारायण महाराजांनी तिथे तत्काळ जल निर्माण केले. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि त्या सोबतच श्री महाराजांची कीर्तीही देश-विदेशापर्यंत पोहोचली. अनेक सानथोर मंडळी श्री नारायण महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागली. पूर्वी या बेटावर फडय़ा निवडुंगाचे रान होते. पुढे हे बेट भक्तांनी स्वच्छ केले आणि तिथे अत्यंत सुरेख कमानीदार व नक्षीदार असे श्री दत्तमंदिर व श्री दत्त संस्थान अस्तित्वात आले.
श्री महाराजांचे ‘बेट केडगाव’ तसेच ‘श्री दत्तमंदिर’ या दोहोंचा प्रसार झपाटय़ाने झाला. श्री महाराजांना भेटावयास अनेक प्रांतांतून भक्तगण येऊ लागले. या क्षेत्री संपत्तीचा महापूर वाहू लागला. या बेटाचे स्वरूप ‘ऐश्वर्यसंपन्न संस्थान’ असे होते. पुढे श्री महाराजांनी बेट केडगाव येथे न राहता भक्तांसोबत तीर्थयात्रा करण्यास प्रारंभ केला. ओंकारेश्वर, उज्जयनी, मदुरा, श्रीरंगम्, शिवाकाशी, तिरुपती, बद्रिनारायण, दिल्ली या व अशा अनेक ठिकाणी श्री महाराजांनी प्रवास केला. दरम्यान, त्यांना ऍनिमिया झाला आणि त्यांची प्रकृती खालावू लागली. दिवसांमागून दिवस जात होते. श्री नारायण महाराजांच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नव्हता.
एके दिवशी अचानक श्री महाराजांनी आपल्या भक्तांना बोलावले आणि आपणांस बंगलोर येथे न्यावे असे सांगितले. बंगलोर मुक्कामी 3 सप्टेंबर 1945 रोजी श्री महाराजांनी श्री मल्लिकार्जुनावर अतिरुद्राभिषेक केला. पूर्णाहुतीचा संकल्प सुविहितपणे पार पडल्याचे कळताच श्री नारायण महाराजांनी आपला देह श्री दत्तात्रेयाचरणी विलीन केला. पुढे श्री नारायण महाराजांची समाधी बेट-केडगाव, पुणे येथे बांधण्यात आली. आजही हजारो भाविकांसाठी ‘एकमुखी श्री दत्तमंदिर आणि श्री महाराजांचे समाधीस्थान’ या रूपाने बेट-केडगाव प्रसिद्ध आहे.





























































