
>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीस्वामी महाराजांचा लाडका पुत्र अर्थात ‘सुत’ या संबोधनाने प्रसिद्ध असलेल्या श्रीस्वामीसुतांविषयीचा हा लेख.
अठराव्या शतकाचा उत्तरार्ध आध्यात्मिक जगतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरावा अशी अलौकिक घटना ‘अक्कलकोट’च्या पुण्यभूमीवर घडली. त्यास कारण ठरले ते येथे झालेले श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आगमन. सन 1857 मध्ये श्रीस्वामी महाराजांनी अक्कलकोटची थोरली वेस ओलांडली आणि पुढे 21वर्षांच्या येथील वास्तव्यात त्यांनी केलेल्या अनेकविध लीलाप्रसंगांमुळे अवघा महाराष्ट्रदेश ढवळून निघाला. त्याच सुमारास राजापूर तालुक्यातील विलीये गावाहून आलेले आणि मुंबईस कर्मभूमी समजून कामाठीपुरा परिसरात वास्तव्य करून राहणारे हरीभाऊ दाजिबा तावडे हे सद्गृहस्थ, पत्नी व एकुलत्या एक मुलीसह आपल्या प्रपंचाचा गाडा ढकलीत होते. म्युनिसिपालटीची नोकरी आणि संसार या पारंपरिक चौकटीत रमलेल्या हरीभाऊ तावडे यांना ‘परमार्था’ची खरी जाणीव आणि ओळख झाली ती श्रीस्वामी महाराजांमुळे. नित्य प्रपंचात रमलेला हा सरळमार्गी गृहस्थ अक्कलकोटास गेला अन् श्रीस्वामींच्या सहवासात आपले देहभान विसरून बसला.
श्रीस्वामीरायांनी हरीभाऊंना प्रथमदर्शनी आपलेसे केले इतकेच नाही तर त्यांच्याकडून आग्रहाने चांदीच्या पादुका तयार करवून घेतल्या आणि सतत 14 दिवस त्या पादुकांस स्वचरणी वागवून, त्यांस सर्वांगाचा स्पर्श करून हरीभाऊंना प्रसादरूपाने परतही दिल्या. मात्र त्याच वेळी श्रीस्वामी समर्थांनी पादुकास्वरूप ‘आत्मलिंग’ प्रसादरूपाने देत हरीभाऊंना प्रेमभराने जवळ घेतले आणि त्यांना सांगितले ‘हे माझे ‘आत्मलिंग’ आहे. आता यापुढे तू माझा ‘सुत’ (मुलगा) आहेस. आता तुझा सर्व धंदा-रोजगार सोडून तू बंदर किनाऱयावर आमची ध्वजा उभार.’ श्रीस्वामी महाराजांनी तेथे उपस्थित असलेल्या भक्तमंडळींसमक्ष ‘पुत्र’ म्हणून उल्लेख केल्यामुळे हरिभाऊ पुढे ‘स्वामीसुत’ या नावानेच आजतागायत ओळखले जातात.
श्रीस्वामीसुत महाराजांनी त्यांच्या सच्चिदानंद ब्रह्मांडनायक पित्याच्या आज्ञेनुसार आपला ‘प्रपंच’ अक्षरशः लुटवला, संसारसुखाचा त्याग केला आणि मुंबईनगरीत स्वामीरायांचा झेंडा फडकवला. सन 1870 मध्ये त्यांनी मुंबईनगरीत श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या जन्मोत्सवाचे पहिले आख्यान मांडले तसेच श्रीस्वामींचा पहिला मठ स्थापन करून अनेक शिष्य, अनुयायी आणि भक्तमंडळीच्या सहयोगाने स्वामीकार्याची मुहूर्तमेढ रोवली. हजारो भाविकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. स्वामीसुतांचे राहाते घर भक्तांच्या दाटीने अपुरेपण अनुभवू लागले हे पाहून चिमाबाई बेलावली यांनी गिरगावमधील तिची जागा स्वामीसुतांना देऊ केली.
श्रीस्वामीसुतांच्या रूपाने मुंबईनगरी प्रति अक्कलकोट ठरावी असे हे वातावरण होते. स्वामीसुतांच्या रूपाने मुंबईकर भक्तमंडळींस जणू ‘स्वामीमंत्र’च गवसला होता. स्वामीसुत अनेकदा अक्कलकोट येथे स्वामीदर्शनार्थ जात असत आणि स्वामीरायांसमोर कीर्तनाचा थाट मांडत असत. ‘स्वामीप्राप्ती’ हा स्वामीसुतांच्या आयुष्याचा ‘ध्यास’ होता आणि ‘स्वामीचिंतन’ हा त्यांचा ‘श्वास’ होता. श्रीस्वामीसमर्थांच्या जन्मरहस्याची उकल करणे ही श्रीस्वामीसुतांच्या अवतारकार्याची अतिशय महत्त्वपूर्ण ‘ओळख’ आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांचा ‘जयंती’उत्सव पहिल्या प्रथम साजरा करण्याचा मान स्वामीसुतांकडे जातो. सन 1870 ते 1874 या अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये स्वामीसुतांनी स्वामीनामाचा डंका अवघ्या अध्यात्मविश्वात गाजविला आणि ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा दिव्य मंत्र सर्वत्र पोहोचविण्याचे महान कार्य केले.
श्रीस्वामी समर्थांचे रूप, स्वरूप, त्यांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि त्याची महती या साऱयांचा उलगडा आपल्या अभंग रचनांमधून करणाऱया स्वामीसुतांचे समग्र आयुष्य स्वामीरायांच्या चरणांशी एकनिष्ठ राहिले. स्वामीवियोगाचे दुःख आपल्या नशिबी येऊ नये म्हणून श्रीस्वामीसुतांनी ऐन उमेदीतच देहत्याग केला. त्यांच्या देहविसर्जनाचे वृत्त समजताच साक्षात ब्रह्मांडनायक स्वामीरायांनी धाय मोकलून आकांत मांडावा असे भाग्य केवळ श्रीस्वामीसुतांना लाभले. त्यांनी जाताजाता सर्व भक्तांना स्वामीप्रेमाची ‘अमिरी’ बहाल केली.
स्वामीसुतांनी मुंबईमध्ये श्रीस्वामींची गादीपरंपरा सुरू केली. स्वामीसुतांच्या अकाली जाण्यानंतर पुढे ही परंपरा स्वामीसुतांचे धाकटे बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार आणि त्यांच्या नंतर स्वामीसुतांची कन्या सीता अर्थात सिद्धाबाई नलावडे यांनी अतिशय भक्तीभावपूर्ण श्रद्धेने चालवली. सिद्धाबाईंच्या पश्चात त्यांचे नातू हरीभाऊ आणि नातसून शारदामाई यांनी चेंबूर मठाचे वैभव दिसामासाने वृद्धिंगत केले. सध्या कांदेवाडी मठ अस्तित्वात असला तरीही श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका आणि अन्य वस्तू स्वामीसुतांच्या वंशजांकडे अर्थात चेंबूर येथील श्रीस्वामी समर्थ मठात आहेत. या मठामध्ये आत्मलिंग पादुकांचे पूजन, गुरुपौर्णिमा, श्रीस्वामीसुत पुण्यतिथी आणि श्रीदत्तजयंती हे वार्षिक कार्यक्रम संपन्न होतात. त्या शिवाय श्रीस्वामीसमर्थांच्या जयंतीचा उत्सव श्रीस्वामीसुतांनी आखून दिलेल्या नियमांनुसार, प्रथेनुसार आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो.
सन 1917 मध्ये स्वामीसुतांची लेक सीता जिचे तिच्या बालपणी साक्षात श्रीस्वामी महाराजांनी ‘सिद्धा’ या नावाने कौतुक केले, लाड केले आणि तिच्यावर अपार माया केली त्याच सिद्धाबाईंनी पुढे स्थापन केलेल्या या चेंबूर मठाने गतवर्षी शतकाची वेस ओलांडली. श्रीस्वामी समर्थांचे ‘सिद्ध’स्थान म्हणून ओळखला जाणारा श्रीस्वामीसुतांचा चेंबूर मठ आजही श्रीस्वामींप्रती तितकीच एकनिष्ठता जपत आहे आणि श्रीस्वामीनामाचा कीर्तीध्वज अभिमानाने आणि डौलाने फडकविताना दिसत आहे.





























































