श्रीआनंदनाथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> विवेक दिगंबर वैद्य
श्री स्वामी संप्रदायातील ‘प्रत्यक्ष हिरा’ असलेल्या ‘श्री आनंदनाथ’ या सिद्ध सत्पुरुषाविषयीचा हा लेख.
“स्त्रियस्य चरितम् पुरुषस्य भाग्यम्’ या दोन्हींविषयी परमेश्वरदेखील अनभिज्ञ असतो अशा अर्थाचे एक संस्कृत वचन खरे ठरावे आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ‘वेंगुर्ले’ गावाला सिद्ध सत्पुरुषाचे सान्निध्य लाभावे याकरिताच जणू नियतीने वालावलकर कुटुंबाची निवड केली असावी. या कुटुंबात जन्मलेला आणि ‘गुरुनाथ एकनाथ वालावलकर’ अशी नाममुद्रेची भरघोस खूण वागविणारा बालक चारचौघांसारखे लौकिक आयुष्य जगला, वाढला आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करता झाला.
ऐन उमेदीतल्या गुरुनाथ वालावलकरांनी चरितार्थासाठी हरडय़ाचा (औषधी गुणधर्माचे फळ) विक्री व्यवसाय सुरू केला. मात्र सारे काही स्थिरस्थावर होत असल्याची जाणीव होईपर्यंत त्यांच्या चाकोरीबद्ध आयुष्याला एकाएकी नवे वळण लाभले आणि पुढे आयुष्याच्या अखेरीस गुरुनाथांची ओळख आध्यात्मिक जगताकरिता ‘श्री आनंदनाथ महाराज’ अशी झाली. हे कोणामुळे घडले, का घडले, कसे घडले या सर्व अगम्य आणि अतर्क्य प्रश्नांची उत्तरे केवळ अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांकडे होती.
अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थांचा प्रिय शिष्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱया व पुढे प्रस्थापितही करणाऱया श्री आनंदनाथांचा जन्म तत्कालीन सावंतवाडी परगण्याच्या बांदा गावामधील मडुरे-डिगेवाडी येथे राहणाऱया वालावलकर कुटुंबामध्ये झाला. त्यांचे मूळ नाव गुरुनाथ. बालपण आणि तारुण्य सरताना गुरुनाथ उद्योगधंद्याच्या निमित्ताने वेंगुर्ला कॅम्प व बाजारभागात हरडय़ाचा व्यापार करू लागले. यानिमित्ताने त्यांचे मुंबईस वरचेवर येणे-जाणेदेखील होत असे. मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीट येथे बळवंतराव भेंडे ऊर्फ श्री तात महाराज यांच्या व्यापारी पेढीवर गुरुनाथांचा मुक्काम होत असे. श्री तात महाराजांच्या घरी, जांभूळवाडी येथेही त्यांचे येणे-जाणे असे. श्री तात महाराज अनेकदा बाबूलनाथ येथे जात असत त्यावेळेस गुरुनाथही त्यांच्या सोबत जात असत.
श्री तात महाराज प्रपंचात राहूनही परमार्थात उच्चतम अवस्था प्राप्त केलेले साधक होते. त्यांना श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह लाभला होता. एकेवेळी अक्कलकोट येथे गेले असताना त्यांना श्री स्वामी समर्थांच्या जागी साक्षात श्री शंकराचे दर्शन घडले होते. श्री तात महाराज गुरुनाथांना श्री स्वामी समर्थांविषयी नित्य सांगत असत. त्यामुळे गुरुनाथांची श्री स्वामींना भेटण्याची तळमळ, उत्कंठा दिवसेंदिवस वाढती झाली.
एके दिवशी श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीची भेट व्हावी या तळमळीतून गुरुनाथांनी तडक अक्कलकोटच्या दिशेने धाव घेतली आणि ते श्री स्वामिचरणी दाखल झाले. श्री स्वामिरायांच्या भेटीसाठी मन आसुसलेले होते. कधी एकदा स्वामिचरणी नतमस्तक होऊ अशी त्यांची अवस्था झाली होती. या विचारात असताना त्यांना त्यांच्यामागे अस्पष्टशी हालचाल जाणवली. ते मागे वळून पाहतात तो काय! भक्ताभिमानी, कल्पतरू श्री स्वामी समर्थ साक्षात उभे ठाकले होते. अक्कलकोटमधील श्री स्वामींच्या सहवासातील ते काही क्षण गुरुनाथांच्या उभ्या आयुष्याला ढवळून काढते झाले. श्री स्वामींच्या दिव्य, सगुण रूपामध्ये विरघळून गेलेले गुरुनाथ घरी आले असले तरीही मनाने मात्र श्री स्वामांच्या चरणांपाशी घोटाळत होते. केवळ एका दृष्टिक्षेपात श्री स्वामींनी त्यांचे आयुष्य बदलले. गुरुनाथांनी पत्नीची मनधरणी केली, घडला प्रकार सांगितला. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या पत्नीने त्यांना ‘पुन्हा अक्कलकोटास जाण्यास’ आडकाठी केली नाही. व्यापारधंद्याची जोखीम श्री तात महाराज आणि पत्नीच्या खांद्यावर टाकून गुरुनाथ अक्कलकोटास निघाले.
श्री स्वामिस्वरूप परमेश्वराच्या सान्निध्यात अष्टौप्रहर रमणाऱया गुरुनाथांची भावावस्था दिवसेंदिवस प्रखर होत गेली. श्री महाराजांची सेवा करण्यात गुरुनाथांचा सर्व वेळ खर्च होऊ लागला, देहभान नाहीसे झाले. ज्याला मोक्षरूपी वस्त्र प्राप्त झाले, तो देह झाकणाऱया वीतभर कापडाची तमा ती काय बाळगणार? श्री स्वामी महाराजांनी गुरुनाथांमधील आत्मतत्त्व जागृत केले. बऱयाचदा श्री स्वामी गुरुनाथांना बोलावून ‘‘आनंद करा, आनंदनाथ व्हा!’’ असे सांगत असत. हे पाहून तेथील काही मंडळींनी गुरुनाथांचे नामकरण ‘आनंदनाथ’ असे केले.
श्री स्वामिकृपा प्राप्त झाल्यावर श्री आनंदनाथांमधील सुप्तावस्थेत असलेली काव्य प्रतिभा अधिक तीव्रतेने प्रकट झाली. श्री स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद आनंदनाथांसाठी सरस्वतीचा वरदहस्त ठरला. त्यांच्या काव्य प्रतिभेला श्री स्वामींच्या दैवी साक्षात्काराचा स्पर्श झाला. श्री आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामी महाराजांवर पाच हजारांहून अधिक अभंग, ‘अद्वैत बोधामृतसार’ व ‘अभेद कल्पतरू’ हे दोन ग्रंथ, त्याशिवाय श्रीगुरुस्तव, श्री स्वामिचरित्र, स्तोत्र तसेच अध्यात्मातील अनेक कूट विषयांवर विविध रचना केल्या आहेत. त्यातील काही साहित्य गुं. फ. आजगावकर यांनी ‘श्री स्वामी समर्थ स्तवनगाथा’ या ग्रंथातून प्रसिद्ध केले. अशातच श्री स्वामी समर्थांनी साक्षात सरस्वतीस्वरूप ‘आत्मलिंग’ प्रदान केल्यामुळे श्री आनंदनाथांची प्रतिभासृष्टी अधिकच बहरास आली. काव्यरसामध्ये न्हाऊन गेलेली त्यांची सहजसुंदर पदे, अभंग यामुळे श्री स्वामींच्या चरित्र रेखाटनास अधिक उठाव मिळाला.
श्री स्वामी समर्थांच्या प्रिय शिष्यांपैकी असलेल्या या महत्त्वाच्या शिष्योत्तमाने अल्पावधीतच श्री स्वामी समर्थ संप्रदायामध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. श्री आनंदनाथांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी केलेला श्री स्वामिभक्तीचा प्रचार व प्रसार. ‘स्वामिराज गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।।’ हा श्री स्वामिभक्तांमध्ये विलक्षण लोकप्रिय असलेला नामगजर रचणारे श्री आनंदनाथ महाराज यांचे आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अलौकिक कार्य ‘शिर्डीच्या श्री साईबाबांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रसिद्धीस’ आणण्याचे आहे.
श्री स्वामींच्या आज्ञेने सावरगाव येथे जाऊन स्व-सामर्थ्याच्या बळावर ख्यातकीर्त झालेले श्री आनंदनाथ शिर्डीवासीयांच्या आमंत्रणावरून शिर्डीत दाखल झाले आणि गावकऱयांच्या दृष्टीने उपेक्षित असलेल्या साईबाबांना भेटून ‘‘हा प्रत्यक्ष हिरा आहे’’ असा निर्वाळा देते झाले. या त्यांच्या शिर्डी आगमनामुळे शिर्डीकरांचे साईंविषयीचे प्रेम आणि आदर वाढला आणि साई शिर्डीमध्ये कायमस्वरूपी प्रतिष्ठापित झाले.
श्री आनंदनाथांचे चरित्र प्रसिद्ध संशोधक व लेखक संजय वेंगुर्लेकर यांनी लिहिलेले आहे. श्री स्वामी समर्थांवर अनेकविध प्रकारांतून रसाळ, भक्तिपूर्ण तसेच कूट रचना करणारा श्री स्वामी समर्थांचा श्री आनंदनाथ हा प्रिय शिष्य सन 1903 मध्ये समाधिस्थ झाला. आजही वेंगुर्ला येथे श्री आनंदनाथ समाधी, श्री स्वामी समर्थ मठ व आत्मलिंग पादुका पाहण्यासाठी अनेक स्वामिभक्त नित्यनेमाने जातात.