
>> विवेक वैद्य
16 फेब्रुवारी 1901 रोजी सावंतवाडी नजीकच्या साखळी गावातील मौजीबंधनाच्या कार्यक्रमास साक्षात परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती तथा श्रीटेंबेस्वामी उपस्थित होते. प्रखर दत्तोपासक श्रीटेंबेस्वामींचा वरदहस्त मस्तकावर स्थिरावण्याचे भाग्य ज्या बटूच्या ललाटरेषेवर लिहिले होते तो पुढे ‘आध्यात्मिक सत्पुरुष’ म्हणून प्रसिद्ध व्हावा हा नियतीचा शुभ संकेत होता आणि प्रत्यक्षातही तसेच घडले. साखळी गावच्या बळवंतराव पटवर्धनांचे सुपुत्र दत्तात्रय आणि स्नुषा लक्ष्मीबाई यांच्या पोटी पुढे नागेश, गुरुनाथ आणि रघुनाथ या नावाने ओळखली जाणारी संतती जन्म घेती झाली. या अपत्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचे गुरुनाथ हेच पुढे श्रीविष्णुदास महाराज म्हणून ख्यातकीर्त झाले त्याची हकीकतही अतिशय रंजक आहे.
सातव्या वर्षी मुंज होऊन श्रीटेंबेस्वामींचा आशीर्वाद प्राप्त करणारा गुरुनाथ गावच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे इचलकरंजी येथील वेदपाठशाळेत उपनिषदे आणि वेदविद्येचा अभ्यास पूर्ण करता झाला. दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची चळवळ पूर्ण बहरात होती, तत्कालीन सरकारविरुद्ध असंतोषाचे वारे वाहात होते. अशातच गरीब हिंदूंना प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याविषयीच्या बातम्या कानी येत होत्या. तेव्हा परिस्थितीच्या रेटय़ामुळे धर्मांतर करणाऱया भाबडय़ा अज्ञानी जिवांना योग्य मार्गदर्शन करून पुन्हा स्वधर्माकडे आणण्याची चळवळही जोम धरती झाली आणि त्यात गुरुनाथ सामील झाला. प्रखर देशाभिमानी व धर्माभिमानी गुरुनाथ प्रसंगी श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचा रोष पत्करून चळवळीस नेटाने पुढे नेता झाला. या कृत्याबद्दल त्याला धर्मबहिष्कृत करण्यापर्यंतची वेळ आली, मात्र न डगमगता तो धर्मकार्य करीतच राहिला. पुढे लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य लढय़ात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणाऱया गुरुनाथकडे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. गुरुनाथचा संचार वर्धा, पवनार, अमरावतीपासून थेट लाहोरपर्यंत झाला. आचार्य विनोबा भावे तसेच बाळ कानिटकर यांसारख्या महान विभूतींचा सहवास त्याला लाभला.
या दरम्यान, देव-देश अन् धर्मकार्याचा वसा घेतलेल्या गुरुनाथाची पावले देवकार्याकडे वळली. सतत भ्रमंती करणारा गुरुनाथ काशी येथे मुक्कामी असताना त्याचा परिचय श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे अनुग्रहित साधक श्रीप्रज्ञानंद सरस्वती अर्थात मोघेस्वामी यांच्याशी झाला. गुरुनाथांचे तेजस्वी देखणे व्यक्तिमत्त्व, मराठी-इंग्रजी-संस्कृत तसेच कानडी आदी भाषांवर असलेले उत्तम प्रभुत्व, देव-देश-धर्माविषयीची कळकळ, वेद-उपनिषदांचा गाढा अभ्यास आणि आध्यात्मिक वृत्ती आदी सद्गुणांनी श्रीप्रज्ञानंद सरस्वती आकर्षित झाले. त्यांनी गुरुनाथास कृपाशीर्वाद देत त्यांचे नामकरण ‘विष्णुदास’ असे केले. पुढे विष्णुदासांना संन्यस्त धर्म स्वीकारण्याचे वेध लागले, मात्र श्रीप्रज्ञानंद सरस्वती यांस भविष्यातील सामाजिक अराजकतेचे अचूक भान असल्याने त्यांनी विष्णुदासांना ‘लोकांमध्ये राहून उपासना वाढव’ असा आदेश दिला आणि त्यांचा आदेश शिरोधार्य मानून ‘विष्णुदास’ जगत्कल्याणार्थ भ्रमंतीस निघाले.
प्रथम दक्षिणप्रांत व पुढे हिमालयातील पर्वतरांगा, केदारनाथ, बद्रिनाथ असा प्रवास करीत विष्णुदास श्रीक्षेत्र गाणगापूर येथे स्थिरावले. सुमारे एक तप त्यांनी या दत्तक्षेत्रामध्ये व्यतित केले. श्रीदत्तात्रेयांची निरलस व निरपेक्ष साधना हा त्यांच्या दैनंदिन कार्याचा महत्त्वाचा भाग होता. देहावर एक वस्त्र आणि उपवस्त्र, काखेत झोळी व त्यामध्ये श्रीगुरुचरित्राची पोथी, एका हाती सोटा व दुसऱया हाती पाण्याचा गडू या सामग्रीच्या बळावर सातत्याने भ्रमंती करीत, श्रीदत्तकृपेने जे मिळेल त्यावर गुजराण करीत, कठोर उपासनेचा मार्ग स्वीकारणारे विष्णुदास मथुरेला पोहोचले तेव्हा तेथील एका धर्मशाळेत केलेले वास्तव्य त्यांच्या पुढील अवतारकार्याला वळण देणारे ठरले.
धर्मशाळेत मुक्कामास असलेल्या एका अंध मराठी माणसाचा कुणा दक्षिणात्य माणसाशी पैशाचा वाद चालला होता. त्या मुजोर व्यक्तीने अंध माणसाचे पैसे लुबाडून तेथून पळ काढला तेव्हा ती असहाय्य अंध व्यक्ती मदतीची याचना करू लागली. विष्णुदासांनी त्या व्यक्तीस मदत करण्याचे ठरविले. संपत पातोडे नावाची ती अंध व्यक्ती अकोला जिह्याच्या तेल्हारा प्रांतातील खापरखेडे गावची होती. विष्णुदासांकडे फारसे पैसे नसल्यामुळे असलेल्या पैशात शक्य होईल तितका वाहनाने आणि पुढील प्रवास पायी करण्याचे ठरवून ते दोघेजण निघाले.
ठरल्यानुसार बैतुलपर्यंतचा प्रवास रेल्वेने झाला. उर्वरित प्रवास पायी करण्याचे ठरले. सातपुडा पहाडातून खापरखेडपर्यंतचा प्रवास करेपर्यंत विष्णुदासांच्या पायाला भेगा पडून कातडी लोंबू लागली. संपतबुवा पातोडेंना त्यांच्या घरी पोहोचवून परतू पाहणाऱया विष्णुदासांना अतिश्रम व पायपिटीमुळे ग्लानी आली, अंगात ताप चढला म्हणून त्यांनी भांबेरी गावातील मारुतीच्या देवळात मुक्काम केला. हा मुक्काम त्यांच्या पुढील कार्यासाठी निर्णायक ठरला. विष्णुदासांचे तेजस्वी व्यक्तित्व, विचारांमधील सुस्पष्टता अन् कठोर आचरण यामुळे त्यांच्या भवताली दर्शनाथांचा मेळा जमू लागला. विष्णुदासांची तब्येत पूर्ववत झाली असली तरीही त्यांचे नैमिक्तिक आचरण, भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्याविषयीचा लोभ वाढू लागला. याच कालावधीत विष्णुदासांनी भांबेरी गावामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले. परस्परातील सामंजस्य व सलोखा पूर्ववत केला, मात्र कालांतराने गावातील विघातक वृत्ती पुन्हा मूळ धरू लागल्याचे पाहताच विष्णुदासांनी भांबेरी गाव सोडले व ते गाडेगावास आले. ग्रामस्थांचे दुर्दैव असे की, येथेही कालांतराने भांबेरी गावाचीच पुनरावृत्ती झाली.
या कटू अनुभवानंतर मात्र शेगाव-तेल्हारा मार्गावर किसनराव वडतकार यांच्या शेतात मुक्कामी आलेले विष्णुदास तेथेच कायमस्वरूपी विसावले. येथे त्यांनी श्रीदत्तात्रेयांची मूर्ती स्थापित केली आणि सर्वोपयोगी उपासना पद्धतीचा मार्ग अनुसरून सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले. आध्यात्मिक तसेच सामाजिक उपक्रमांना चालना दिली. सर्व संप्रदाय, सर्व जाती आणि सर्व थरातील मंडळींमध्ये एकोपा निर्माण केला.
‘व्यक्तींपेक्षा विचार श्रेष्ठ’ या धारणेतून निर्माण केलेला अन् आज सर्वत्र ‘दत्तवाडी’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर केवळ ‘देऊळ नाही तर जगण्याची पद्धत आहे’, ‘येथे चमत्काराला स्थान नाही हाच खरा चमत्कार आहे’ अशा प्रगत विचारांची ग्वाही देत आहे. समाज प्रबोधनाचा दिंडी वाहणारे अध्यात्ममार्गी समाज-सत्पुरुष श्रीविष्णुदास महाराज दि. 8 जून 1990 रोजी श्रीदत्तरूपाने विलिन झाले. त्यांचे कार्य आणि अवतारमाहात्म्य जयंत मनोहर देव यांनी ग्रंथबद्ध केले असून बाळ महाजन लिखित संक्षिप्त चरित्रातूनही उपलब्ध आहे.


























































