गुडघेदुखीवर प्रभावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीए अभिजीत कुलकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर

शरीराचा अधोभाग म्हणजेच कमरेपासून खाली पायांच्या बोटापर्यंतचा भाग. आपल्या पायांमध्ये आपल्या शरीरातील ऊर्जा संचय केला जातो. आपल्या मस्तिष्काला प्रभावित करणारे काही मर्मबिंदू आपल्या पायामध्ये असतात. पचनसंस्थेवर प्रभाव टाकणारे वज्रबिंदू पोटऱयामध्ये असतात. या भागाचे आरोग्य उत्तम राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या पायांच्या नसांना चांगला ताण दिला गेला पाहिजे.

 पायाचे गुडघे वयोमानानुसार कमकुवत होतात आणि त्यामध्ये गुडघेदुखी सुरू होते; पाय दुखायला लागतात. पायाच्या तळव्यांची आग होते. हे सर्व टाळायला हवे असेल तर आपल्या शरीराच्या अधोभागाला काही विशेष आसनांचा अभ्यास नियमितपणे दिला पाहिजे.

जानू–शिरासन

जमिनीवरती पाय पसरून ताठ बसावे. पायामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. नंतर आपला उजवा पाय दुमडून उजव्या पायाचा पाऊल डाव्या मांडीला लागेल अशा प्रकारे बसावे. नमस्कार करावा. पाठीचा कणा सरळ ताठ खेचून ठेवावा. डोळे बंद करून ओमकाराचे ध्यान करावे उच्चारण करावा. तद्नंतर डाव्या बाजूला थोडे वळून सावकाशपणे खाली वाकावे आणि आपलं कपाळ/ ललाट/ भाल आपल्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. हे करत असताना पाठीचा कणा शक्य तितका ताठ सरळ असू द्यावा. खांदे सहज सोडून द्यावे. त्यांना घट्ट करून ठेवू नये. हातांनी डाव्या पायाचे पाऊल पकडून ठेवावे. मन शांत ठेवून थोडा काळ या आसनाच्या स्थितीमध्ये स्थिर राहावे. आपल्या डाव्या पायाच्या मागून गेलेल्या नसांना आपल्या डाव्या नितंबाला या आसनाने अतिशय उत्तम प्रकारचा ताण दिला जातो. थोडय़ा वेळाने हीच क्रिया उजव्या बाजूनेही करावी. त्यामुळे दोन्ही पायांच्या नसा उत्तमप्रकारे खेचल्या जातात. नसा खेचल्या गेल्यामुळे आपल्या गुडघ्यांची, गुडघ्यांच्या स्नायूंची वेदना सहन करण्याची क्षमता वाढते; अपचनाचा त्रास दूर होतो. आपल्या पायामध्ये, पायाच्या तळव्यांमध्ये अगदी पायाच्या बोटांपर्यंत रुधिराभिसरण उत्तम प्रकारे झाल्याने टाचांची दुखी कमी होते आणि तळव्यांची आग होणे थांबते.

परिवृत्त जानू शिरासन / जानू कर्ण आसन

सर्वप्रथम पायामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून जमिनीवर बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ राहू द्यावा. तद्नंतर आपला उजवा पाय दुमडून उजव्या पायाचा पाऊल डाव्या मांडीला चिकटवून ठेवावे. नमस्कार करावा. हात वर नेऊन डोक्यावरती नेऊन खेचून ठेवावेत. नमस्कार करावा. डोळे बंद करून ओमकाराचं ध्यान स्मरण आणि उच्चारण करावे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताने डाव्या पावलाचा अंगठा पकडून ठेवावा आणि आपला डावा कान गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. डावा हात हा आपल्या सोयीप्रमाणे जमिनीवर पसरून ठेवावा किंवा पोटावरती किंवा मागे कमरेवरती ठेवावा. या आसनामध्ये आपल्या शरीराच्या बगलेला तणाव दिला जातो ताण दिला जातो. हीच क्रिया थोडय़ा वेळाने उजव्या बाजूने करावी या क्रियामुळे शरीराच्या बगलेचे स्नायू खेचले जाऊन cramp येण्याचे प्रमाण कमी होते. शरीरामध्ये रुधिराभिसरण उत्तम प्रकारे होते.

 www.bymyoga.in