लेख – मराठी भाषा भवन : अभिजात मराठीचे ज्ञानमंदिर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर

2008 पासून सुरू झालेली मराठी भाषा भवनाच्या निर्मितीची प्रक्रिया आता म्हणजे 2022मध्ये आकार घेत आहे. मराठी भाषा भवनाचा 14 वर्षांचा वनवास संपणार आहे. मराठी भाषा भवन ही फक्त दगड-विटांची इमारत न राहता ते अभिजात मराठी भाषेचे ज्ञानमंदिर असेल. मराठी भाषाज्ञानाची गुढीच जणू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभारली गेली असून त्याचा जगातील 13 कोटी मराठी भाषिकांना सार्थ अभिमान आहे!

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी अनेक प्रयत्न अनेक वर्षे करीत असले तरी गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कामाची गती आणि प्रगतीची प्रचीती येत आहे. मग ते मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी उभारलेले लोकाभियान असो अथवा भिल्लारप्रमाणे अन्य चार ठिकाणी पुस्तकाचे गाव उभारण्याची सुरुवात असो, अशा फक्त लोकप्रिय घोषणा न करता प्रत्यक्षात कृती करताना महाविकास आघाडी सरकार दिसत आहे. मराठी भाषा प्रसारासाठी, संवर्धनासाठी घेतलेल्या निर्णयापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबईत मराठी भाषा भवनाची निर्मिती हा होय. गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

तसं पाहिलं तर, मराठी भाषा भवन निर्मितीची घोषणा जून 2008 सालच्या पावसाळी अधिवेशनात दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. रंगभवनाची जागाही त्यासाठी निश्चित केली होती. रंगभवन येथे मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार होती, परंतु काही वर्षे हा प्रकल्प रखडला. भाषा भवनाची एक वीटही रचली गेली नाही. नंतर रंगभवनाची वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट झाली म्हणून 2018 साली वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्याचे प्रयत्न झाले आणि आता अखेर मरीन ड्राईव्ह परिसरातील बालभवन येथील मोक्याच्या जागेवर मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे, तर नवी मुंबईत उपकेंद्र असेल. आर्किटेक्ट पी. के. दास यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा भवन प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या वास्तूच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील तेरा कोटी मराठी भाषकांना जोडण्याचा प्रयत्न आहे. आजच्या पिढीला इंग्रजी जवळची वाटते, कारण ती रोजगाराची भाषा आहे, परंतु यात मातृभाषा मराठी हरवून जाऊ नये आणि मराठी भाषेची गोडी युवापिढीत कायम राहावी म्हणून व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवण्याचे काम होईल.

गेल्या तीस महिन्यांत महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, विकासासाठी काही ठोस निर्णय घेतले, आदेश दिले आणि त्याची पूर्तताही केली. या कृतीमुळे सरकारचा मराठी भाषाभिमान प्रकट होतो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिनानिमित्त ‘मी मराठी, माझी मराठी’ हा मराठी बाणा जपण्याचे आवाहन राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले, तर पुस्तकांचं गाव योजनेचा राज्यभर विस्तार करण्याची घोषणा करून प्रत्येक जिह्यात किमान एक पुस्तकाचे गाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर नागपूर, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अशा चार विभागांत पुस्तकांच्या गावांचा समावेश नुकताच केला आहे. अमृतातेही पैजा जिंकणाऱया मराठी भाषेला लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारशी पाठपुरावा सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य सरकारने पत्रदेखील धाडले आहे. मराठी भाषिकांनी राष्ट्रपतींना लाखो पोस्टकार्ड पाठवून विनंती करण्यात आली आहे. प्रबोधन पाक्षिकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य, पुरोगामी विचार नव्या पिढीपर्यंत विविध उपक्रमांद्वारे पोहचवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील दुकानाच्या आणि आस्थापनाच्या पाटय़ा मराठीत मोठय़ा अक्षरात असाव्यात असा अध्यादेश राज्य सरकारतर्फे काढण्यात आला असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. आदेश न पाळणाऱयांवर कठोर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.

या मराठी भाषा भवनात मराठी भाषेची परंपरा, प्राचीनत्व आणि मराठी भाषा अभिजात कशी होती यासाठी मराठी भाषेचा इतिहास तीन कालखंडांत प्रामुख्याने मांडण्यात येणार आहे. त्यात एक-दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंडात मराठी भाषेची प्रगती कशी झाली आणि तेव्हाची स्थिती कशी होती. पुढे ब्रिटिश कालखंडात मराठी भाषेचा प्रवास आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आतापर्यंतच्या आधुनिक कालखंडातील मराठी भाषेचा प्रवास यामध्ये असेल. मराठी वाङ्मय, साहित्य, लोककला, बोलीभाषा. मराठी जनजीवन यांची स्थित्यंतरे काळाप्रमाणे कशी होत गेली याची नव्या पिढीला माहिती दिली जाईल. साहित्य, कला व संस्कृती त्या काळात कशी होती हे दाखवण्यात येईल. त्यावर आता काम सुरू आहे. त्याशिवाय ऍम्फी थिएटर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल. अभिजात मराठी भाषेचे भांडार जगासमोर साकारणार आहे.

केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दक्षिणेतील राज्यांत सरकारने तेथील भाषा सर्वत्र सक्तीची केली आहे. आता सर्व व्यवहारात मराठी सक्तीची करून एक पाऊल महाराष्ट्राने पुढे टाकले आहे. ‘बोलतो तसे करून दाखवतो’ हे सरकार राज्यात असून सरकारचा जाज्वल्य मराठी भाषाभिमान वेळोवेळी कृतीतून दिसून आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनाही त्याचा अभिमान आहे! मराठी भाषा भवनाची सुसज्ज इमारत दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. मराठी भाषेचे वैभव व इतिहास केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर देश-विदेशातील मराठी भाषकांसमोर नव्याने येणार असून तीन कालखंडांतील मराठी भाषेच्या ज्ञानाचा खजिना खुला होणार आहे.

2008 पासून सुरू झालेली मराठी भाषा भवनाच्या निर्मितीची प्रक्रिया आता म्हणजे 2022मध्ये आकार घेत आहे. मराठी भाषा भवनाचा 14 वर्षांचा वनवास संपणार आहे. मराठी भाषा भवन ही फक्त दगड-विटांची इमारत न राहता ते अभिजात मराठी भाषेचे ज्ञानमंदिर असेल. मराठी भाषाज्ञानाची गुढीच जणू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभारली गेली असून त्याचा जगातील 13 कोटी मराठी भाषिकांना सार्थ अभिमान आहे!