मुद्दा – पर्यटन विकास म्हणजे देशाचा विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

आजचे  धावपळीचे जीवनमान, त्यामुळे अनेकांना आपला व्यक्तिगत वेळ मिळत नाही. अशा वेळी वर्षाखाली आपल्यासाठी थोडा वेळ काही दिवस बाजूला ठेवून आपण पर्यटन करू शकतो आणि त्यामुळे परत उत्साहाने आपण आपल्या कामकाजात राहू शकतो.

पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे असे म्हटले जाते. अर्थात त्यात सत्यता आहे. कारण जगातील काही देशांची तर बहुतांशी अर्थव्यवस्थाच तेथील पर्यटनावर व त्यावर आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील पर्यटनही गेल्या काही वर्षांत जवळपास  30-35 टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनातही वाढ झाली आहे. या पर्यटनवाढीचे मुख्य कारण आहे त्या त्या देशातील, राज्यातील, निसर्गसंपन्न प्रदेश, इतिहासाच्या खुणा जपणारे ऐतिहासिक गड आणि किल्ले आणि तेथील स्थानिक संस्कृती, उंचसखल डोंगरदऱ्या, समृद्ध जंगले, अभयारण्य, निसर्गरम्य समुद्र किनारे, वैशिष्टय़पूर्ण जैवविविधता,  नद्या, धबधबे व खाडय़ा,  छोटी मोठी बेटे, गवतांचे गालिचे पसरलेली पठारे, पाण्याचे तलाव आणि धार्मिक स्थळे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते. पर्यटनाला चालना देणे हा जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. लोक जेव्हा पर्यटनाला फिरायला येतात तेव्हा तिथेच थांबतात आणि त्यामुळे त्यांचे हॉटेलिंग, खाणे, पिणे आणि खरेदीही करतात आणि त्यामुळे पर्यटन व्यवसायाला आणि रोजगाराला चालना नक्कीच मिळू शकते.

आपल्या राज्यात जशी अजिंठा, वेरूळ, गणपतीपुळे समुद्र किनारा, कोकणातील निसर्गसौंदर्य, महाबळेश्वर, नेरळ-माथेरान आदी तसेच देशाचा विचार केला तर ताजमहाल, आग्रा, मथुरा, वृंदावन, राजस्थान, मैसूर, उटी, कश्मीर अशी खूप छान ठिकाणे आहेत. अशा पर्यटनस्थळी जाताना फक्त मौजमजा करायला जाण्याचा विचार न करता तेथील निसर्ग  जाणून घेतला तर त्याचा खरा आस्वाद आणि आनंद आपल्याला घेता येतो. आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोहोचणार नाही व पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता राहील,  तेथील सौंदर्याची जपणूक होईल याची काळजी पर्यटकांनी घेतली पाहिजे. पर्यटन व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवायला हवे. आज आपण बघतो की, अनेक पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाण आदी ठिकाणी अस्वच्छता असते. अर्थात त्याला कारण  स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता हेच असते. त्याविषयी जागरुकता निर्माण होणे अत्यावश्यक आहे.  त्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने कडक धोरण अवलंबणे आवश्यक आहे. कारण परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसमोर आपल्या देशाची प्रतिमा मलिन व्हायला नको हीसुद्धा खबरदारी घ्यायला हवी. जेणेकरून पर्यटकांच्या मनात आपल्या पर्यटनस्थळाविषयी चांगली भावना निर्माण होईल. पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकास त्या स्थानाचे महत्त्व तसेच माहिती करून देणारी व्यवस्था होणे आवश्यक आहे. तसेच माध्यमांद्वारे पर्यटनस्थळाची ओळख करून देणारे कार्यक्रम दाखविले जावेत.

 पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारू शकते. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी यावे म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. आजही सिंगापूरचे उदाहरण समोर आहे.

प्रत्येक राज्यात पर्यटन विकास महामंडळ आहे. ते पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पर्यटकांना सुखसोयी उपलब्ध करून देत असते तसेच राज्य, देश व परदेशातील पर्यटकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असते. मात्र त्यासाठी स्थानिक पातळीवर व पर्यटकांकडून योग्य तो प्रतिसादही आवश्यक असतो

 महामंडळ स्वतः चालवत असलेल्या पर्यटक निवासाच्या आरक्षणावर व्यक्ती अथवा संस्थांना सवलत देण्यात येते. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार हंगामी व बिगर हंगामी सवलत देण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार  सवलत 6 ते 16 वर्षे वयापर्यंत देण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार सवलत देण्यात येते. ज्या अपंग व्यक्तीकडे  अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे, अशा व्यक्तींसाठी  सवलत देण्यात येते. भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त अथवा कार्यरत सैनिकांना प्रमाणपत्र व ओळखपत्राच्या आधारे  सवलत देण्यात येते. सवलतीच्या दरात बदलही होत असतो.आता तर वाय-फाय इंटरनेट सेवाही दिली जाते. पर्यटन उद्योग वाढीस लागावा म्हणून खासगी पंपन्यांकरिता चर्चासत्र, कल्याण कार्यक्रम, स्नेहसंमेलन याकरिता महामंडळाच्या पर्यटक निवास आरक्षणात सवलत दिली जाते.

आता धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली आहेत. ऋतू, कालामानानुसार पर्यटक त्या त्या ठिकाणी जाऊ शकतात. मानसिक ताण घालवून आनंद समाधान मिळवू शकतात व आपल्या जीवनातला आनंद द्विगुणित करू शकतात.