आभाळमाया – शेजारची दीर्घिका

[email protected]

गेल्या लेखात आपण आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळच्या ताऱयाची माहिती घेतली आणि असे अब्जावधी तारे आपल्या आकाशगंगा किंवा ‘मिल्की वे’ या दीर्घिकेमध्ये आहेत हेसुद्धा जाणून घेतलं. या दीर्घिकांचे विस्तार आणि आकार यावर वेगळा लेख होईल, पण आपल्या आकाशगंगेचा विस्तार या टोकापासून त्या टोकापर्यंत 1 लाख प्रकाशवर्षे इतका आहे. याचा अर्थ आपल्या आकाशगंगेत इकडून-तिकडे जायला प्रकाशाच्या सेकंदाला 3 लाख किलोमीटर या वेगाने 1 लाख वर्षे लागतील. आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगेच्या पेंद्रस्थानी असलेल्या विराट कृष्णविवरापासून 30 हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आपली सूर्यमाला या केंद्रकाभोवती 25 कोटी वर्षांत एक फेरी पूर्ण करते. म्हणजे पृथ्वीचं एक वर्ष 365 दिवसांचं तर सूर्यमालेचं अशा 25 कोटी वर्षांचं! या सगळय़ा अंतराळी प्रवासात आपल्याला बिलकूल न जाणवणारा आपला ‘वेग’ आहे सेकंदाला सुमारे 250 किलोमीटर! एवढय़ा वेगात जगातलं कोणत रॉकेटसुद्धा जात नाही. तर अशा या आपल्या आकाशगंगेची शेजारी ‘दीर्घिका’ कोणती? तिचं नाव ‘अॅन्ड्रोमीडा’ पहिले मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या ‘अॅन्ड्रोमीडा’चं देवयानी असं समर्पक नामकरण केलंय.

तर ही देवयानी दीर्घिका आपल्यापासून 22 लाख प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजेच पुन्हा तेच गणित. प्रकाशाच्या वेगाने तिथे पोचायला 22 लाख वर्षे लागतील. तरीही ती सर्वात जवळची दीर्घिका! ही दीर्घिका रात्रीच्या निरभ्र आकाशात नुसत्या डोळय़ांनीही धूसर स्वरूपात का होईना पण दिसू शकते. या दीर्घिकेच्या जवळची आणखी त्रिकोणीय दीर्घिकाही दुर्बिणीतून पाहता येते. चार ते पाच इंच व्यासाच्या दुर्बिणीतून ‘देवयानी’चे स्पष्ट दर्शन होते. त्यापेक्षा मोठय़ा व्यासाच्या दुर्बिणीतून तर फारच छान दिसू शकते.

1928 मध्ये खगोलशास्त्र्ाज्ञ हबल यांनी एक सिद्धांत मांडला की, विश्वातील सर्व दीर्घिका परस्परांपासून दूर जात आहेत. एपूणच विश्वाच्या प्रसरणाच्या सिद्धांताला त्यामुळे प्रत्यक्ष पुरावा मिळाला आणि विश्वनिर्मितीचा ‘बिग बॅन्ग’ सिद्धांत वैज्ञानिक जगताने स्वीकारला. तोपर्यंत स्थिर विश्व कल्पनेची चर्चा होत होती. ती आजही सुरूच आहे. या ‘सैद्धातिक’ वादांमधून नेहमीच तत्त्वबोध होत असतो. कारण ते कोणा व्यक्ती वा समूहांमधले नसून केवळ अभ्यासाच्या पातळीवरचे असतात. खगोलीय प्रमेयाबद्दलची मतांतरं तर गणिती अभ्यासावर आणि दृश्य निरीक्षणांवर ठरतात.

आता सर्व दीर्घिका परस्परांपासून दूर जात असल्याचं मान्य करून तांत्रिक भाषेत त्यांच्या रेड शिफ्ट’चा सिद्धांत मानला की ‘देवयानी’ दीर्घिका आपल्या आकाशगंगा दीर्घिकेपासूनही दूर जात असेल असं साहजिकच वाटेल, पण तसं नाही. दीर्घिकांच्या या दूर जाण्याच्या ‘प्रवासात’ काही दीर्घिका अपरिहार्यपणे परस्परांच्या जवळ येणार. तसाच प्रकार आपली आकाशगंगा आणि ‘शेजारच्या’ देवयानी दीर्घिकेबाबत घडतो. या जवळ येण्याला ‘ब्लू शिफ्ट’ असं म्हणतात. म्हणजे प्रसरणशील विश्व सिद्धांतानुसार दूर जाता-जाताच हे दोन दीर्घिकांचे जवळ येणं हा स्थानिक परिणाम किंवा ‘लोकल इफेक्ट’ म्हणावा लागेल.
आकाशगंगा आणि देवयानी जवळ येता येता कधीकाळी परस्परांना टक्करतील! तो काळ 5 अब्ज वर्षांनंतरचा असेल. मग त्यावेळी या दोन्ही दीर्घिकांमधल्या असंख्य ताऱयांची परस्परांवर आदळआपट होईल, की काही तारे त्यातून एकमेकांत विलीन होतील? यात ताऱयांभोवतीचे ग्रह खिजगणतीतही नाहीत हे लक्षात घ्या. विशाल ताऱयांचे समूह परस्परांना टक्करले तरी फारशी ‘आदळआपट’ होणार नाही असं अभ्यासक म्हणतात. कारण मूळात दोन्ही दीर्घिकांमधल्या ताऱयांची एकमेकांपासूनची अंतरं प्रचंड आहेत. त्यामुळे बहुदा दोन्ही दीर्घिकांमधले तारे परस्परांना ‘क्रॉस’ करून सुखाने मार्गक्रमण करतील. याला उदाहरण म्हणून रस्ता क्रॉस करताना दोन्हीकडची गर्दी परस्परांना न टक्करता आरपार निघून जाते याचा उल्लेख केला जातो. अर्थात ‘टक्कर’ उत्पाती झालीच तरी आपल्या सूर्यमालेचंच तेव्हा अस्तित्व नसणार, मग आपण पुठले? तेव्हा तोपर्यंत देवयानीचं दुर्बिणीतून दर्शन जरूर घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या