
>>डॉ. दिलीप धानके<<
आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. शेवटचे दोन महिने पाऊस न पडल्याने कोकणासह ठाणे जिल्हासुद्धा चाराटंचाईच्या चक्रव्यूहात सापडला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने चारा साक्षरता अभियान सुरू केले व मोठय़ा प्रमाणात गाव, खेडय़ात जाऊन जनजागृती घडवली. ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने एक चित्ररथ तयार करून गावोगावी चारा साठवण, चारा लागवड व निकृष्ट चारा सकस करणे व चारा पिके लागवड याबाबत प्रबोधन केले.
पशुसंवर्धन विभाग हिरवा चारा लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे पुरवठा करीत असतो. त्यातूनच आता गावोगावी ‘चारायुक्त शिवार’ ही संकल्पना पुढे येत आहे. परंतु कोकणातील ठाणे जिह्यातील पारंपरिक भाताचा पेंढा व जंगली गवत हा सुकवलेला चारा खायला घालून आपले पशुधन वाचवले जाते. परंतु हा चारा पाचक, पौष्टिक नाही. फक्त जनावरांचे पोट भरले जाते. तसेच हा चारा कुजला तर बुरशी येऊन त्यातूनच जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणूनच भाताचा पेंढा किंवा गवतावर युरिया फ्रक्रिया करून तोच चारा सकस करून पशुखाद्य म्हणून वापरता येतो. काय आहे हे शास्त्र्ा ते समजून घेणे गरजेचे आहे.
वाळलेल्या वैरणीवर युरिया प्रक्रिया करण्याची आवश्यकता का आहे? शहापूर व मुरबाड हे दोन तालुके प्रामुख्याने पशुधनयुक्त दुग्धव्यवसायाची गंगोत्री म्हणून ओळखले जातात. याच दोन तालुक्यांत जनावरांचे आहारशास्र, चारानिर्मिती व निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा करणे ही त्रिसूत्री अमलात आणणे गरजेचे आहे व याबाबत पशुपालक शेतकऱ्यांनीसुद्धा पारंपरिक गैरसमज व पुरातन अंधश्रद्धा गाडून पुढे आले पाहिजे. माझं तेच खरं हे धोरण शेतकरी बंधूंनी सोडून आधुनिकतेकडे पाऊल टाकले पाहिजे व दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी पशुवैद्यकांचा सल्ला ऐकूनच आपला पशुधनाचा किल्ला लढवला पाहिजे.
जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी, दुभत्या जनावरापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी गाई व म्हशींचा आहार समतोल असणे आवश्यक आहे. खरीप हंगाम वगळता जनावरांच्या आहारात हिरव्या वैरणीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे त्यांना भाताचा पेंढा मोठय़ा प्रमाणात खाऊ घातला जातो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असते. या वैरणीची पचनियता व चवही समाधानकारक नसते. अशा प्रकारच्या वैरणी गाई-म्हशीची पोषक द्रव्यांची गरज भागवू शकत नसल्यामुळे जनावरांना पशुखाद्यासारखा महागडा पूरक आहार द्यावा लागतो. कोकणासह ठाणे-पालघर जिह्यात भाताचा पेंढा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. याच पेंढय़ावर युरिया प्रक्रिया केल्यास व प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना खाऊ घातल्यास पशुखाद्यावरचा खर्च शून्यावर येईल व दुभत्या गाई-म्हशींना प्रथिनयुक्त चारा आपल्याच दारात तयार होईल.
वाळलेल्या वैरणीवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे साहित्य ः 1) भाताचा पेंढा 2) युरिया प्रतिकिलो वैरणीस दोन किलो 3)प्लॅस्टिकची बादली 4) मिश्रण फवारण्यासाठी झारी 5) लाकडी दाताळे 6) प्लॅस्टिकचा कागद किंवा गोणपटाचे पोते 7) 1/2 किलो मीठ 8) दोन किलो जुना गूळ 9) पॉलिथीन बॅगा.
युरिया प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी ः
1) चारा प्रक्रियासाठी सारवलेली स्वच्छ जागा किंवा सिमेंट फरशी किंवा कोबा केलेली जागा निवडावी.
2) वाळलेला 100किलो पेंढा व्यवस्थित पसरून ठेवावा व 4 ते 6 इंच उंचीचा समान थर करावा.
3) प्लॅस्टिकच्या टाकीत 10 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये 2 किलो युरिया पूर्णपणे विरघळून घ्यावा.
4) युरिया व पाण्याचे तयार केलेले अर्धे मिश्रण वाळलेल्या वैरणीवर समप्रमाणात झारीने हळूहळू फवारून घ्यावे.
5) लाकडी दाताळ याच्या सहाय्याने किंवा हाताने वैरण पेंढा खाली-वर करावा.
6) उर्वरित मिश्रणात 1/2 किलो मीठ विरघळून पूर्ण मिश्रण पुन्हा फवारावे.
7) प्रक्रिया केलेल्या वैरणीचा कोपऱ्यात ढीग करताना वैरणीचे थरावर थर देऊन भरपूर दाब द्यावा म्हणजे वैरण घट्ट दाबली जाईल.
8) वैरणीचा ढीग गोणपाटाने किंवा प्लॅस्टिकच्या कागदाच्या सहाय्याने पूर्ण झाकून ठेवावा किंवा पारदर्शक पॉलिथीन बॅगमध्ये ठासून भरून ठेवावे व पिशवी पूर्ण बांधून घ्यावी. असा चारा पूर्ण चार आठवडे उघडू नये किवा हलवू नये.
9) चार आठवडे उबविल्यानंतर वाळलेल्या वैरणीचा रंग पिवळा, सोनेरी होऊन वैरण खाण्यास योग्य अशी तयार होते.
पशुपालकांनो, अशी चारा प्रक्रिया प्रात्यक्षिक आपल्या गोठय़ात, शिवारात आम्ही प्रत्यक्ष येऊन करतोच पण तुम्ही पण हा समर्थ पर्याय आजपासून निवडा. आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारून सल्ला घ्या. झीरो बजेट चारानिर्मिती करून आपले दुग्धउत्पादन वाढवून आपले पशुधन निरोगी व सुदृढ बनवा. आज शेतकरी बंधूंना चारा साक्षरता समजली तरच खरी पशुक्रांती होईल.
(लेखक ठाणे जिल्हा परिषदेत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आहेत.)





























































