
>> दिवाकर गंधे
हिंदुस्थानात चित्रपट युगाला प्रारंभ झाला तो 1912-1913 पासून आणि तोही चरित्रपटापासूनच. तो म्हणजे 1913 ते 1931 म्हणजे 17-18 वर्षांचा काळ हा मूकपटांचा काळ होता. चित्रपट चालत होता, हालत होता, पण बोलत नव्हता. या काळात मोठ्या प्रमाणात मूकपट निघालेत. चित्रपट हा अप्रूप होता. नवलाईचा, थक्क करण्याचा, स्वप्नवत वाटणारा विषय होता आणि असंख्य लोकांवर एकाच वेळी जादूटोणा करणारा होता. 7 जुलै 1896 रोजी सर्वप्रथम मुंबईच्या वॅटसन हॉटेलमध्ये सिनेमाटोग्राफ या नावानं ल्युमियर ब्रदर्सनं या जादूटोण्याची सुरुवात केली. The sea Bath, Arrival of a train, Damotation of wall, Baby’s Break fast इ. इ. छोट्या छोट्या फिल्मस् त्या ल्युमियर बंधूंनी दाखवल्या. असे अनेक छोटे छोटे चित्रपट तिकडच्या लोकांनी इकडे हॉटेलमधल्या छोट्या हॉलमध्ये, तंबूमध्ये, टुरिंग टॉकीजमध्ये दाखवायला सुरुवात केली.
आपल्याकडे हिंदुस्थानी लोकांनी विशेष म्हणजे मराठी माणसांनी याबाबतीत आघाडी घेऊन चित्रपटसृष्टीचा पाया रचला. चित्रपटांची लांबी कमी होती, पण प्रयत्न कसोशीनं झालेत. 1903 मध्ये सावेदादांनी अशाच छोट्या छोट्या घटनांवर चित्रपट बनवलेत. हिंदुस्थानी सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी अपार मेहनत घेऊन 3 मे 1913 रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट लोकांसमोर आणला, जो खर्या अर्थाने कथा-चित्र (फिचर फिल्म) होता आणि पौराणिक कथा होती. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या जीवनाची ही कथा. हाही चरित्रपटच. सर्व दृष्टींनी तो परिपूर्ण कथा-चित्रपट असल्यानं त्याला हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या ‘पहिल्या’ चित्रपटाचा मान मिळाला व दादासाहेबांना हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या जनकाचा मान मिळाला.
मग ही परंपरा सुरू झाली व मूळ धरू लागली. गंमत अशी की, मराठी बोलपटाची सुरुवातही प्रभात फिल्म कंपनीने त्याच विषयावर पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ काढून 1932 साली केली. म्हणजे मराठीतील पहिला बोलपट हासुद्धा चरित्रपटच होता. त्यानंतर दादासाहेबांनी अनेक चरित्रपट बनवले. ‘भस्मासूर मोहिनी’, ‘सावित्री सत्यवान’ (1914), Life of shriyal, ‘लंकादहन’, ‘श्रीकृष्ण जन्म’, ‘कालिया मर्दन’, ‘सती महानंदा’ हे सगळे पौराणिक कथांवर आधारित होते. दादासाहेब फाळके यांच्यापासून प्रेरणा घेऊन कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर या बंधूद्वयांनी 1918 साली कोल्हापूर फिल्म कंपनीची स्थापना केली आणि ‘सीता स्वयंवर’ हा चित्रपट काढला. 1919 साली ‘सौरंध्री’ हा हिंदुस्थानातील पहिला रंगीत चित्रपट काढला. त्यानंतर ‘वत्सलाहरण’, ‘भक्त दामाजी’ (1920), ‘सिंहगड’(1921), ‘कृष्णावतार’, ‘राणी पद्मिनी’, ‘सावित्री’, ‘महारथी कर्ण’, ‘नेताजी पालकर’, ‘कल्याण खजिना’ इ. चरित्रपट काढलेत.
याच सुमारास हिंदीमध्ये द्वारकानाथ नारायणदास संपत यांनी कोहिनूर फिल्म कंपनीतर्फे महात्मा गांधींना डोळ्यासमोर ठेवून ‘भक्त विदूर’ हा चरित्रपट 1920 च्या दरम्यान काढला होता. फाळके, संपत, पेंटर बंधू, वामन श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रपटांची निर्मिती पहिल्या दोन सालात केली. भोगीलाल, के. एम. दवे यांनीही या म्हणजे 1920 ते 1931 या काळात अनेक चरित्रपट काढले. ‘सती सरदर्वा हा त्यातलाच एक. 1925 मध्ये दवे यांनी शरदा फिल्म कंपनीतर्फे ‘बाजीराव – मस्तानी’ हा चरित्रपट काढला. या चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले होते. तसे अमराठी निर्माता-दिग्दर्शकांनीही अनेक चरित्रपट काढलेत. पण तो आपल्या लेखाचा विषय नाही. यानंतर ज्यांचं नाव येतं ते भालजी पेंढारकर यांचं. त्याआधी नानासाहेब सरपोतदार, पांडुरंग एस. तलगिरी, एस. एन. पाटणकर इ. नावांचाही सादर उल्लेख करावा लागेल.
भालजी चांगले लेखक होते. अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा त्यांनी त्या काळात लिहिल्या. त्यांनी पौराणिक – ऐतिहासिक कथांवर चित्रपट काढलेत. ‘स्वराज्य सीमेवर’ (1937) याची कथा, पटकथा, गीते भालजींची होती. यात छत्रपती शिवाजी महाराजांचं काम नटसम्राट नानासाहेब फाटकांनी केलं होतं. भालजींचा स्वतःचा, सबकुछ भालजी असा चित्रपट होता ‘नेताजी पालकर’ (1939). यात नेताजी पालकरची अप्रतिम भूमिका मा. विठ्ठल यांनी केली होती. ‘थोरातांची कमळा’ (41) यात कमळाची भूमिका सुमती गुप्ते यांनी केली होती. ‘बहिर्जी नाईक’ (43) यात बहिर्जीची भूमिका मा. विठ्ठलने केली होती. शिवाजी महाराजांचा शूर सरदार प्रतापराव गुजरवर ‘शिलंगणाचे सोने’ (49) हा चित्रपट होता. त्यात प्रतापरावाची भूमिका मा. विठ्ठलनेच केली होती. भालजींचा अत्यंत महत्त्वाकांक्षी, भव्य व श्रेष्ठ चित्रपट होता ‘छत्रपती शिवाजी’ (1952). यात शिवाजी चंद्रकांत झाला होता. चंद्रकांत व सूर्यकांत हे भालजींच्या व इतरांच्या अनेक चित्रपटांत आलटून पालटून छत्रपती शिवाजी महाराज झालेले दिसतात. 1958 साली त्यांनी ‘पावनखिंड’ केला. हा बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावरील चरित्रपटच होता. त्यात बाजीप्रभूंची भूमिका वसंतराव पहिलवान याने केली होती. 1956 साली ‘महाराणी येसूबाई’ हा चित्रपट त्यांनी काढला. त्यात संभाजीची भूमिका विश्वास कुंटे यांनी केली होती व येसूबाईची अप्रतिम भूमिका सुलोचनाबाईंनी केली होती.
‘प्रभात फिल्म कंपनी’ हा तर हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचा मानबिंदू मानायला हवा. अनेक चरित्रपटांबरोबर त्या कंपनीने सामाजिक चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली. 1929 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने ‘उदयकाल’ हा चरित्रपट काढला. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं काम व्ही. शांताराम यांनी केलं होतं. प्रभातने सुरुवातीला ‘गोपाळकृष्ण’, ‘चंद्रसेना’ हे मूकपटही काढले. तसेच ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत तुकाराम’, ‘धर्मात्मा’सारखे अत्यंत गाजलेत. चित्रनिर्मितीच्या सगळ्याच अंगाने परिपूर्ण व आगळेवेगळे चित्रपट काढलेत. शाहू मोडकांचा ‘ज्ञानेश्वर’, विष्णुपंत पागनिसांचा ‘तुकाराम’ म्हणजे चरित्र नायकांचा परमोच्च बिंदू होता. धर्मात्मामध्ये एकनाथ महाराजांच्या भूमिकेत महान गायक-नट बालगंधर्वांना भूमिका दिली होती. पण ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही. वास्तविक प्रभातच्या ‘तुकाराम’च्या आधी मूकपटाच्या काळात दोन तुकाराम येऊन गेले होते. पण प्रभातच्या तुकारामांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. ‘गोपाळकृष्ण’ या मूकपटानं ‘प्रभात’ची वैभवशाली वाटचाल सुरू झाली. या चरित्रपटांच्या टप्प्यातील महत्त्वाचा चरित्रपट होता ‘रामशास्त्री.’ हा ऐतिहासिक. गजानन जागिरदार यांची रामशास्त्रीची भूमिका अप्रतिम. तसाच प्रभातचा आणखी एक चरित्रपट होता ‘संत सखू.’ तोही प्रेक्षकांना अतिशय आवडला.
फार तपशिलात न जाता जरी आपण 75 ते 80 च्या काळात येईपर्यंत स्थुलमानाने जर चरित्रपटांचा आढावा घेतला तर ही काही नावं सहज आपल्याला आठवतील. अर्थात हिंदी, मराठी. ‘महारथी कर्ण’, ‘राजा विक्रमादित्य’, ‘दुष्यंत-शकुंतला’, व्ही. शांताराम यांचं ‘शाकुंतल’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ हे सहज आठवतील. ‘हीर रांझा’, ‘लैला मजनु’, ‘रझिया सुलतान’, ‘सीता’, ‘सीता स्वयंवर’, ‘हनुमान’, ‘बजरंग बली’, ‘भक्त ध्रुव’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘पृथ्वी वल्लभ’ इ. पौराणिक. ऐतिहासिक बघितले तर हे चरित्रपट पटकन डोळय़ांसमोर येतात ‘महाराणा प्रताप’, ‘झांसी की रानी’ (सोहराब मोदी), ‘चेतक’ (महाराणा प्रताप यांचा घोडा), ‘चंडिदास’ (सैगल), ‘भक्त सूरदास’ (सैगल), ‘चंद्रकांता’, ‘रानी चेन्नमा’, ‘भगतसिंग’, ‘चंद्रशेखर आझाद’, ‘शहीद’ (भगतसिंग, सुखदेव, राजगुरू), ‘गांधी’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट, चापेकर बंधूंवरील ‘1897’ असे अनेक चरित्रपट आढळतात. आचार्य अत्रे यांनी काढलेला व रौप्यपदक मिळवणारा ‘महात्मा फुले’, बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी काढलेला ‘वीर सावरकर’ ही अगदी अलीकडील उदाहरणं. के. आसिफ यांनी काढलेला ‘अकबर बादशाह’, ‘मुगल-ए-आजम’ अजरामर झाले. तसाच धार्मिक चित्रपट ‘जय संतोषी माँ’ हा तर लोकप्रियतेचा कळस गाठणारा चरित्रपट दृष्टिआड करता येणार नाही. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे चित्रपट काढत आहेत. तोदेखील गाजणार हे निश्चित आहे.
अर्थात मध्यंतरी चरित्रपटांची धारा बारीक झाली. सामाजिक व स्टंट चित्रपट अधिक दिसू लागले. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावती’ (पद्मावत) अशा काही हिंदी चित्रपटांवर आक्षेप घेतले गेले. एका विशिष्ट जनसमूहाने त्याबद्दल मोहीम उघडली. त्या काळी सोहराब मोदींनी ‘झांसी की रानी’ काढला आता पुन्हा ‘मणिकर्णिका’ येतो आहे. तो पण वादात सापडला आहे. आता एखाद्या जनसमूहाच्या, वर्गाच्या भावना कुठल्या कारणानं दुखावतील ते सांगता येत नाही. वास्तविक समाजात, हिंदुस्थानात, महाराष्ट्रात अशा अनेक दिग्गज व्यक्ती आहेत. त्यांच्यावर चांगले चरित्रपट निघू शकतील. अर्थात समाजानेही या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तो अधिक सकारात्मक असला पाहिजे. त्यात राजकारण वा कुठलीही अहंता, अस्मितेच्या नावाखाली आणता कामा नये आणि निर्मात्यांनीही अशा कथा निवडताना जनतेच्या श्रद्धांना, अस्मितेला कुठे धक्का पोहोचणार नाही हेही बघितले पाहिजे. इतिहासाची तोडमोड करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांपासून तो बाजीराव – मस्तानी, झाशीची राणीवर चित्रपट निघालेत. अनेक. पण अशा चळवळी, निदर्शने कधी झालेली ऐकिवात नाहीत. असो. चरित्रपटांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. हिंदी- मराठीत पुन्हा चरित्रपटांची लाट यावी हीच केवळ इच्छा.
(लेखक ज्येष्ठ समीक्षक आहेत.)




























































