फिजिओथेरपिस्ट व्हायचेय…

>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक

प्राचीन काळापासून अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर व्यायाम, मालीश, योगासने, इतर शारीरिक उपचार करून आपण अनेक व्याधींवर नियंत्रण मिळवले काही व्याधींना समूळ नष्ट केले. आधुनिक वैद्यकशास्त्रातदेखील फिजिओथेरपिस्टला विशेष महत्त्व आहे. आपल्या शरीराला मारक होऊ शकणाऱ्या औषधांशिवाय केवळ हालचाली आणि आसनांच्या मदतीने व्याधींचे मूळ शोधून त्याचे निराकरण प्रतिबंध करणे हे फिजिओथेरपीचे वेगळेपण आहे.

फिजिओथेरपी करणारे तज्ञ म्हणजे फिजिओथेरपिस्ट रुग्णाच्या शरीराच्या हालचालींतील बिघाड ओळखतात आणि प्रत्यक्ष रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या समन्वयाने आणि उपलब्ध आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने व शास्त्रीय पद्धतीने व्यायामाची जोड देऊन दुखण्यावर उपाययोजना करतात. काही वेळा या मार्गाने साध्या-सोप्या व्यायाम प्रकारांचा वापर करून पीडित व्यक्तीला शारीरिकदृष्टय़ा सक्षम आणि स्वावलंबी बनवले जाते. विशेषतः बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, अपघातातील दुखापती, हाडांमधील जुनी दुखणी बरी करण्यासाठी फिजिओथेरपिस्टची मदत घेतली जाते.

शैक्षणिक खर्चः बीपीटी हा चार वर्षांचा कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारणतः पाच लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. एमपीटीसाठीदेखील साधारणतः तेवढाच खर्च येतो.

 शिक्षण

बॅचलर ऑफ फिजिओथेरपी – (बीपीटी) / बी.एस्सी.  हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून त्यानंतर प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते. या पदवी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी जीवशास्त्र विषयासह बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बारावी परीक्षेतील एकूण टक्केवारी व प्रवेश परीक्षेतील (महाराष्ट्रासाठी नीट) कामगिरी लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो.

पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन फिजिओथेरपी – (एमपीटी) हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिओथेरपीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे अनिवार्य आहे. जनरल, मॅन्युअल थेरपी, बालरोग, न्यूरोलॉजिकल, स्पोर्टस्, ऑर्थोपेडिक, जेरियाट्रिक, मनोचिकित्सक आणि सायकोमोटर, ऑन्कोलॉजिकल, संधीवात, हृदय व रक्तवाहिन्या, प्रसूती व स्त्राrरोगशास्त्र इत्यादी यांपैकी एका स्वतंत्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. एम. डी. इन फिजिओथेरपी आणि पीएच. डी. इन फिजिओथेरपी असे कोर्सदेखील काही विद्यापीठांमधून उपलब्ध आहेत.

डिप्लोमा कोर्सेस इन फिजिओथेरपी – (डीपीटी) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी जीवशास्त्र विषयासह बारावी विज्ञान शाखेतून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

करीअर संधीः प्रत्यक्ष रोगावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या औषधोपचारांच्या जोडीने फिजिओथेरपीचे उपचार परिणामकारक ठरत असल्यामुळे खासगी, सरकारी रुग्णालये, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, अपंग पुनर्वसन पेंद्रे, रुग्णालयातील शस्त्रक्रियापश्चात रुग्ण पुनर्वसन, हेल्थ क्लब, ज्येष्ठ नागरिक सेवा पेंद्रे, शारीरिकदृष्टय़ा विकलांग व्यक्तींसाठीची पुनर्वसन पेंद्रे, प्राथमिक आरोग्य पेंद्रे, देशाच्या सुरक्षा यंत्रणेअंतर्गत उभारलेली आरोग्य पेंद्रे या ठिकाणी चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सध्या स्पोर्टस् फिजिओथेरपी या करीअर क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते. प्रत्येक खेळाच्या संघासोबत किमान एक तरी फिजिओथेरपिस्ट असतो. देशातील क्रीडा प्रकार आणि संघांची संख्या पाहता तज्ञ फिजिओथेरपिस्टची मागणी किती असेल याचा अंदाज येऊ शकेल. परदेशातही तज्ञ फिजिओथेरपिस्टची भरपूर मागणी असते. अनेक शहरांमध्ये फिजिओथेरपीचे स्वतंत्र आणि नावाजलेली रुग्णालये आहेत.