गंधकुपी – स्वर्णचाफा

>> प्रज्ञा पळसुले

काजव्यांच्या चमकत्या शेल्यात लपेटून स्वर्णालंकार झालेला आणि शतकानुशतके तमाम सुगंधप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला पिवळा चाफा अर्थात सोनचाफा.

सोनसकाळी सोनपावलांनी हळूचकन आपल्या उंबरठय़ावर पाऊल टाकावे आणि घरदार अंगण मोहित करून टाकावे, अगदी तसेच आपल्या आवडत्या पहाटेच्या वेळी सोनचाफा कळीतून बाहेर येत सूर्योदयासोबत डुलू लागतो.

सोनचाफा हे श्रीहरीचेदेखील अत्यंत आवडीचे फूल मानले जाते. त्यामुळे श्रीकृष्णाच्या चरणी सोनचाफा व तुळस हा नित्यक्रम पूर्वापार माझ्याही घरात चालत आलाय.

तसं तर चाफा म्हटलं की, विविध चाफ्याच्या जाती यात मोडल्या जातात, पण सोनचाफा मात्र  अखंड हिंदुस्थानातच स्वतःच्या सुगंधाने सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो.

हा चाफा सोनेरी पिवळ्या रंगात पाकळ्या उमलवून पानांच्या मध्ये हळुवारपणे दडलेला असल्याने  सूर्याची किरणे पडल्यावर सुरक्षित राहूनही खूप सुंदर दिसतो. ही या फुलांची अनोखी शैली आहे. म्हणूनच सोनचाफ्याचे फूल आपल्याला कधी कधी झाडांमध्ये शोधावे लागते.

 पण यामुळेच कदाचित या फुलास स्वर्णचाफाही म्हटले जाते. अतिप्राचीन काळापासून हा अप्रतिम चाफा सगळ्यांना भुरळ घालत आहे.  या फुलांपासून सुंदर प्रकारची सुगंधित अत्तरे बनवली जातात. शिवाय सोनचाफ्याचा अर्क विविध प्रकारच्या अरोमा थेरपीमध्येदेखील मनःशांती व मसाजसाठी वापरला जातो.

साधारणपणे एप्रिलपासून सोनचाफ्याचा बहर सुरू होतो ते अगदी दिवाळीपर्यंत चालू असतो.घरामध्ये व मंदिरातही अनेक विविध प्रकारच्या फुलांच्या ताटव्यामध्येही  सोनचाफा आपली वेगळी छाप पाडण्यात नेहमी यशस्वी होतो.

श्रावणात तर सोनचाफा  बरसत बरसत सगळीकडे आपली हजेरी लावून हा ऋतू पुरेपूर एन्जॉय करत असेल असं मला नेहमी वाटतं.म्हणजे बहुदा तोही बागेपासून देव्हाऱ्यापर्यंत व हारापासून ते गुलदस्त्यापर्यंतची सगळी सफर अनुभवता येत असावी.

मी मात्र गंधकुपीच्या साठवणीमध्ये सोनचाफा आठवणीने पेरून आता इथेच थांबते. नवीन सुगंधाच्या सफरीसाठी पुन्हा लवकरच भेटू.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या