
क्लाऊनिंग किंवा विदूषकगिरी हा रंगमंचीय फॉर्म आपल्याकडे तुलनेने तसा नवीन आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ‘क्लाऊनिंग’ ही संकल्पना अधिक व्यापक आहे. आपल्याकडे क्लाऊन म्हणजे सर्कशीतला जोकर किंवा फार तर संस्कृत नाटकात नायकाला मदत करणारी व्यक्ती एवढंच त्याचं अस्तित्व समजलं जातं. पण त्यापलीकडे जाऊन ‘क्लाऊनिंग’ जाणून घेण्यासाठी एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन कणकवलीत करण्यात आले आहे.
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांच्या ‘निलायम’तर्फे विदूषकगिरीची तीन दिवसांची निवासी कार्यशाळा 27 ते 29 डिसेंबर 2022 दरम्यान होणार आहे. ‘क्लाऊनिंगवाली बाई’ अशी ओळख असणाऱया अमृता मापुस्कर ही कार्यशाळा घेणार आहेत. मूळच्या हातखंबा रत्नागिरी येथील अमृता मापुस्कर या ‘जुली गोएल एक्सेन्ट्रिक वुमन’ शिष्यवृत्ती दोनदा मिळालेल्या हिंदुस्थानातील पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून थिएटरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, ग्रीसच्या डय़ुएन्डे स्कूलमधून फिजिकल थिएटरमध्ये डिप्लोमा केला आहे आणि सध्या त्या डान्स मूव्हमेंट थेरपी फॅसिलिटेटर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.
कार्यशोळत क्लाऊनिंगचा इतिहास, क्लाऊन, जोकर, कोर्ट जेश्चर या शब्दांच्या अर्थातील सूक्ष्म फरक, संस्कृत-मराठी नाटकांतील तसेच सर्कशीतील विदूषक याबद्दल माहिती दिली जाईल. विविध शारीरिक हालचाली, मनोकायिक खेळांच्या माध्यमातून क्लाऊनिंगच्या विविध पैलूंची ओळख करून दिली जाईल. कार्यशाळेचा मुख्य भर कलाकाराची विनोदाची कल्पनाशक्ती जागृत करणे आणि स्वतःबद्दलच्या संकल्पनांना छेद देण आहे. याशिवाय वैयक्तिक, समूह सादरीकरण, परस्पर संवाद, चर्चासत्रे याविषयाशी संबंधित लघु/माहितीपट या कार्यशालेत असतील. कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहितीसाठी संपर्क 9422054744.
विदूषक हा फक्त हसवणारा नसतो…
पाश्चिमात्य देशांमध्ये हा स्वतंत्र आर्ट फॉर्म म्हणून विकसित झालाय. आपल्याकडे तो फार कमी झालाय. विदूषक नुसतं हसवणारा नसतो. विदूषक प्रश्न विचारणारा आणि व्यवस्थेला हलवणारा असतो. तो विनोदाच्या अंगाने वास्तववादी पैलू मांडणारा असतो. क्लाऊनिंगचे हे स्पेक्ट्रम अपेक्षित आहे, असे अमृता मापुस्कर म्हणाल्या.
केवळ पाश्चिम देशांतील नव्हे तर आपल्याकडची विदूषकाची जी परंपरा आहे, तिला समजून घेऊन एकत्र कसं करता येईल, बतावणीमागचं लॉजिक काय, विदूषक कसे विचार करतात, यादृष्टीने कार्यशाळेत मार्गदर्शन होईल, असे मापुस्कर म्हणाल्या.
























































