यशाचा मुख्य सूत्रधार – कंपनी सेक्रेटरी

>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक

कामगार, कंपनीचे संचालक मंडळ आणि ग्राहक यांतील एकमात्र दुवा आणि कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीस  जबाबदार असणारा कंपनीचा सचिव हा कंपनीचा अविभाज्य घटक असतो.

सचिवाची कार्येः संचालक मंडळींना जमा-खर्चाचा तपशील देणे, वेळोवेळी मीटिंग्ज आयोजित करणे, कंपनी कायद्याचे पालन करणे, अचानक आलेल्या समस्यांची संचालक मंडळींना माहिती देणे, दैनंदिन कामकाज सुरळीत करणे, उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे अशी विविध कामे कंपनीचे सचिव करतात. कंपनीच्या सर्व कारभारावर आणि कामकाजावर सचिवाचे पूर्ण नियंत्रण असते.

प्रशिक्षण संस्थाः कंपनी सेक्रेटरी ऍक्ट 1980 अंतर्गत  ‘कंपनी सेक्रेटरी’चे प्रशिक्षण देणारी ‘द इंस्टीटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीस ऑफ इंडिया’ (आयसीएसआय) ही हिंदुस्थान सरकारच्या अखत्यारीत येणारी देशातील एकमेव मान्यताप्राप्त संस्था आहे. नोंदणी केलेले विद्यार्थी शुल्क भरून संस्थेच्या चाप्टर्स किंवा स्टडी सेंटर्समार्फत क्लासरूम टीचिंगचा लाभ घेऊ शकतात किंवा ते सेल्फ स्टडी करूनही हा कोर्स पूर्ण करू शकतात. स्टडी सेंटर्सबाबतची अधिक माहिती  ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीस ऑफ इंडिया’च्या  https://www.icsi.edu   या संकेतस्थळावर मिळेल.

अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कालावधीः ‘कंपनी सेक्रेटरी’ हा व्यावसायिक कोर्स प्रत्यक्ष प्रशिक्षणासह पूर्ण करण्यासाठी किमान पाच वर्षे लागतात. या कोर्सचे प्रमुख दोन भाग करता येतील. पहिला भाग सीएसईईटी (कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव एन्ट्रान्स टेस्ट ) ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘सीएस एग्झिक्युटिव  प्रोग्रॅम’ पूर्ण करावा लागतो.

दुसरा भाग ‘सीएस प्रोफेशनल प्रोग्रॅम’ असून ऍडव्हान्स कंपनी लॉ, ऑडिटिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिस्टम ऑडिट, नैतिक बाबी, अनुपालन, विमा कायदे, बँक कायदे, बौद्धिक मालमत्ता अधिकार, कामगारविषयक कायदे, कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय कायदे इत्यादी विषय अभ्यासायला असतात. एक किंवा दोन्ही भाग पूर्ण झाल्यावर 21 महिन्यांचे ट्रेनिंग कंपन्यांमध्ये जाऊन पूर्ण करावे लागते. विद्यापीठ अनुदान आयोग नियमानुसार सीएस हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीसम आहे.

पात्रताः कोणत्याही शाखेतून बारावी किंवा फाईन आर्ट्स वगळता इतर कोणतीही पदवी परीक्षा 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव एन्ट्रान्स टेस्ट देऊन ‘सीएस एग्झिक्युटिव प्रोग्रॅम’ला प्रवेश घेता येतो.

शैक्षणिक शुल्कः साधारणतः शिक्षण पूर्ण करण्यासाठी खर्च 66000 ते एक लाखपर्यंत येतो. कंपनी सेक्रेटरी हा डिस्टन्स कोर्स आहे. ज्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना क्लासरूम टीचिंगची आवश्यकता असते ते उपलब्ध चॅप्टर्समार्फत काही अतिरिक्त शुल्क भरून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

फायदेः कंपनी ऍक्ट 2013 अन्वये प्रत्येक नोंदणीकृत कंपनीला पूर्णवेळ सचिवाची नेमणूक करावी लागते. मोठय़ा कंपन्यांमध्ये एकापेक्षा जास्त सचिवांची गरज लागते. कंपनीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असल्याने सचिवास सर्वाधिक वेतन दिले जाते. निवास, प्रवास आणि इतर अनेक सुविधा दिल्या जातात. या क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींना भरपूर मागणी आहे आणि भविष्यातही असेल.