
समाधानी दादांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मला कॉर्नचे पदार्थ खूप आवडतात. ते ऐकून महापालिकेसाठी इच्छुक मंडळींनी कॉर्नच्या गाडय़ा लावण्याचा नि दुकानं थाटण्याचा सपाटाच लावला होता. कॉर्नचे वेगवेगळे पदार्थ तयार करून कोथरूडकरांच्या गळ्यात मारून त्यांना जबरदस्तीनं कॉर्नप्रेमी करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला होता… एक हलकंफुलकं विनोदी प्रहसन.
परवा कोथरूडमध्ये असताना अचानकपणे लक्षात आलं की, रस्त्यावर जागोजागी कॉर्नचे (म्हणजे मक्याचे हो…) पदार्थ विकणाऱ्या गाडय़ांच्या संख्येत अचानकपणे वाढ झालीय. जागोजागी फक्त कॉर्न, कॉर्न आणि कॉर्न इतकंच पाहायला मिळत होतं. मक्याचे असंख्य वैविध्यपूर्ण नि हटके पदार्थ विकणाऱ्या गाडय़ा इतक्या मोठय़ा प्रमाणात का लागल्या आहेत, काही कळेना. काही ठिकाणी ‘कॉर्न ओके प्लीज…’, ‘कॉर्न प्लीज…’, ‘कॉर्न हब…’ आणि अशा नावांनी अनेक दुकानं नव्यानं थाटलेली पाहायला मिळत होती.
बरं, इतक्या गाडय़ा आणि दुकानं असूनही प्रत्येक गाडीवर तुफान गर्दी… जो तो ‘कॉर्न प्लीज, कॉर्न प्लीज’ म्हणत होता. च्या मारी… कोथरूडमध्ये आहोत की कॉर्नरूडमध्ये आहोत, हेच कळेनासं झालं होतं. प्रत्येक ठिकाणी कॉर्नपासून बनलेले पन्नास पदार्थ. कॉर्न पॅटिस, कॉर्न कटलेट्स, स्वीट कॉर्न सूप, कॉर्न व्हेज क्लिअर सूप, कॉर्न वडापाव, कॉर्न इडली, कॉर्न डोसा, कॉर्न भेळ, कॉर्न पिझ्झा, कॉर्न सँडविच, कॉर्न मिसळ, कांदा, कॉर्न आणि भाकरी वगैरे…
एका ठिकाणी तर आमच्याकडे कॉर्नपासून बनविलेला अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मिळेल अशी पाटी पाहिली. कॉर्नचा आणि तांबडय़ा पांढऱ्याचा काय संबंध हे विचारायलाच पाहिजे, असं म्हणून थेट दुकानातच एन्ट्री मारली. पाहतो तर दुकानात वंदनीय दादांचा फोटो ठेवलेला! दादा म्हणजे इथले मूळचे नाही, तर नुकतेच पुराबरोबर वाहून आलेले स्थलांतरित समाधानी दादा. त्यांचा फोटो पाहून आधी वाटलं समाधानी दादांनी जोडधंदा म्हणून हॉटेल सुरू केलं की काय?
मालकाला पहिला प्रश्न विचारला, काय समाधानी दादांचं हॉटेल का? आणि दुसरा प्रश्न, मका आणि तांबडा-पांढरा यांचा काय संबंध? दुकानदार पण चतूर होता. शेवटी दादांच्याच पक्षाचा तो! बोलण्यात आणि फेकण्यात कोणाला ऐकणार तो… त्यानं ‘कॉर्न की बात’ सुरू केली. ‘अहो, प्रातःस्मरणीय दादा आमचे नेते. त्यांना मका आवडतो. म्हणजे मक्याचे पदार्थ आवडतात. खूप म्हणजे खूप आवडतात, असं मध्यंतरी मी एका मुलाखतीत ऐकलं. म्हणून आम्ही हे मक्याचे पदार्थ सर्व्ह करणारं हॉटेल सुरू केलंय. ‘कॉर्न ओक्के प्लीज…’ आमच्या दादांचं मूळ गाव कोल्हापूर (म्हणजे तसे ते खरे मुंबईचेच, पण ‘मी कोल्हापूरचा कोल्हापूरचा’ म्हणून कायम सांगत असतात…). त्यामुळं आम्ही मक्यापासून तयार होणारा तांबडा पांढरा रस्सा पण सर्व्ह करतो. सोबत कॉर्नची भाकरी. कॉर्न मिसळ हीदेखील आपली स्पेशालिटी बरं का भाऊ, असं सांगून कार्यकर्त्यानं ‘कॉर्न की बात’ला एकदाचा ब्रेक लावला.
मग माझ्या लक्षात आलं की, समाधानी दादांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मला कॉर्नचे पदार्थ खूप आवडतात. ते ऐकून महापालिकेसाठी इच्छुक मंडळींनी कॉर्नच्या गाडय़ा लावण्याचा नि दुकानं थाटण्याचा सपाटाच लावला होता. कॉर्नचे वेगवेगळे पदार्थ तयार करून कोथरूडकरांच्या गळ्यात मारून त्यांना जबरदस्तीनं कॉर्नप्रेमी करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला होता. बरं, एकानं ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम घेतला की, दुसऱयानंही घेतला. एखाद्यानं ‘पैठणीचा खेळ’ घेतला की, लागली लाईन ‘पैठणीचा खेळ’ घेणाऱयांची. कोणी ‘दिवाळी फराळ’चा कार्यक्रम आयोजित केला की, गल्लीबोळातील नेते लागले अजीर्ण होईपर्यंत ‘दिवाळी फराळ’ आयोजित करायला. कॉर्नच्या दुकानांचं तसं झालं.
कॉपी करण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार कोणीतरी पुडी सोडली की, जो कोणी कॉर्नची गाडी टाकेल किंवा दुकान थाटेल आणि मक्याचे जास्तीत जास्त पदार्थ खपवेल, त्याला महापालिकेत तिकीट हमखास मिळणार वगैरे. मग काय, जो उठतोय तो कॉर्नची गाडी टाकायला लागला. याच अहमहमिकेतून कॉर्नची मिसळ, कॉर्न दूध कोल्ड्रिंक नि कॉर्नचा तांबडा पांढरा वगैरे पदार्थ करून साहेबावर ‘लाईन मारण्याचे’ प्रकार सुरू झाले. जे सच्चे कार्यकर्ते होते, त्यांनी किमान प्रामाणिपणे गाडय़ा टाकल्या आणि दुकानं तरी थाटली, पण जे फक्त मिरवणारे नेते होते, त्यांनी फक्त दुकानांमध्ये नि गाडय़ांवर जाऊन मक्याच्या पदार्थांवर आडवा हात मारायला सुरुवात केली (अर्थातच, फुकटात!). आपल्यालाही लहानपणापासून किती मका आवडतो वगैरे कथा फेकायला सुरुवात केली.
2014 नंतर जशी स्वयंसेवकांच्या संख्येत अचानक वाढ झाली आणि नकली स्वयंसेवक वाढले, तसं वंदनीय समाधानी दादांच्या मुलाखतीनंतर पुण्यामध्ये कॉर्नप्रेमींच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली. कॉर्ननी इतका हलकल्लोळ माजविला की, कॉर्नचं पहिलं पीक अमेरिकेत नाही, तर पुण्यात आलं आहे असंच वाटायला लागलं.
एव्हाना प्रत्येकानं आपापल्या एरियामध्ये कॉर्नचे पदार्थ घरोघरी मोफत वितरण करण्याची व्यवस्था केली होती. अगदी पन्नाप्रमुख वगैरे तयार झाले होते. बूथची रचना झाली होती. प्रत्येक चौकात ‘फ्री कॉर्न फ्री कॉर्न’ असे बोर्ड लावलेले स्टॉल्स थाटण्यात आले होते. बूथवर येणाऱ्यांना फ्री डिश सर्व्ह होत होती. कॉर्न डिशेस घरोघरी पोहोचविताना सवयीनुसार मधल्यामध्ये दहा टक्के हात न मारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
हा सगळा गोंधळ सुरू असताना चेअरमननी विकता न आलेल्या AMINITY SPACE च्या जागेत कॉर्नची शेती करता येऊ शकते का, मक्या हे टोपणनाव असलेल्या व्यक्तींना मिळकत करात वीस टक्के सूट देता येईल का, याचा विचार सुरू केला होता. कॉर्नच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांनादेखील सवलतीचा लाभ कसा मिळू शकेल, याबाबत चर्चा सुरू झाली. गटनेत्यानं नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीकाठी कॉर्नची शेती करावी, सध्या पीएमपीएमएलच्या बसमध्ये आणि भविष्यात कॉर्न भेळ किंवा पॉपकॉर्न मोफत द्यावी असा प्रस्ताव ठेवला. ‘पुणे फॉर स्वीट कॉर्न सूप’ आणि ‘पुणे फॉर कॉर्न कटलेट’ अशी दोन स्वतंत्र फेसबुक पेजेसही सुरू झाली. पुण्यात जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमध्ये कॉर्नची शेती करावी अशी गमतीदार सूचना एका कार्यकर्त्यानं केली, पण त्या सच्च्या कार्यकर्त्याचं तोंड तातडीनं बंद करण्यात आलं.
कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सर्वच जण वंदनीय समाधानी दादांवर इम्प्रेशन मारण्यासाठी प्रयत्न करीत होते, धडपडत होते. आपल्याप्रमाणेच आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना नि पुणेकरांना कॉर्नचे पदार्थ खूप आवडतात हे पाहून ऐकून दादांना भरूनच आलं. खूप समाधानी वाटत होतं. पुणेकर आपल्या या कॉर्न स्कीम्सवर आणि कामांवर जाम खूश आहेत असं रिपोर्टिंग दादांना होत होतं. त्यामुळंही दादा एकदम समाधानी होते. कोल्हापूरप्रमाणे आता पुणंही आपण अगदी सहजपणे आणि एकहाती जिंकू असा कॉर्न, सॉरी ठाम विश्वास त्यांना वाटत होता…
रात्री झोपण्यापूर्वी दादांनी आज एकऐवजी दोन बाऊल स्वीटकॉर्न सूप प्यायलं आणि मोठय़ा समाधानी मनानं ते झोपी गेले…





























































