खबरदारी, जबाबदारी आपलीच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

मागील दहा महिने आपण कोरोना या महामारी संकटाशी झुंज देत आहोत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व लॉक डाऊनमधील नियम पाळले म्हणून आपण काही अंशी या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो, परंतु त्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करून आपण हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठी सेवासुविधा सुरू केल्या, पण काही अपवादात्मक वगळता बहुतांशी सार्वजनिक कार्यक्रम, वाढदिवस, लग्नसोहळे या ठिकाणी सुरक्षित शारीरिक अंतर, तोंडावर मुखपट्टी याचा बोजवारा उडालेला आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. पुन्हा लॉक डाऊन नको म्हणून राज्य शासनानेसुद्धा आवाहन केले असून अजून हे संकट पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाही. यांचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करून स्वतःबरोबर दुसऱयाचीसुद्धा काळजी घ्यावयाची आहे. राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना राबवत असून परिस्थिती नियंत्रणात आली म्हणून मागील महिन्यापासून  लसीकरण मोहिमासुद्धा सुरू झाल्या आहेत, पण आपण निष्काळजी व बेपर्वाईने वागत असल्यामुळे मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बहुचर्चित…बहुप्रतीक्षित…मुंबई लोकल रेल्वेसेवा तसेच पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय झाला आणि तमाम नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. दोन्ही बाजूचा विचार करता व केवळ राजकारण न करता राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय खरोखरीच स्वागतार्ह आहे. आज इतर देश व राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि त्यातून मुंबई म्हणजे सेकंदावर धावणारे शहर. लोकल रेल्वे ही तर मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. रोज लाखो प्रवाशांची ने-आण करणारी लोकल रेल्वेबरोबर मुंबईकरांचे एक वेगळेच नाते आहे. या सेवेतून ये-जा करणारी प्रवासी संख्या मागील काही महिन्यांतील रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विचारपूर्वक संयमाने घेतलेला निर्णय हा नक्कीच कौतुकास्पद आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येते हे पाहूनच जरी हे वेळापत्रक सर्वांना उपयुक्त नसले तरी त्यामागची भावना, भूमिका ही पुढचा विचार करूनच घेतली आहे. टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व व्यवस्था सुरू करूनच आपल्याला या रोगावर नियंत्रण आणता येईल. चित्रपटगृहेसुद्धा जरी पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी आपण आपली जबाबदारी घेतली पाहिजे. राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या सर्वात जास्त होती तसेच मृत्युदर जास्त होता.  योग्य ती काळजी, जबाबदारी घेऊनच आपण पुढे जात आहोत. धावणारी मुंबई मागील आठ/दहा महिने ठप्प झाली आहे. त्यामुळे त्याचा सर्व स्तरांवर सर्व क्षेत्रावर विपरीत परीणाम झाला आहे. ही विस्कटलेली घडी, आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी काही कालावधीनंतर नक्कीच धाडसी निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी राजकारण न करता समन्वय व सहकार्याच्या भूमिकेतून सर्वांनी आपले कर्तव्य बजावायचे आहे. आता सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, तर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, सुरक्षित शारीरिक अंतर, तोंडावर कायम मुखपट्टी, शारीरिक स्वच्छता या सरळ आणि साध्या नियमांचे पालन करूनच. आपण या रोगावर यशस्वी मात करावयाची असेल तर आगामी काळातसुद्धा योग्य ती जबाबदारी आणि खबरदारी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.