
>> विजय पांढरीपांडे
डॉ. कलामसारख्या ज्येष्ठ संशोधक तंत्रज्ञांनी 2020 वर्षासाठी व्हिजन मिशनचे संकल्प केले होते. तो जुना अध्याय आता बदललेल्या परिस्थितीत नव्या अंक, शब्दलिपीत आपल्याला लिहावा लागणार आहे. बऱयाच जुन्या गोष्टी, चालीरीती सोडाव्या लागतील. नव्या संकल्पना, नव्या पद्धती आत्मसात कराव्या लागतील. शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, पर्यावरण, ऊर्जा सर्व क्षेत्रांसाठी नवे पर्याय,नव्या संकल्पना, निवडाव्या लागतील. सरते वर्ष कोरोनाचे होते. आगामी वर्ष कोरोनाच्या लसीचे असणार आहे.
एकदाचे सरले हे वर्ष. गेल्या कित्येक दशकांत नव्हे, शतकात एखाद्या वर्षाच्या नशिबी असे दुर्दैव आले नसेल. हे वर्ष संपताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे, संपले एकदाचे हे 2020 वर्ष. पण वर्ष संपले म्हणून त्या वर्षाने जन्माला घातलेल्या समस्या संपलेल्या नाहीत. या समस्यांनी निर्माण केलेले मृत्यूचे भय, भविष्याची चिंता, एकूणच जगण्याविषयीची काळजी, काहीच संपले नाही सध्यातरी.
गेल्या वर्षी एका अभूतपूर्व अशा विषाणू प्रादुर्भावातून उद्भवलेल्या संकटांचा सामना सगळे जग करते आहे. कुणीही यातून सुटले नाही. प्रमाण थोडेबहुत कमीजास्त असेल इथेतिथे, पण मूलभूत प्रश्न तेच. प्रश्नही असे की ज्यांची उत्तरे कुणालाच माहिती नाहीत. जे चालले आहे ते अंदाजावर आधारित निरीक्षण, विवेचन. एक तर्प दुसऱया अनुमानाशी जुळणारा नाही. कोणताही निर्णय सर्वसमावेशक नाही.
गेली अनेक वर्षे या ना त्या कारणाने आपण निसर्गाची मोडतोड केली. सत्ता, पैसा, उन्माद, द्वेष अशा अनेक विकृतींनी ग्रासलेल्या समाजाने ईश्वरनिर्मित नैसर्गिक वातावरणातले मूल संतुलन बिघडवून टाकले.जमिनीतील पाण्याचे शोषण, हवेतील प्रदूषण, जंगलातली वृक्षतोड, एकूणच निसर्ग चक्राच्या गतीशी राक्षसी खेळ खेळून आपण जगनियंत्यालाच आव्हान दिले.त्या वरच्या बापानेदेखील वाट पाहिली. ही मानवजात आज सुधारेल, उद्या सुधारेल या आशेवर त्याने स्वतःवरच नियंत्रण ठेवले. पण आपण कसलेच नियंत्रण, नीतिनियम मानत नाही म्हटल्यावर शेवटी त्यानेही दणका द्यायचे ठरवले. आपल्याला झोपेतून जागे करायचे ठरवले. आपल्या अनिर्बंध स्वैराचाराला ब्रेक लावायचे ठरवले. त्यासाठी त्याने कोरोनाला निवडले. एक सूक्ष्म जीवाणू जो कुठून आला, कुठे गेला काहीच कुणाला कळले नाही. कळणारही नाही. विज्ञान तंत्रज्ञानवाले संशोधन करताहेत. करू देत. पण सध्या तरी कुठेही कसलेही यशस्वी म्हणता येईल असे नियंत्रण, नियोजन नाही. सर्व जगाला संभ्रमात टाकून स्वतः मात्र हा विषाणू निश्चिंत आहे. त्याने आपला कार्यभाग साधला आहे. काय होता या विषाणूचा कार्यभाग? काय शिकवायचे होते त्या वरच्या नियंत्याला या दूताच्या माध्यमातून? काय शिकविले या मावळत्या कोरोना वर्षाने आपल्या सर्वांना? हे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत.
आपण या कोरोना वर्षात जे काही घडले त्यापासून काही धडा घेणार की नाही? स्वतःच्या खाव खाव, हावरट मनोवृत्तीत बदल करणार की नाही? आपण निसर्गाकडे जिव्हाळ्याने बघणार की नाही? आपण पर्यावरणाचा, ऊर्जा संवर्धनाचा, नैसर्गिक संतुलनाचा आता तरी गांभीर्याने विचार करणार की नाही? हे प्रश्न सरते कोरोना वर्ष आपणा सर्वानाच विचारते आहे. या प्रश्नांची उत्तरे पुढील काही वर्षांत तत्परतेने, गांभीर्याने द्यावी लागतील. फक्त विचाराने नव्हे तर आचाराने, कृतीने द्यावी लागतील.
मानव जातीने यापूर्वी अनेक भीषण संकटांचा, आपत्तींचा सामना केला आहे. महायुद्धाचे नरसंहार पाहिले, अणुबॉम्ब विस्पह्टाने शहरे, लाखो माणसे राख झालेली पाहिली. महामारीच्या प्रादुर्भावाने, दहशतवादी हल्ल्याने, नैसर्गिक प्रकोपाने झालेले मृत्यूंचे तांडव, मालमत्तेचे नुकसान अन् त्यानंतर आलेले सामाजिक, आर्थिक अपंगत्व आपण अनुभवले आहे पण तरीही आपण त्यापासून काही शिकलो असे दिसत नाही. चंगळवाद थांबला नाही. सत्तासंघर्ष कमी झाले नाहीत. वंशवाद, जातीधर्माचे वाद संपलेले नाहीत. वर चढायचे तर दुसऱयाचे पाय खेचलेच पाहिजेत, त्याच्या खांद्यावर चढून त्याला पाडलेच पाहिजे ही आपली मनोवृत्ती. स्वतःचे राज्य, आपला देश, आपले घर, आपली माणसे यापेक्षा आपला स्वार्थ महत्त्वाचा मानला. त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी केली,अशा विकृत अविचारी पायावर आपला डोलारा उभा आहे.
आपण कितीही पैसा कमाविला, कितीही पदव्या मिळवल्या, कितीही घर भरले तरी एक वेळ अशीही येते की हे सारे वैभव, ही श्रीमंती, ही बुद्धिमत्ता सारेच निरर्थक ठरते. जसे या सरत्या वर्षात ठरले आहे. शिक्षण, दळणवळण, संवाद, भेटीगाठी, नातीगोती, सगळीच देवघेव ठप्प पडली होती गेले कित्येक महिने. आठवडय़ाचा बसचा, रेल्वेचा, बँकेचा संप झाला तर आपण बेचैन होतो. आकाशपाताळ एक करतो. आपण नको तितक्या नको त्या शिव्या मोजतो त्या संप करणाऱयांच्या नावाने. आता मात्र सर्वांची बोलती बंद. एरवी या ना त्या कारणाने सरकारवर तोंडसुख घेणारे आपण या वर्षी मूग गिळून चूप बसलो. कारण कशाचा काहीही उपयोग नाही हे या सरत्या वर्षाने आपल्याला निक्षून सांगितले.
महिनोंमहिने ऑफिसमध्ये, कामावर न जाणे, शाळा काॅलेज बंद, त्यामुळे अभ्यास, परीक्षेची कटकट नाही. शॉपिंग, बाहेरचे खाणे, हिंडणे फिरणे, पिक्चर, पिकनिक, सारे बंद. व्यवसाय, व्यापार, तेजीमंदी साराच पांगुळगाडा. ज्यांचे दोनवेळचे जेवणदेखील रोजच्या मोलमजुरीवर अवलंबून त्या कामगारांची उपासमार, त्यात कुठे दुष्काळ, कुठे अतिवृष्टी यामुळे शेतकऱयांवर आलेली अवकळा सारेच चिंताजनक. सर्दी खोकल्यानंतर, दातदुखी, सांधेदुखी उठल्यासुटल्या डॉक्टरकडे धाव घेणाऱयांना त्याशिवायही आपण जगू शकतो हा झालेला नवा साक्षात्कार, जवळचे कुणी गेले तरी आता ना भेट ना सांत्वन, अशा कोरडेपणाची झालेली सवय ही या सरत्या वर्षाचीच भेट.
या वर्षाने अनेक व्याख्याही बदलल्या. व्यवहाराच्या, आदानप्रदानाच्या, शिक्षणाच्या एकूणच कार्यपद्धतीच्या संकल्पना बदलल्या. एक विचार सहज मनात येतो. इंटरनेट नसते, मोबाईल, स्मार्ट पह्न, लॅपटॉप नसते तर ऑफिसचे, मल्टी नॅशनल कंपन्यांचे,सरकारी कामकाजाचे, शिक्षणाचे, संपर्क व्यवस्थेचे काय झाले असते? सगळे ठप्प पडले असते. मध्यंतरी काही निवडक नोबेल विजेत्यांनी म्हणे वाद घातला होता, गेल्या शतकांतील सर्व जगावर दूरगामी परिणाम करणारे, जग बदलणारे संशोधन कोणते? याही प्रश्नाचे उत्तर कोरोना वर्षानेच दिले. कोरोना वर्षाने आपल्याला आरोग्यविषयक जागरुक केले. चांगल्या सवयी लावल्या. मास्क, सारखे हात धुणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे हे गरजेचे झाले. यापूर्वी आपण फार निष्काळजी होतो या बाबतीत.
डॉ. कलामसारख्या ज्येष्ठ संशोधक तंत्रज्ञांनी 2020 वर्षासाठी व्हिजन मिशनचे संकल्प केले होते. तो जुना अध्याय आता बदललेल्या परिस्थितीत नव्या अंक, शब्दलिपीत आपल्याला लिहावा लागणार आहे. बऱयाच जुन्या गोष्टी, चालीरीती सोडाव्या लागतील. नव्या संकल्पना, नव्या पद्धती आत्मसात कराव्या लागतील. शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, पर्यावरण, ऊर्जा सर्व क्षेत्रांसाठी नवे पर्याय,नव्या संकल्पना, निवडाव्या लागतील. सरते वर्ष कोरोनाचे होते. आगामी वर्ष कोरोनाच्या लसीचे असणार आहे.




























































