
>> विजय पांढरीपांडे
शेतकी विज्ञान किंवा पर्यावरण शास्त्र न शिकलेल्या शेतकऱ्याला शेतीचे, हवामानाचे ज्ञान जास्त असते. घरची वडीलधारी माणसे घरचे तंटे-विवाद निष्णात वकिलापेक्षा जास्त हुशारीने, कमी वेळात सोडवू शकतील. नवरा-बायकोचे मतभेद ती दोघेच शांतपणे बसून, विचार करून सोडवू शकतात. त्यांना बाहेरच्या मध्यस्थीची गरज नाही. कुठल्याही डॉक्टरेटची तर नाहीच नाही. परंतु तसे शहाणपण अनेकांना शेवटपर्यंत सुचत नाही आणि त्यातून तेच ते घडत राहते. येरे माझ्या मागल्या सुरूच राहते. खरेच आपण सुशिक्षित आहोत का? हा प्रश्नही त्यामुळे अनुत्तरितच राहतो.
अनेक जण स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेत असतात, परंतु आपण खरंच सुशिक्षित आहोत का? हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारायला हवा. सुशिक्षित म्हणजे नेमके काय, हे आधी समजून घ्यायला हवे. फक्त शालेय शिक्षण झालेल्या व्यक्तीपेक्षा विद्यापीठाच्या एक-दोन पदव्या घेतलेली व्यक्ती अधिक सुशिक्षित समजायची का? प्रथम श्रेणीतले विद्यार्थी द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांपेक्षा जास्त हुशार समजायचे का? असे काही नसते हे आपल्याला अनुभवाने माहिती आहे.
आपले, समाजाचे, भलेबुरे कशात आहे याची जाण आपल्याला आहे का? आपल्याला कशाने आनंद मिळतो, काय केल्याने समाधान मिळते, हा सारासार विचार आपल्याला करता येतो का? हा विवेक आपल्यात आहे का? असे अनेक प्रश्न सर्वत्र दिसतात आणि त्यांची उत्तरे नकारार्थी येतात.
आपण एकीकडे भ्रष्टाचारावर टीका करतो. असे काही करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना नावे ठेवतो, पण या व्यवहारात कुठे ना कुठे, कधी ना कधी आपलाही हातभार असतोच. मुलांना प्रवेशासाठी द्यावी लागणारी फी, डोनेशन हा सरळ मार्ग नाही. नोकरीसाठी, बढतीसाठी शिफारसीचे प्रयत्न याला भ्रष्टाचाराशिवाय दुसरे गोंडस नाव नाही. एखाद्या गोष्टीला विलंब लागत असेल अन् आपल्याला पटकन रीझल्ट हवा असेल तर उघडपणे मोजला जाणारा जास्तीचा दाम हा भ्रष्टाचार आहे. अगदी देवाच्या दर्शनाला ज्यादा पैसे मोजून वेगळय़ा रांगेतून पटकन दर्शन घेणे हाही वाम मार्गच आहे. शिक्षण हे सारे शिकवते का? मुळीच नाही. मग आपण सुशिक्षित कसे?
आजकाल आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या लाखो करोडोच्या सुरस कथा वाचतो. चार-पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती पटीने वाढली, किती कोटींची वृद्धी झाली हेही बघतो, पण अशाच व्यक्तींना पुनः पुन्हा निवडूनही देतो? हे शहाणपणाचे, सुशिक्षिताचे लक्षण आहे का? भ्रष्ट, कपटी, कारस्थानी, गुंड प्रवृत्तीच्या पुढाऱ्यामागे जास्त गर्दी असते लोकांची. ही मंडळी दिलेली आश्वासने पूर्ण करणार नाहीत, आपलीच खळगी भरण्यासाठी वाट्टेल ते उद्योग करतील हे माहिती असूनही अनेक तरुण, तरुणी, मोठी मंडळी त्यांच्या मागे धावतात. त्यांचे पोवाडे गातात. याला सुशिक्षित माणसाचा शहाणपणा म्हणायचे का? खरे तर जागरूक मतदार या नात्याने कुणाला संसदेत, विधानसभेत पाठवायचे हे अधिकार संविधानाने आपल्याला दिले आहेत. किती जण याचा योग्य वापर करतात?
घरात लहान-मोठय़ा कारणाने भांडणारेदेखील सुशिक्षित असतात. आधी प्रेम करून लग्न केलेले, दोन मुलांचे आई-बाप जेव्हा जोरजोरात भांडतात, अगदी घटस्पह्टाचा टोकाचा निर्णय घेतात, आपल्याच पोटच्या पोरांवर अन्याय करतात, फक्त आपलाच स्वार्थी विचार करतात, तेव्हा तेही आपण दोन-तीन पदव्या घेतल्या हे विसरतात. आपले शिक्षणच नव्हे तर सो कॉल्ड संस्कार, नीती, धर्म, कर्तव्य, सारे सारे विसरतात.
बुवाबाजी, अंधश्रद्धा या नादी लागलेले धर्मांध अशिक्षित नसतात. आपण जे काही करतो ते विवेकाच्या कसोटीवर उतरणारे नाही हे माहिती असूनही अनेक मंडळी त्याच चुका करतात. एकीकडे विज्ञान- तंत्रज्ञान शिकायचे अन् दुसरीकडे बुवा-महाराजांच्या नादी लागायचे ही समाजाची विकृती हास्यास्पद वाटते, पण हे सर्रास चालते. त्यांना नावे ठेवणारे मूर्ख ठरतात. नास्तिक म्हणून हिणवले जातात. शाळा-कॉलेजात हे थोडीच शिकवतात? मग शिक्षणाच्या, ज्ञानाच्या विरोधात छेद देणारे हे अविचार येतात कुठून? परस्परातील दुजाभाव, द्वेष, तिरस्कार निपजतो, अंकुरतो कुठून?
आपल्याला प्रगत व्हायचे आहे. जागतिक स्पर्धेत उतरायचे आहे. विश्वगुरू व्हायचे आहे, पण आपली कुणाशी स्पर्धा आहे तर, आपापसात युद्ध करणाऱ्या देशांशी! जिथे हिंसाचार आहे, नशा-दारूच्या विळख्यात बेधुंद झालेली तरुण पिढी आहे, जिथे मानसिक अशांती आहे, तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन पस्तावलेल्या अंधार कोठडीकडे वाटचाल करणाऱ्या देशांशी आपल्याला स्पर्धा करायची आहे? विश्वगुरू होऊन कुणाला शिकवायचे आहे? ज्यांच्या हातात बंदुका आहेत, बॉम्ब आहेत, जे स्वतःच अस्वस्थ, अशांत, भरकटलेले आहेत, युद्धात होरपळलेले आहेत, जे कुणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना विश्वगुरू होऊन शिकवायचे आहे? जे अशक्य आहे त्याच्या नादी लागून जे शक्य आहे त्याकडे पाठ फिरवणे याला शहाणपण म्हणत नाहीत. हे सुशिक्षिताचे लक्षण नव्हे.
सुरुवात स्वतःपासून, आपल्या घरापासूनच करायची असते. आधी आपणच नेमके शिक्षण म्हणजे काय, ज्ञान म्हणजे नक्की काय, पदवीचा नेमका उपयोग काय, बुद्धीचा वापर कसा करायचा, विवेकाचा वापर कसा करायचा? हे सारे शिकायला हवे. आपले विचार, आचार, आपले वागणे आधी चांगले हवे. प्रत्येक अॅक्शन किंवा रिअॅक्शन दिलीच पाहिजे असे नाही. अरेला तुरे केलेच पाहिजे असे नाही. आर्ट ऑफ लिसनिंग महत्त्वाचे आहेत. पेशन्स महत्त्वाचे आहेत. सर्वांगाने विचार करणे, मागचा पुढचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यातही पुढचा, भविष्याचा विचार जास्त महत्त्वाचा. आपल्यापेक्षा आपल्यावर अवलंबून असणाऱ्याचा विचार जास्त महत्त्वाचा. संकुचित वृत्ती नको. विश्वची माझे घर वगैरे न झेपणारी लांब उडीदेखील नको. आपली क्षमता, आपली झेप आपणच ठरवायची.
शेतकी विज्ञान किंवा पर्यावरण शास्त्र न शिकलेल्या शेतकऱ्याला शेतीचे, हवामानाचे ज्ञान जास्त असते. घरची वडीलधारी माणसे घरचे तंटे-विवाद निष्णात वकिलापेक्षा जास्त हुशारीने, कमी वेळात सोडवू शकतील. नवरा-बायकोचे मतभेद ती दोघेच शांतपणे बसून, विचार करून सोडवू शकतात. त्यांना बाहेरच्या मध्यस्थीची गरज नाही. कुठल्याही डॉक्टरेटची तर नाहीच नाही. परंतु तसे शहाणपण अनेकांना शेवटपर्यंत सुचत नाही आणि त्यातून तेच ते घडत राहते. येरे माझ्या मागल्या सुरूच राहते. खरेच आपण सुशिक्षित आहोत का? हा प्रश्नही त्यामुळे अनुत्तरितच राहतो.
























































