आगळं वेगळं- पाचवा महासागर

>>मंगल गोगटे

एक महत्त्वाचा निर्णय 8 जून 2021रोजी जागतिक महासागर दिनी झाला. या दिवशी नॅशनल जिओग्राफीक सोसायटीला पाचवा महासागर लोकाग्रहामुळे अधिकृतपणे मानायला लागला. शेवटी पृथ्वीला तिचा पाचवा महासागर सापडला. त्यामुळे अंटार्टिका हा पाचवा महासागर आधीच्या चार (प्रशांत, ऍटलांटिक, हिंद, आर्क्टिक) महासागरांच्या यादीत समाविष्ट झाला. पृथ्वीवरील जागेच्या जवळपास तीन भाग (70.8 टक्के) पाणी आहे आणि फक्त एक भाग (29.2 टक्के) जमीन आहे. हे सर्व पाणी खारं आहे. पिण्यालायक बरंचसं पाणी जमिनीवरच मिळतं.

शास्त्रज्ञांनी तर दक्षिणी महासागराला केव्हापासूनच वेगळी ओळख दिली होती. तरी जागतिक स्तरावर ते मानलं जात नव्हतं. अर्थात तो थोडा मूर्खपणाच होता. आता मात्र सगळ्यांच्या ज्ञानात फरक करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातही माहितीत बदल होईल. आतापर्यंत सगळे जण चार महासागर आहेत असं शिकत होते, त्यांना त्यांचं ज्ञान सुधारावं लागेल. ज्यांनी या पाचव्या महासागराला भेट दिली आहे त्या सगळ्यांच्या मते इथली हवा जास्त गार आहे, इथली पर्वतराजी अत्यंत मनोहारी, सुंदर आहे. हिमनद्या जास्त निळ्या आहेत ज्यामुळे महासागर आणखी मोहक आणि खास दिसतात.

पाचव्या महासागराची घोषणा झाल्यावर एक नवीन सुरुवात झाली – ‘प्लॅनेट पॉसिबल’! यामागे ही कल्पना होती की लोकांना या ग्रहाची माहिती देऊन आणखी माहिती मिळवण्यासाठी प्रेरीत करणे. 1915मध्ये जेव्हा नॅशनल जिओग्राफीकने नकाशा बनवायला सुरुवात केली त्या वेळी चार महासागर होते आणि त्यांची ओळख त्यांच्या सीमा ठरवणाऱया खंडांवरून ठरवली गेली. त्याउलट दक्षिण महासागराची ओळख, त्याच्या बाजूला कोणताही खंड नसल्याने अंटार्टिक सरकमपोलार करंट (ACC) मुळे जो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो त्यावरून ठरते. शास्त्रज्ञांचा तर्क आहे की, हा पाण्याचा करंट 340 लाख वर्षांपूर्वी तयार झाला असावा जेव्हा अंटार्टिका दक्षिण अमेरिकेपासून वेगळं झालं. त्या वेळी पृथ्वीच्या तळातील पाणी काहीही अडथळा न येता वाहू लागले. आता अंटार्टिक सरकमपोलार करंट अंटार्टिकाच्या भोवतालच्या सगळ्या पाण्यातून वाहतो. सुमारे 60 डिग्री दक्षिणेकडे. फक्त ड्रेक पॅसेज आणि स्कॉटिया समुद्र सोडून.

या करंटचं सगळं पाणी आणि त्यामुळे दक्षिणी महासागराचं बरंचसं पाणी उत्तरेकडील महासागरांपेक्षा जास्त थंड आणि कमी खारट आहे. शिवाय तिथले जीव, जिवाणू, प्राणी, पक्षी इत्यादी सगळंच वेगळं आहे. करंटचं सर्व पाणी ऍटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागर इथून घेतलं जातं जे जगाभोवती उष्णता नेण्यासाठी उपयोगी पडतं. यातील थंड पाणी महासागरात खाली जातं आणि खोल समुद्रात कार्बन साठवण्यास मदत करतं. हजारो समुद्री प्रजाती फक्त या करंटमध्येच राहतात. तरीही इथे फक्त ठराविक प्रकारचे मासे, सील, पेंग्विन आणि इतर काही प्रकारचे पक्षी राहतात. शिवाय ही जागा मिंक देवमाशाचं घर आहे. या गोष्टी इतर महासागरांपेक्षा वेगळ्या आहेत.

16व्या शतकाच्या सुरुवातीस स्पॅनीश अन्वेषक वास्को नुनेझ द बाल्बोआ याने ‘दक्षिणी महासागर’ हा शब्दप्रयोग पृथ्वीच्या तळाशी असलेलं पाणी पाहून ते वर्णन करण्यासाठी प्रथमच वापरला आणि जागतिक परस्पर दळणवळण व व्यापार यासाठी तो शब्दप्रयोग तसाच वापरात राहिला. या महासागराची हद्द ….. 2000मध्ये ठरवली गेली होती. तरी जागतिक हायड्रोग्राफीक संस्थेने ती कधीच एकमताने मान्य केली नाही. जागतिक हायड्रोग्राफीक संस्थेने 1921 साली ‘दक्षिणी महासागर’ हा शब्द प्रथमच त्यांच्या प्रकाशनांमध्ये वापरला. तरीही ही सगळ्या प्रकारची मान्यता मिळून पाचव्या महासागराची अधिकृत घोषणा होणं याने काही खरोखरचा नवा महासागर निर्माण झालेला नाही, तर महासागर तर होताच आणि तो आहे तिथेच आहे, फक्त त्याला वेगळं नांव दिलं गेलं एवढंच.

समुद्री तळाचे नमुने शास्त्रज्ञांना काळात हरवलेल्या समुद्रांचा इतिहास शोधायला मदत करत आहेत. ते आहेत इपेटस, हेक, टेथीस, पँथालॅसिक, उरल इत्यादी. या जुन्या जलसमुदायांप्रमाणेच काही लक्ष वर्षांनी आताचे आपले महासागरही लुप्त होतील आणि पृथ्वीचा नवीन नकाशा बनेल. पृथ्वीच्या प्रणालीप्रमाणे जग हे सारखं बदलतंच असतं आणि हे बदल होणं कधीच थांबलेल नाही व कधी थांबणारही नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या