आभाळमाया – अवकाशातील ‘प्राणी-पक्षी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

थंडीचे दिवस सुरू झालेत. हा अस्मानी पाहुण्यांचा म्हणजे पृथ्वी नावाच्या ग्रहावर ऋतुचक्रानुसार स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा मोसम. एरवी न दिसणारे कित्येक पक्षी आपल्याकडे शहरांमध्येही (उरल्यासुरल्या) वनश्रीत दिसू लागतात. पण ही झाली पृथ्वीवरच्या खऱ्या पक्ष्यांची कथा. आपल्या या कॉलममध्ये सारं काही पृथ्वीपलीकडच्या अवकाशातलं. तिथेही पक्षी आहेत. प्राणी आहेत. त्यांच्या आकाराचं महत्त्व काय ते गेल्यावेळच्या लेखात वाचलं. आता या अवकाशी ‘प्राणी-सृष्टी’विषयी आणखी थोडंसं जाणून घेऊ. त्यातल्या प्रसिद्ध मृगाची पुनरोक्ती करायला नको.

मग आणखी कोणत्या प्राण्याचं संग्रहालय अवकाशात झालेलं आहे? तसे बरेच आहेत. सरावलेल्या अवकाश अभ्यासकांना ते नजर वर करताच दिसू लागतात. पण आपण याबाबतीत नवखे असलो तर सांगितल्यावर लगेच पटतात असे प्राणी आधी पाहू.

वृश्चिक म्हणजे नांगी मारणारा विंचू हे सर्वांना ठाऊक आहे. अवकाशातला महाविंचू म्हणजे वृश्चिक राशीतील ताऱ्यांचा समूह. सहज पाहिलं तरी हा विंचू स्पष्टपणे जाणवतो. त्याची थोडी खगोलीय माहिती घ्यायची तर या तारकासमूहाने अवकाशातील सुमारे 497 अंशांचा भाग व्यापला आहे. म्हणजे त्याचा विस्तार मोठाच म्हणायला हवा. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे आयनिक वृत्ताचा (सूर्याच्या भासमान भ्रमणवृत्ताचा) मार्ग सरकल्याने सध्या सूर्य वृश्चिक राशीतून अल्पकाळच भ्रमण करतो. येत्या मंगळवारपासून (23 नोव्हें.) सूर्य या तारकासमूहात येईल आणि केवळ 29 नोव्हेंबरपर्यंतच तिथे त्याचा मुक्काम असेल. वृश्चिक तारकासमूह रात्रभर आकाशात असण्याचा काळ आपल्याला निरीक्षणाच्या दृष्टीने फारसा उपयुक्त ठरत नाही. कारण मे आणि जूनमध्ये आकाश ढगाळ होऊ लागतं आणि अवकाशस्थ तारकासमूहांना त्यांचं ‘ग्रहण’ लागतं. मात्र त्यापूर्वी मार्च व एप्रिलमध्ये वृश्चिक रास मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत सुंदर दिसते. आताही वृश्चिक पहाटेपर्यंत जागरण केल्यास दिसू शकेल. ग्रीक पुराणकथेनुसार आरोयन (मृग) शिकारी स्कॉर्पिओ या विंचवाच्या विषाने गेला. त्यामुळे त्याची जागा अवकाशात परस्परविरोधी दिशेला असते. मृग मावळतो तेव्हा वृश्चिक उगवतो. या कथा केवळ नक्षत्र स्मरणापुरत्या ध्यानात ठेवायच्या इतकंच!

साधारणपणे एका राशीत अडीच नक्षत्रं असतात. कारण नक्षत्र सत्तावीस आणि राशी बारा. वृश्चिकेत अनुराधा, ज्येष्ठा व मूळ ही तीन नक्षत्रं नजरेस पडतात. सुरुवातीच्या चार-तीन ताऱ्यांची सरळ रेषा म्हणजे अनुराधा. नंतर कंठाच्या जागी लालसर दिसणारा मृत्युपंथाला लागलेला महातारा म्हणजे ज्येष्ठा. या ताऱ्याचा ‘सुपरनोव्हा’ (अतिनवतारा) कोणत्याही क्षणी होऊ शकतो. तो ज्या निरीक्षकाला पहिल्यांदा दिसेल त्याचं कौतुक होईल. वृश्चिकाच्या वाकडय़ा शेपटात शेपटी दिसते ते मूळ नक्षत्र वृश्चिकाचे मुख म्हणजे अनुराधा शरीर म्हणजे ज्येष्ठा आणि मूळ म्हणजे नांगी! आता हे नक्षत्र पाहिल्यावर तुम्ही कधीही विसरणार नाही! यातील लाल ज्येष्ठा (ऍन्टॅरेस) या तेजस्वी ताऱ्याचा वीस सर्वाधिक तेजस्वी ताऱ्यांच्या यादीत समावेश होतो. ज्येष्ठा ओळखण्याची सोपी खूण म्हणजे तो मंगळासारखा लाल दिसतो. पृथ्वीपासून तो 604 प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

हंस हा तारकासमूह 804 अंश भागात विस्तारलेला आहे. या पक्ष्याच्या आकाराच्या ताऱ्याने आपली चोच आकाशगंगेत बुडवली आहे. त्याचे दोन्ही पंख स्पष्ट दिसतात. त्यातील डेनेब म्हणजे शेपटीतील डेनेब तारा सूर्याच्या 6000 पट दीप्तीचा असून त्याचा व्यास सूर्याच्या 60 पट आहे. समर ट्रन्गलमधल्या, श्रवण, अभिजीत यांच्याबरोबर त्रिकोन करणारा हा हंस तारा.

वासुकी हा महासर्प आहे हे पुराणकथा सांगते. अवकाशातील हायड्रा किंवा वासुकी तारकासमूह सर्वांत लांबवर पसरलेला आहे. अवकाशाचा 1303 अंशाचा भाग व्यापलेल्या वासुकीचा ‘फणा’ कर्क राशीच्या जवळ म्हणजे दक्षिणेला होतो. मात्र त्याचे शेपूट संपते ते तूळ तारकासमूहाच्या नैऋत्य दिशेला! फेब्रुवारी ते मे महिन्यात वासुकी रात्रभर आकाशात दिसतो. याशिवाय मेषेचा मेंढा, वृषभेतील बैल, कर्केचा खेकडा, मकरची मगर आणि मीनेतले दोन मासेही रात्री आकाशात दिसतात. मृगाची ओळख गेल्या वेळेला झाली, पण त्याचा म्हणजे ओरायन शिकाऱ्याचा कुत्रा ‘कॅनिस (मेजर) अद्वितीय आहे. कारण सरळ शेपूट असलेला विश्वातला हा एकमेव कुत्रा. विशेष म्हणजे, हे प्राणिसंग्रहालय फुकट पाहता येते!

[email protected]