सोनेरी लखलखाट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जे. डी. पराडकर

पावसाच्या हलक्या सरी मृदेला स्पर्शल्यानंतर निसर्गातील असंख्य सजीवांना आपापल्या कर्तव्याची जाणीव होते आणि हे सारे आपल्या भूमिका वठवायला सज्ज होतात . पावसाच्या सरींना अंधार पडल्यानंतर जणू वाट दाखविण्यासाठी सृष्टीने तयार केलेला सोनेरी प्रकाश घेऊन ठरावीक कालावधीसाठी काजवे दाखल होतात. अंधाराचे साम्राज्य काहीसे खालसा करण्यासाठी सर्वत्र पसरणारा हा सोनेरी लखलखाट म्हणजे निसर्गदेवतेच्या पैठणीची सोनेरी किनारच!

वरुणराजाच्या आगमनाची वर्दी द्यायला निसर्गातील असंख्य प्रकारचे घटक अगदी आतूर असतात . मृग नक्षत्रात लाल रंगाचे वेलवेटसारखे छोटे किडे मातीच्या ढेकळातून वाट काढत बाहेर येतात. या किडय़ांच्या आगमनानंतर लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत सर्वांनाच याचे आकर्षण वाटते. इवलासा हा जीव आयुष्य क्षणभंगुर असतानाही आपल्या आगमनातून निसर्ग संदेश पोहचवण्याचे काम कर्तव्य म्हणून पार पाडतो. या छोटय़ाशा मृग किडय़ांना तळहातावर घेण्याचा मोह मुलांना आवरता आला तरच नवल! आमच्या बालपणी गावी आंबेडला जाताना पायवाटेवरील घाटीत हे मृग किडे दृष्टीस पडायचे. यातील काही किडे तळहातावर घेऊन घर गाठल्यावर त्यांना काचेच्या बाटलीत अथवा रिकाम्या काडय़ांच्या पेटीत ठेवायचे. थोडय़ा थोडय़ा वेळाने त्यांना हवा मिळण्यासाठी मोकळे सोडायचे. वेलवेटसारख्या मृदू आणि लाल भडक रंगाच्या मृग किडय़ांचे आकर्षण बालपणी त्यांच्या सौंदर्याशी निगडित होते.

जमिनीमधून हजारोंच्या संख्येने बाहेर पडणारे पातळ पंखाचे कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात. जमिनीतून वर येताना यातील निम्म्या कीटकांचे पातळ पंख गळून पडतात. असे कीटक जमिनीतून वर येऊ लागले की ते प्रखर प्रकाशाकडे आकर्षित होतात. अशा वेळी घरातील विजेचे बल्ब बंद करावे लागतात. घराबाहेर असणाऱया एखाद्या बल्बभोवती हे कीटक अक्षरशः पिंगा घालत असतात. काही वेळातच पंख गळून पडल्यानंतर बल्बच्या खाली हजारो कीटक आपले कार्य संपवून मरून पडलेले असतात. दुसऱया दिवशी परत अशीच स्थिती पाहायला मिळते. पुढे चार दिवस हा प्रकार सुरू असतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर हे सारे थांबलेले पाहायला मिळते . आमच्या आंबेडच्या घरी ज्यावेळी वीज आलेली नव्हती त्यावेळी हे पातळ पंखाचे कीटक घरात आल्यानंतर रॉकेलच्या दिव्याभोवती गोलगोल फिरत राहायचे. अशा वेळी मोठय़ा परातीत पाणी घेऊन त्यामध्ये रॉकेलचा एखादा दिवा ठेवल्यानंतर हे सारे कीटक या पाण्यात पडायचे . या कल्पनेमुळे काही अंशी तरी या त्रासातून सुटका मिळायची. छोटय़ा-मोठय़ा बेडकांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज रात्रीच्या शांततेचा भंग करायचे.

काजव्यांच्या या सोनेरी माळा म्हणजे निसर्गदेवतेच्या स्वागतासाठी लावलेली सोनेरी तोरणेच वाटायची. इवल्याशा काजव्यांचा तो सोनेरी प्रकाश पाहून ‘कानाखाली काजवे चमकवणे’ या उक्तीचाही खरा अर्थ कळला. बालपणापासून काजव्यांविषयी असणारे आकर्षण आणि कुतूहल मात्र कायम राहिले. ‘काजवा’ हा सोनेरी प्रकाश पसरवणारा कीटक गेली काही वर्षे पर्यटनाचादेखील विषय ठरलाय. ‘काजवा महोत्सव’ अशा नावाने काजव्यांच्या प्रकाशमय लीला पाहण्यासाठी हजारो पर्यटक एकत्र होत असतात. खरं तर क्षणभंगुर आयुष्य असल्याची कल्पना असूनही मिळालेले आयुष्य आनंदाने जगत सोनेरी प्रकाशाची पखरण करताना अंधःकारानंतर प्रकाश येतोच असा संदेश देण्याचे कामही हे काजवे करत असतात. निसर्गाने जे जे निर्माण केले आहे ते ते अद्भुत आहे.

कानठळे बसवणारे रातकिडे तर पूर्ण पावसाळी हंगामात त्रस्त करतात. किती छोटा कीटक आहे हा, मात्र त्याच्या वेगाने फिरणाऱया पंखांतून हा कानठळ्या बसवणारा आवाज बाहेर पडत असतो. रातकिडय़ांचा आवाज ज्या बाजूने येतो तिकडे ते नसतातच. हे त्यांचे आवाजातून ‘चकवण्याचे’ एक वेगळे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. सूर्योदयापासून ‘चातक’ पक्षी मोठय़ा आवाजात ओरडायला सुरुवात करतो . पावसाच्या आगमनापूर्वी चातक ओरडून अक्षरशः वरुणराजाला लवकर येण्याचे आर्जव करीत असावा. कोकणच्या ग्रामीण भागात चातक पक्ष्याला ‘पावशा’ असेही म्हणतात. पावसाचे पहिले थेंब थेट चोचीत घेऊन हा चातक पक्षी आपली तहान भागवतो असे सांगितले जाते. चातक तहान भागवण्यासाठी जशी पहिल्या पावसाच्या सरींची वाट पाहत असतो यावरूनच ‘चातकासारखी वाट पाहणे’ ही म्हण तयार झाली असावी. निसर्ग जे विविध संकेत देतो त्यावरून खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे. पावसाच्या पूर्वसंकेताचा हा सोनेरी लखलखाट पाहून समृद्ध व्हायचे असेल तर निसर्गाची समृद्धी जपायला हवी आणि त्याला समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने हातभारही लावायला हवा.

[email protected]