लेख – लोकसाहित्यातील ‘अक्षरशिल्प’!

>> दासू वैद्य

लोकसाहित्याची सैद्धांतिक मांडणी मांडे सरांनी केली. विद्यापीठीय अभ्यासाच्या दृष्टीने ‘लोकसाहित्याचे स्वरूप’  समजावून सांगणारे लेखन जाणीवपूर्वक केले. एखादं बीज लावून जबाबदारी संपत नाही, त्याचे संगोपनही करावे लागते. त्याप्रमाणे लोकसाहित्य विषयाचे ममत्वाने निष्ठापूर्वक संगोपन केले म्हणूनच आज लोकसाहित्य हा विषय अनेक शक्यतांसह विस्तारला आहे. लोकसाहित्य विषयाचे अभ्यासक गावोगाव तयार झाले. ध्यास जेव्हा श्वास होतो, तेव्हा डॉ. प्रभाकर मांडे यांच्यासारखे लोकसाहित्यातील अक्षरशिल्प तयार होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1953-55 च्या दरम्यान स्थापन केलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयात एका खेडेगावातला मुलगा पदवी शिक्षणासाठी येतो. स्वतःच्या वाचन-लेखनातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. या विद्यार्थ्याने वार्षिकांकासाठी लिहिलेल्या दीर्घ निबंधाची प्राचार्य म. भि. चिटणीस शिफारस करतात आणि साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी मिळते. वार्षिकांकाची पृष्ठे कमी पडतायत म्हणून विशेष परिशिष्टासह हा निबंध छापण्याची बाबासाहेब शिफारस करतात. ‘समाजाचा अभ्यास करा’ असा संदेश देतात. या प्रेरणेतून हा विद्यार्थी निष्ठेने लोकसाहित्य विषयात साधना करतो. लोकसाहित्याची मौलिक मांडणी करतो, वंचित समाजाच्या अभ्यासातून अस्पर्श संस्कृतीचे जीवन संदर्भ उजागर करतो. या मौलिक साधनेला 2023 साली भारत सरकार प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ सन्मान बहाल करते. ती सन्माननीय व्यक्ती म्हणजे पद्मश्री डॉ. प्रभाकर भानुदास मांडे!

विशेष म्हणजे हा पद्मश्री सन्मान मांडे सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच कृतज्ञतापूर्वक अर्पण करतात. असे हे वर्तुळ पूर्ण होते. हा प्रसंग सांगत असताना मांडे सर भावुक झालेले असतात, डोळे भरून आलेले असतात. तसे मांडे सर हे मुळातच विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करणारे मायाळू शिक्षक. प्रत्यक्ष वर्गात ती माया लाभलेल्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे.

निजाम राजवट असल्यामुळे सरांचे शालेय शिक्षण उर्दू भाषेतून झाले. मिलिंद महाविद्यालय, विद्यापीठ, पिशोर, परभणीचे शिवाजी महाविद्यालय असा अध्ययन, अध्यापनाचा प्रवास करत शेवटी विद्यापीठाच्या मराठी विभागात विभागप्रमुख म्हणून मांडे सर निवृत्त झाले. 1960 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विषयात पीएच.डी.साठी नोंदणी केलेले मांडे सर पहिले विद्यार्थी. प्रा.वा.ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कलगीतुऱ्यातील आध्यात्मिक शाहिरी’ या वेगळ्या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. महाराष्ट्रात विद्यापीठीय पातळीवर ‘लोकसाहित्य’ ही अभ्यासपत्रिका सुरू करण्यात मांडे सरांचे मोठे योगदान आहे. वंचित समाजाचा सखोल अभ्यास करणाऱ्या ‘गावगाडय़ाबाहेर’ या ग्रंथासाठी 1991 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी दिली. त्रिं.ना. अत्रे यांच्या ‘गावगाडा’एवढेच महत्त्व ‘गावगाडय़ाबाहेर’चे आहे.

लोकसाहित्याची सैद्धांतिक मांडणी मांडे सरांनी केली. विद्यापीठीय अभ्यासाच्या दृष्टीने ‘लोकसाहित्याचे स्वरूप’  समजावून सांगणारे लेखन जाणीवपूर्वक केले. एखादं बीज लावून जबाबदारी संपत नाही, त्याचे संगोपनही करावे लागते. त्याप्रमाणे लोकसाहित्य विषयाचे ममत्वाने निष्ठापूर्वक संगोपन केले म्हणूनच आज लोकसाहित्य हा विषय अनेक शक्यतांसह विस्तारला आहे. हा विषय अभ्यासक्रमातच अडकून न पडता समष्टीचा झाला पाहिजे. या तळमळीतून मांडे सरांनी लोकसाहित्य संशोधन परिषद स्थापन केली. अनेक गावांतून संमेलने घेतली. त्यामुळे लोकसाहित्य विषयाचे अभ्यासक गावोगाव तयार झाले. अशा लोकसाहित्य परिषदेचा अनुभव माझ्या कायम स्मरणात आहे. 1989-90 साली मी एम.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी होतो. एकापेक्षा एक दिग्गज प्राध्यापक शिकवायला (आमच्या मराठी विभागातील तीन प्राध्यापक ‘पद्मश्रीत प्राप्त आहेत) डॉ. यु. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. पानतावणे, डॉ. कोत्तापल्ले, डॉ.एस.एस. भोसले आणि डॉ. प्रभाकर मांडे. या सगळ्य़ांबद्दलच आदरयुक्त भीती वाटायची. मांडे सरांचा पहिला तास… पहिलेच दर्शन… मायाळू बोलणं. खडू-फळ्य़ाचा भरपूर वापर, पुनः पुन्हा समजावून सांगणं. व्याख्यान पद्धतीपेक्षा समजावून सांगण्याची वेगळी हातोटी होती. यात सरांची सुरुवात शालेय पातळीवर शिक्षकी पेशाने झाली. यापेक्षा समजावण्याची तळमळ अधिक होती. पहिल्या तासातच सारा वर्ग मंत्रमुग्ध झालेला. साठ मिनिटांपैकी तीस मिनिटे शिकवून सर थांबले. उरलेल्या वेळेत अर्धा तास शिकवलेल्या भागावर काय समजलं, ते लिहायला सांगितले. वहीची पानं फाडून आम्ही जे काही डोक्यात बसलं ते लिहून दिलं. दोन तासांतच शिपाई मला शोधत आला. मांडे सरांनी बोलावलं होतं. त्या वेळी या दिग्गज सरांच्या कक्षात जायलाही भीती वाटायची, पण मांडे सरांचा मायाळू आवाज मात्र धीर देणारा होता. तरीही थोडा बुजतच कक्षात गेलो. सरांनी मी तासात लिहिलेले कागद समोर घेतले. त्यांना माझी लेखन पद्धती आवडली होती. मी विशेष असं काही लिहिलेलं नव्हतं. मी मूळ विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे सर जे काही बोलले होते. ते नेमकेपणाने समीकरणासारखं मांडलं होतं. शेवटी संदर्भः डॉ. प्रभाकर मांडे यांचे व्याख्यान अशी नोंद केली होती. पहिल्या तासातच मी उत्तीर्ण झालो होतो. एवढय़ावरूनच सरांनी मला त्यांच्या सिडकोतील घराचा पत्ता दिला. येण्यासाठी सिटी बसचे पैसे दिले. घरी पोचल्यावर जुना राबता असल्यारखी घरगुती वागणूक. स्वतःच्या पंगतीला जेवायला बसवलं. काम काय होतं, तर पहिल्या लोकसाहित्य परिषदेची निमंत्रणपत्रं लिहायची होती. ती मी आनंदाने लिहिली. तेव्हापासून सरांच्या जुळलेल्या स्नेहाचा शेवटपर्यंत मी लाभार्थी होतो.

मांडे सरांनी अध्यापनाबरोबरच मौलिक ग्रंथनिर्मिती केली आहे. ‘लोकसंस्कृतीचे मूळ स्वरूप’, ‘लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’, ‘लोकरंगभूमी’, ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकपरंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, ‘लोकपरंपरेतील स्त्री प्रतिमा’ असे ग्रंथ ओलांडून लोकसाहित्याचा अभ्यास आजही शक्य नाही. ‘बुडालेला गाव’ ही कित्येक विस्थापितांची कैफियत मांडणारी प्रातिनिधिक गोष्ट आहे. ‘गावगाडय़ाबाहेर’, ‘मांग आणि त्यांचे मागते’, ‘भारतीय आदिवासीचे स्थान’ अशा ग्रंथांनी केलेली मांडणी मूलभूत आहे. ध्यास जेव्हा श्वास होतो, तेव्हा डॉ. प्रभाकर मांडे यांच्यासारखे अक्षरशिल्प तयार होते. समाजमनावर कायम होते. नगरला सरांना शेवटचा निरोप देण्यासाठी गेलो होतो. सर एक ‘लोककथा’ होऊन निवांत निजलेले होते. त्यांनी प्रेमळ हाक मारली नाही. मी फुलं वाहताना त्यांनी संकोचही व्यक्त केला नाही. म्हणजे सरांना निरोप द्यायची वेळ झाली होती. त्या शांतिधामातील सुंदर वृक्ष वाऱ्याच्या साथीनं पानं हलवत ‘लोकधून’ गात अखेरचे वंदन करीत होते.

(लेखक ज्येष्ठ कवी आहेत.)