रंगीबेरंगी जत्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर

परदेशी पक्ष्यांना केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रच आपलासा वाटू लागला आहे. कोकणातील सिंधुदुर्गातील पाट गावी परदेशी पक्ष्यांची जत्रा भरली आहे.

सिंधुदुर्गात सध्या गावोगावी जत्रांचा माहोल असून या उत्सवाची भुरळ परदेशी पाहुण्यांनाही पडली आहे. कुडाळ तालुक्यातील पाट गावात शेकडोंच्या संख्येने दाखल झालेल्या या दुर्मिळ पक्ष्यांना पाहण्याची अनोखी पर्वणी पर्यटकांसह पक्षीप्रेमींना मिळणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने त्यांचे येथे वास्तव्य असून पाहुणचार झाल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग विकासाच्या दृष्टीने वेगाने पुढे सरकतो आहे. निसर्गदेवतेने भरभरून दिलेले सृष्टीसौंदर्य पर्यटकांना नेहमीच भावले. म्हणूनच 1997 साली सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित झाला. तालुक्यातील गावोगावी पाहण्यासारखी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळेच पर्यटकांच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. कुडाळ तालुक्यातील पाट गाव सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरले आहे.

कुडाळपासून 17 कि.मी., वेंगुर्लेपासून 23 कि.मी. आणि मालवणपासून 25 कि.मी. अंतरावर असलेले पाट हे गाव तसे मध्यवर्ती आहे. त्यातच नव्याने उभे राहिलेले चिपी विमानतळही येथून 9 कि.मी.वर आहे. समुदापासून जवळपास 4 ते 5 कि.मी.वर माऊली तलाव असल्याने परदेशी पक्षी दरवर्षी येथे आपला मुक्काम ठोकतात. जवळपास 9 एकर विस्तीर्ण असलेल्या पाणथळ जागेत त्यांना खाद्यही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तलावात स्वच्छंद विहार करणारे हे रंगीबेरंगी परदेशी पाहुणे सर्वांच्याच नजरेचे पारणे फेडतात. या तलावात सफेद, लाल-गुलाबी रंगाची कमळे तसेच कापसी कमळे मोठय़ा प्रमाणात आढळतात. या कमळांच्या मुळाशी असलेले खाद्य या स्थलांतरित पक्ष्यांसाठी पोषक आहे. विशेष म्हणजे, या तलावातील पाणी आजूबाजूच्या पाट, म्हापण आणि कोचरे या गावांना शेतीसाठी पाटाने पाणी पुरवले जायचे म्हणून या गावाचे नामकरण ‘पाट’ करण्यात आले. अजूनही तलावाच्या काही भागांत शेती केली जाते.

सहा दुर्मिळ बदक आणि रंगीबेरंगी पक्षी

माऊली तलावात स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांमध्ये अडई बदक मोठय़ा संख्येने आढळतात. वारकरी (काळय़ा रंगाचे डोक्यावर नाम असणारे बदक) हळदी कुंकू (चोचीवर पिवळय़ा व लाल रंगाचा पट्टा असणारे बदक) काणूक (पांढऱ्या शुभ्र रंगाचे बदक), भुवई बदक. अंगावर नक्षीदार बांधणी असलेले बदक), तलवार (शेपटी तलवारीसारखी असलेले बदक) याशिवाय उघडचोच करकोचा, अत्यंत दुर्मिळ असलेली जांभळी-निळी पाणकोंबडी, राखी बगळा, थोरला धोबी, किंगफिशर (खंड्या) तारवाली पाकोळी, कोतवाल ताम्रमुखी टिटवी, शेकाटय़ा, तुतारी, भुरा बगळा, पाणकावळा याशिवाय स्थानिक पक्ष्यांची जत्राच नेहमी या तलावात भरलेली असते.

पक्षीनिरीक्षणासाठी रॅम्पची व्यवस्था

तलावाशेजारीच कोकण विकास पर्यटन निधीतून 25 लाख खर्चून रॅम्प बांधण्यात आला आहे. तलावातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने संरक्षक भिंतही उभारण्यात येणार आहे. तलावातील 8 एकर असलेली शेरी (शासकीय जागा) ग्रामपंचायतीच्या नावे आहे. उर्वरित शेतीची जागा वापरून शेतकऱयांना त्या बदल्यात ग्रामपंचायतीच्या वतीने स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तलावात दाखल होणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी फलक उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती उपसरपंच गिरीप्रसाद राऊळ यांनी दिली.

मागील वर्षी या तलावात दाखल होणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या डॉक्युमेंटरी फिल्मला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यटनदृष्टय़ा पुढारलेल्या या सिंधुदुर्ग जिह्यात पाट गावाचे नाव याच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. निसर्गप्रेमी पक्षीनिरीक्षकांनी मोठय़ा संख्येने या तलावाला भेट देऊन निसर्गसंपदेचा आस्वाद घ्यावा. त्याचबरोबर येथील जैवविविधता टिकून राहावी यासाठी ग्रामस्थांसह पर्यटकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्रा. अमर प्रभू (पक्षीप्रेमी पाट)